'तुम्ही विद्यार्थ्यांची माफी मागा', लाठीचार्जवरुन राहुल गांधी पीएम मोदींवर भडकले

मुंबई तक

21 Jul 2026 (अपडेटेड: 21 Jul 2026, 01:04 PM)

rahul gandhi on pm narendra modi : देशातील शिक्षण आणि परीक्षा व्यवस्था पूर्णपणे कोलमडल्याचा आरोप करत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांची माफी मागावी, अशी मागणी केली. विद्यार्थ्यांवरील पोलिस कारवाई तातडीने थांबवण्याचे आवाहनही त्यांनी केले.

rahul gandhi on pm narendra modi

rahul gandhi on pm narendra modi

Google CTA

बातम्या हायलाइट

point

'तुम्ही विद्यार्थ्यांनी माफी मागा'

point

लाठीचार्जवरुन राहुल गांधी पीएम मोदींवर भडकले

Rahul Gandhi on Narendra Modi : "लोकसभेचे सभापती चर्चेसाठी सरकारची परवानगी घ्यावी लागेल म्हणतात. हे त्यांनी आम्हाला उघडपणे सांगितलंय. हा प्रश्न विद्यार्थ्यांचा आहे. तरुणांच्या भविष्याचा विषय आहे. लोकांना मारलं जातंय.. काल जे घडलं, त्याबाबत मोदीजींनी माफी देखील मागितलेली नाही. हे तरुण शिक्षण व्यवस्था आणि परीक्षा व्यवस्थेबाबत आंदोलन करत आहेत. शिक्षण आणि परीक्षा व्यवस्था मोडकळीस आलीये, हे संपूर्ण देश जाणतोय",असं लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी म्हणाले आहेत. ते संसद परिसरात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. 

हे वाचलं का?

हेही वाचा : 'आमच्या शिष्टमंडळाला नजरकैद करण्यात आलं...' दिपकेंनी काय सांगितलं? आंदोलनाची पुढील दिशा काय?

आंदोलकांवरील पोलिसी कारवाई थांबवा, राहुल गांधींचं आवाहन 

विद्यार्थी करत असलेल्या तक्रारी पूर्णपणे योग्य असल्याचे सांगत राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मौनावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांची माफी मागावी आणि त्यांच्यावर सुरू असलेली पोलिस कारवाई तात्काळ थांबवावी, अशी मागणी राहुल गांधी यांनी केली.

पुढे बोलताना राहुल गांधी म्हणाले की, काँग्रेस पक्षाने विद्यार्थ्यांचा हा मुद्दा सातत्याने उपस्थित केला असून सरकारसमोर अनेक वेळा प्रेझेंटेशन देखील केले आहे. मात्र, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर योग्य तो प्रतिसाद मिळालेला नाही. सरकार विद्यार्थ्यांच्या भविष्याबाबत चिंतित असल्याचा दावा करत असले तरी मूळ प्रश्न कारवाईचा नसून देशातील तरुणांशी होत असलेल्या वागणुकीचा आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. तरुणांसाठी जवळपास सर्वच संधींचे मार्ग बंद झाले असून स्पर्धा परीक्षाच त्यांच्यासाठी एकमेव आशेचा किरण होता, तोही आता उद्ध्वस्त करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.

हेही वाचा : जंतर-मंतरवर आंदोलक पुन्हा जमायला सुरुवात, जोरदार घोषणाबाजी सुरु

RSS च्या प्रचारकांना विद्यापीठांचे कुलगुरू बनवलं जातंय - राहुल गांधी 

यावेळी राहुल गांधी यांनी उद्योगपती अदानी आणि अंबानी यांचा प्रभाव वाढत असल्याचाही आरोप केला. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने शिक्षण व्यवस्थेवर वर्चस्व मिळवले असून प्रचारकांना विद्यापीठांचे कुलगुरू बनवले जात असल्याचा दावा त्यांनी केला. विद्यार्थ्यांकडे छोटासा व्यवसाय सुरू करण्याइतकेही पैसे नसल्याची परिस्थिती असल्याचे सांगत त्यांनी लवकरच विद्यार्थ्यांची भेट घेणार असल्याचेही जाहीर केले.

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर राहुल गांधी म्हणाले की, त्यांनी राजीनामा द्यायलाच हवा. मात्र, लाठीचार्ज हा गृह मंत्रालयाच्या अखत्यारीत झाल्यामुळे केंद्रीय गृहमंत्र्यांनीही राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. या संपूर्ण प्रकरणाची अंतिम जबाबदारी पंतप्रधानांवर असल्याचे सांगत राहुल गांधी यांनी सरकारवर जोरदार टीका केली.