Nana Patole यांचा राजीनामा मंजूर, प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' नेत्याची काँग्रेसने केली निवड

महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून हर्षवर्धन सपकाळ यांची निवड करण्यात आली आहे. त्याचबरोबर या पदावर असलेल्या नाना पटोले यांचा राजीनामा देखील मंजूर करण्यात आला आहे.

Mumbai Tak

मुंबई तक

• 07:46 PM • 13 Feb 2025

follow google news

नवी दिल्ली: महाराष्ट्र काँग्रेसचे नव्या प्रदेशाध्यक्षाच्या नावावर अखेर आज (13 फेब्रुवारी) शिक्कामोर्तब झालं आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत निराशाजनक कामगिरीनंतर पक्ष नेतृत्वाने नाना पटोले यांचा राजीनामा स्वीकारला आहे. ज्यानंतर आता ही जबाबदारी बुलढाण्यातील काँग्रेस नेते आणि माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर सोपविण्यात आली आहे. नाना पटोले यांच्याकडून प्रदेशाध्यक्ष पद काढून घेतलेलं असलं तरी काँग्रेस नेतृत्वाने हे पद हर्षवर्धन सपकाळ यांच्या निमित्ताने विदर्भाकडे ठेवलं आहे. हर्षवर्धन हे पश्चिम विदर्भातील आहे. ते राहुल गांधी यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जातात. 

हे वाचलं का?

कोण आहेत हर्षवर्धन सपकाळ?

हर्षवर्धन सपकाळ यांची राजकीय कारकीर्द अगदी गावपातळीपासून सुरू झाली आहे. जिल्हा परिषद सदस्य ते आमदार असा त्यांचा प्रवास आहे. 1999 ते 2002 पर्यंत ते जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते. 2014 ते 2019 दरम्यान ते काँग्रेसचे आमदारही होते. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्षांची नियुक्ती केली जात असल्याने, नवीन अध्यक्षांसमोर या निवडणुका जिंकण्याचे मोठे आव्हान असणार आहे.

हे ही वाचा>> मूड ऑफ द नेशन: महाराष्ट्रात मविआचं काही खरं नाही, सर्व्हेतून समोर आले धक्कादायक आकडे

हर्षवर्धन सपकाळ हे सध्या काँग्रेसच्या राजीव गांधी पंचायती राज संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांच्या विचारसरणीवर आधारित ग्राम स्वराज्याच्या निर्मितीत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. सपकाळ यांना सर्वोदय विचारांवर आधारित राष्ट्र उभारणी युवा शिबिरे आयोजित करण्याचा, ग्राम स्वच्छता मोहिमांमध्ये सक्रिय सहभाग घेण्याचा आणि आदर्श ग्राम चळवळीचा अनुभव आहे.

प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीत विजय वडेट्टीवार यांचेही नाव होते, परंतु पक्षाच्या हायकमांडने राहुल गांधी यांच्या जवळचे असलेले हर्षवर्धन सपकाळ यांच्या नावाला मान्यता दिली आहे. हर्षवर्धन सपकाळ हे सध्या 57 वर्षांचे आहेत. त्यांचे पदवीपर्यंत शिक्षण झाले आहे. महाराष्ट्राच्या प्रदेशाध्यक्षांनंतर मुंबईलाही नवीन अध्यक्ष मिळू शकतात, सध्या तिथली जबाबदारी वर्षा गायकवाड यांच्याकडे आहे. मात्र, त्या आता खासदार झाल्या आहेत. अशावेळी आता त्यांची जबाबदारी इतर दुसऱ्या नेत्यावर सोपावली जाऊ शकते.

हे ही वाचा>> MOTN: देशात आज निवडणुका झाल्यास BJP ला मिळतील 'एवढ्या' जागा, पाहा कोणाचं येईल सरकार

हर्षवर्धन सपकाळ यांचा संक्षिप्त परिचय

युवावस्थेपासूनच गाडगे महाराज,तुकडोजी महाराज व गांधीवादी - सर्वोदयी कार्यकर्ता म्हणून परिचित आहेत.  भारतीय राष्ट्रीय काँग्रेस  संलग्नित राजीव गांधी पंचायत राज संघटनचे विद्यमान अध्यक्ष आहेत.  भारतीय राष्ट्रीय विद्यार्थी संघटना (nsui) च्या माध्यमातून राजकीय जीवनात सक्रीय झाले. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष राहिलेले आहेत. त्यांनी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातून बी.कॉम व बी. पी.एड पदवी धारण केलेली आहे.  

ते शेतकरी कुटूंबातून आलेले असून सामाजिक कार्य व राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. ग्राम स्वराज्याच्या संकल्पपूर्तीसाठी  महाराष्ट्रात सुरू केलेल्या  संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत त्यांनी विशेष योगदान दिले आहे.  ग्रामस्वच्छता तथा आदर्श ग्राम निर्माण या क्षेत्रातील त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे.   युवकांसाठी युवक शिबिराच्या नियमित सातत्याने आयोजन, ही त्यांची वैचारिक प्रतिबध्दता दर्शविते. 

शेती स्वावलंबनासाठी तसेच टंचाई मुक्तीसाठी त्यांनी आपल्या विधानसभा मतदार संघात केलेला जलवर्धन प्रकल्पाच्या माध्यमातून  जलव्यवस्थापन  तथा जलसंधारण क्षेत्रात त्यांनी विशेष उल्लेखनीय कार्य केले आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील आदिवासी तथा आदिवासी गावांचे  सक्षमीकरण करण्यासाठी  गेल्या 25 वर्षांपासून सातत्याने प्रयत्नशील तथा कटीबध्द आहेत. 1999 से 2002 या कालावधीत महाराष्ट्रातील सर्वात तरूण जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्या कार्यकाळात बुलढाणा जिल्हा परिषद ही महाराष्ट्रात अव्वल होती. तसेच 2014 ते 2019 या कालावधीत ते बुलढाणा विधानसभा मतदार संघात विधानसभा सदस्य म्हणून राहिले आहेत. 

अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या माध्यमातून राजकीय क्षेत्रात सद्यस्थितीत राष्ट्रीय अध्यक्ष राजीव गांधी पंचायत राज संगठन म्हणून कार्यरत आहेत. तसेच यापूर्वी राष्ट्रीय सचिव, अ.भा.काँ.कमेटी नवी दिल्ली व राष्ट्रीय उपाध्यक्ष, राजीव गांधी पंचायत राज संगठन ही जबाबदारी सुध्दा पार पाडलेली आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंतीवर्षाच्या निमित्ताने त्यांनी बुलढाणा विधानसभा मतदार संघात संविधान चेतना यात्रेच्या माध्यमातून प्रत्येक गाव-वस्ती-वाडीपर्यंत संविधान जागृतीसाठी कार्य केले आहे.

काँग्रेसचे सचिव म्हणून पंजाब चे सहप्रभारी म्हणून सुध्दा काम केले आहे. तसेच तत्पूर्वी गुजरात व मध्यप्रदेश या राज्यांचे सुध्दा सहप्रभारी म्हणून जबाबदारी पार पाडलेली आहे. अ.भा.काँ.कमिटी द्वारा सेवाग्राम-वर्धा येथील गांधी आश्रमात आयोजित देशव्यापी गांधी विचार दर्शन शिबिराचे राष्ट्रीय शिबिर समन्वयक म्हणून पक्षाने सोपविलेली जबाबदारी त्यांनी यशस्वीतारित्या पार पाडलेली आहे. यासोबतच विविध राज्यातील विधान सभा निवडणूकीत उमेदवार निवडीसाठी पक्षाने स्थापित केलेल्या स्क्रिनिंग कमिटीचे सुध्दा ते सदस्य राहिलेले आहेत.

एकविसाव्या शतकातील वैश्विक मित्रता अभियान अंतर्गत जपान इंटरनॅशनल कॉर्पोरेशनच्यावतीने 1996 मध्ये जपान या देशांमध्ये आयोजित आंतरराष्ट्रीय युवा परिषदेसाठी त्यांनी 20 भारतीय युवक प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व केलेले आहे.