संजय राऊत, दानवेंच्या अडचणी वाढणार? नितेश राणेंची विधिमंडळ सचिवांकडे तक्रार

भागवत हिरेकर

25 Sep 2023 (अपडेटेड: 25 Sep 2023, 05:56 AM)

संजय राऊत आणि अंबादास दानवे यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याबद्दल केलेल्या विधानांवर भाजप आमदार नितेश राणे यांनी आक्षेप घेतला आहे. त्यांनी दोन्ही नेत्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Nitesh Rane took objection on sanjay raut and ambadas danve statements about maharashtra assembly speaker rahul narvekar.

Nitesh Rane took objection on sanjay raut and ambadas danve statements about maharashtra assembly speaker rahul narvekar.

follow google news

Nitesh Rane Sanjay Raut : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याबद्दल केलेल्या विधानांमुळे खासदार संजय राऊत आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे अडचणीत येण्याची शक्यता आहे. भाजप आमदार नितेश राणे यांनी थेट विधिमंडळ सचिवांना पत्र लिहिलं आहे. विशेषाधिकार भंग केल्या प्रकरणी कारवाई करण्याची मागणी नितेश राणेंनी केली आहे.

हे वाचलं का?

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केलेल्या विधानांवर आमदार नितेश राणे यांनी बोट ठेवलं आहे. याबद्दल त्यांनी विधिमंडळ सचिवांना पत्र पाठवलं आहे.

आमदार नितेश राणेंच्या पत्रात काय?

नितेश राणेंनी पत्रात म्हटलंय की, राज्यसभा सदस्‍य संजय राऊत यांनी नजिकच्‍या काळात विधानसभा अध्‍यक्षांसंदर्भात पुढील वक्‍तव्‍ये केली आहेत.

1) “संविधान, कायदा व विधीमंडळाशी बेईमानी करुन वेळकाढूपणा चाललाय. घटनात्‍मक पदावर बसलेले विधानसभा अध्‍यक्ष घटनाबाह्य सरकारला चालवित आहेत काय?”

समजून घ्या >> Women Reservation : 5 कारणं… महिलांना राजकारणात 33 टक्के आरक्षण का आवश्यक?

2) “आम्‍ही करु ते खरं अशी बादशाही विधानसभा अध्‍यक्ष करीत असतील तर ती बादशाही बुडाल्‍याशिवाय रहाणार नाही.”

3) “विधानसभा अध्‍यक्ष फुटले आहेत.”

नितेश राणे यांनी अंबादास दानवे यांनी केलेल्या विधानांचाही उल्लेख केला आहे. ते म्हणाले आहेत की, विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विधानसभा अध्‍यक्षांच्‍या संदर्भात पुढील प्रमाणे वक्‍तव्‍य केले. “उशीरा न्‍याय देणे हा सुद्धा अन्‍याय असतो आणि तो अन्‍याय विधानसभा अध्‍यक्ष करीत आहेत.”

नितेश राणेंनी संजय राऊत, अंबादास दानवेंवर कारवाईची केली मागणी

विधिमंडळ सचिवांना लिहिलेल्या पत्रात नितेश राणेंनी म्हटलंय की, “विधानसभा अध्‍यक्षांसमोर सध्‍या पक्षांतरबंदी विषयी एका प्रकरणाची सुनावणी सुरु आहे. या प्रकरणामध्‍ये उपरोक्‍त दोन्‍ही व्‍यक्‍तींचे राजकीय हितसंबंध आहेत. या पार्श्‍वभूमीवर वर नमूद वक्‍तव्‍ये करुन त्‍यांनी विधानसभा अध्‍यक्षांवर अनुचित दबाव व प्रभाव टाकण्‍याची कृती केली असून त्‍याद्वारे विधानसभा अध्‍यक्षांचा व पर्यायाने विधानसभेचा अधिक्षेप केला आहे.”

समजून घ्या >> Shiv Sena Mlas case : सरन्यायाधीशांचे विधानसभा अध्यक्षांना खडेबोल, 9 मुद्दे कोणते?

“यांचे अशा प्रकारचे स्फोटक भाष्य केल्यामुळे अध्यक्षांवर एक प्रकारे दबाव टाकण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न होत आहे. यामुळे लोकशाहीच्या हितासाठी या प्रवृत्तीला मुळासकट आळा घालण्यासाठी त्यांच्या बोलण्यावर तात्काळ बंदी आणणे अत्यंत गरजेचे आहे व त्या अनुसार कारवाई करावी अशी मागणी करतो”, आमदार नितेश राणेंनी पत्रात म्हटलं आहे.

“वस्‍तुस्थिती पाहता सर्वश्री संजय राऊत व अंबादास दानवे यांच्‍या विरुद्ध योग्‍य ती कारवाई करण्‍यासाठी हे प्रकरण विशेषाधिकार समितीकडे तात्‍काळ सुपूर्द करावे व यावर विनाविलंब निर्णय घ्यावा असे निर्देश देण्यात यावे , ही विनंती”, अशी मागणी नितेश राणेंनी केली आहे.

    follow whatsapp