Pune Mahanagar Palika Election 2026 : पुण्यासह राज्यातील 29 महापालिका निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा मंगळवारी (दि.30) शेवटचा दिवस होता. दरम्यान, पुणे महापालिकेसाठी उमेदवारांच्या याद्या जाहीर न करता थेट एबी फॉर्म वाटले गेल्याने कोण निवडणूक लढवत आहे? याची माहिती समोर आली नव्हती. आता मात्र, प्रत्येक पक्षाच्या उमेदवारांची नावं समोर येत आहे. आपल्या पक्षाचे जास्त नगरसेवक निवडून यावेत, यासाठी राजकीय पक्षांनी गुंडाच्या घरात उमेदवारी देण्याची स्पर्धा सुरु केली आहे. मात्र, शहर गुन्हेगारीमुक्त व्हावं अशी नागरिकांची अपेक्षा असतानाच, राजकीय पक्षांकडून घेतले जाणारे निर्णय वादाच्या भोवऱ्यात सापडत आहेत. विशेषतः गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलंय.अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने ज्या पद्धतीने उमेदवारांची निवड केली, त्याच धर्तीवर आता भाजपही पुढे सरसावल्याचं चित्र दिसत आहे.
ADVERTISEMENT
अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून गज्या मारणेच्या पत्नीला उमेदवारी
राष्ट्रवादी काँग्रेसकडून गजानन मारणेच्या पत्नी जयश्री मारणे यांना उमेदवारी दिल्यानंतर पुण्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. या पार्श्वभूमीवर भाजपनेही अशाच स्वरूपाचा निर्णय घेतल्याचं समोर आलंय. प्रभाग क्रमांक 11 मधून भाजपने गुंड शरद मोहोळ याच्या पत्नी स्वाती मोहोळ यांना अधिकृत उमेदवारी दिली असून, त्यांच्या नावामुळे हा प्रभाग सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.
शरद मोहोळ याच्या पत्नीला भाजपकडून उमेदवारी
स्वाती मोहोळ या कुख्यात गुंड शरद मोहोळ यांच्या पत्नी आहेत. रामबाग कॉलनी आणि शिवतीर्थनगर परिसरातून त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. काही महिन्यांपूर्वीच शरद मोहोळची टोळीयुद्धातून हत्या झाली होती. त्यानंतर लगेचच त्यांच्या पत्नीला थेट निवडणूक राजकारणात उतरवण्याचा भाजपचा निर्णय अनेकांच्या भुवया उंचावणारा ठरला आहे. पुण्यात एका बाजूला कायदा-सुव्यवस्थेचा मुद्दा, तर दुसऱ्या बाजूला अशा पार्श्वभूमीतील कुटुंबीयांना तिकीट देण्याची भूमिका यामुळे भाजपवरही टीकेची झोड उठत आहे.
याआधी राष्ट्रवादी काँग्रेसने गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबांतील व्यक्तींना उमेदवारी दिल्यानंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त झाला होता. आता भाजपनेही तसाच मार्ग स्वीकारल्याने सोशल मीडियावर टीकेची झोड उठली आहे. कोथरूड विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या या प्रभागात स्वाती मोहोळ यांच्या एन्ट्रीमुळे निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. स्थानिक पातळीवरील जुने कार्यकर्ते, पक्षनिष्ठ मतदार आणि सर्वसामान्य नागरिकांचा कल नेमका कुणाकडे झुकतो, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.
स्वाती मोहोळ यांनी 2023 मध्ये केला होता भाजपमध्ये प्रवेश
दरम्यान, स्वाती मोहोळ यांनी 2023 मध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला होता. कोथरूडचे आमदार व मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्षात प्रवेश केला तेव्हाच विरोधकांनी तीव्र आक्षेप घेतला होता. कुख्यात गुन्हेगाराच्या पत्नीला भाजपमध्ये सामावून घेण्यावरून त्यावेळीही प्रश्न उपस्थित झाले होते. आता थेट तिकीट देण्यात आल्याने हा वाद अधिकच चिघळण्याची चिन्हं आहेत. एकीकडे पुणे सुरक्षित, गुन्हेगारीमुक्त व्हावं अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत असताना, दुसरीकडे राजकीय पक्षांकडून उमेदवारीसाठी घेतले जाणारे हे निर्णय आगामी निवडणुकीत कितपत स्वीकारले जातील, हे निकालातूनच स्पष्ट होणार आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
शेजारच्या महिलेसोबत पतीचं अफेअर... पत्नीला कल्पना सुद्धा नव्हती अन् अचानक पतीचं टोकाचं पाऊल!
ADVERTISEMENT











