Rahul Gandhi On Delimitation : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी महिला आरक्षण विधेयकावरून केंद्र सरकारवर कडाडून टीका केली असून, हे विधेयक म्हणजे महिला सक्षमीकरण नसून सत्ता बळकावण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे. गांधी यांनी असा दावा केला की, महिला आरक्षण विधेयक 2023 मध्येच मंजूर झाले असताना, आता नव्याने आणले जाणारे बदल हे देशाचा निवडणूक नकाशा बदलण्याचा घाट घालत आहेत. हे विधेयक अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST) आणि ओबीसी (OBC) समुदायांच्या विरोधात असून, त्यांचे हक्क हिरावून घेण्याचा हा एक अजेंडा आहे, अशी टीका त्यांनी केली. सरकारने यापूर्वी आसाम आणि जम्मू-काश्मीरमध्ये जे प्रयोग केले, तेच आता संपूर्ण देशात राबवून सत्ता हस्तगत करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे त्यांनी नमूद केले.
ADVERTISEMENT
राहुल गांधींच्या भाषणादरम्यान गदारोळ
राहुल गांधींच्या या आक्रमक भाषणामुळे लोकसभेत जोरदार गोंधळ पाहायला मिळाला. परिसीमन विधेयक राष्ट्रविरोधी असल्याचे सांगत त्यांनी सरकारवर निशाणा साधला आणि दक्षिण तसेच उत्तर भारतामध्ये भेदभाव केला जात असल्याचा आरोप केला. दलित आणि आदिवासींची भागीदारी सातत्याने कमी केली जात असून, हे विधेयक त्यांच्या प्रगतीच्या आड येणारे आहे, असेही ते म्हणाले. गांधींच्या या विधानांवर संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी तीव्र आक्षेप नोंदवला. काँग्रेसनेच नेहमी ओबीसी आरक्षणाला विरोध केला, असा पलटवार रिजिजू यांनी केला.
हे ही वाचा : मोठी बातमी! पिकलेले केस अन् तोंडाला मास्क, वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
जादूगाराची गोष्ट
सरकार घाबरलेले असून आपल्या चुका लपवण्यासाठी जादुगारासारखे नवे डावपेच आखत आहे, अशी बोचरी टीका त्यांनी केली. यावेळी त्यांनी एका जादुगाराची गोष्ट सांगत टोला लगावला की, एका चुकीमुळे जादुगाराची जादू कशी संपली, तसेच काहीसे सरकारचे झाले आहे. याशिवाय, त्यांनी देशातील बड्या उद्योगपतींच्या हस्तक्षेपावरही अप्रत्यक्षपणे भाष्य करत सरकार केवळ त्यांच्या फायद्यासाठी काम करत असल्याचे सूचित केले.
हे ही वाचा : मोठी बातमी! अशोक खरातचे निकटवर्तीय जितेंद्र शेळकेंचं निधन, समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात
इंदिरा गांधींच्या आठवणींना उजाळा
शेवटी, राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या आठवणींना उजाळा दिला. "माझ्या आजीने मला बागेत फिरताना एक महत्त्वाची गोष्ट सांगितली होती की, खरी ताकद ती असते जी नम्रपणे काम करते आणि स्वतःचे प्रदर्शन कधीच करत नाही," असे सांगत त्यांनी सरकारला अहंकार सोडण्याचा सल्ला दिला. दक्षिण भारतावर अन्याय होत असल्याचा पुनरुच्चार करत त्यांनी हे विधेयक लोकशाहीच्या मूल्यांच्या विरोधात असल्याचे म्हटले. विरोधक म्हणून आम्ही सरकारचा हा मनसुबा कधीही यशस्वी होऊ देणार नाही, असा निर्धारही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
ADVERTISEMENT











