Raj Thackeray on Minister Jitendra Singh, Mumbai : केंद्रीय विज्ञान-तंत्रज्ञान मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी सोमवारी केलेल्या वक्तव्यामुळे नव्या वादाची चिन्हे दिसू लागली आहेत. “आयआयटी बॉम्बेच्या नावातील ‘बॉम्बे’ हेच तसे कायम ठेवण्यात आले, ते ‘मुंबई’ करण्यात आले नाही, हे योग्यच झाले,” असे वक्तव्य त्यांनी केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे येऊ घातलेल्या महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय चर्चा रंगण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आयआयटी मुंबईच्या पी. सी. सक्सेना सभागृहात झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी त्यांनी क्वांटम तंत्रज्ञान, वैद्यकीय क्षेत्रात तंत्रज्ञानामुळे झालेले बदल, संशोधनाच्या नव्या वाटा आदी विषयांवर भाष्य केले. याच दरम्यान त्यांनी आयआयटी मुंबईच्या नावाबाबत समाधान व्यक्त केले. दरम्यान, जितेंद्र सिंह यांच्या वक्तव्याबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केलाय. त्यांनी X आणि फेसबुक या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत केंद्रीय मंत्र्यांवर टीका केली आहे.
ADVERTISEMENT
राज ठाकरे यांची पोस्ट जशीच्या तशी
केंद्रीय विज्ञान-तंत्रज्ञान मंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांनी मुंबईत आयआयटीच्या कार्यक्रमात बोलताना, 'आयआयटीच्या नावातील बॉंबे तसंच ठेवलं त्याचं मुंबई केलं नाही, हे चांगलं झालं असं विधान केलं'. जितेंद्र सिंग यांचं विधान हे सरकारच्या मानसिकतेचं एक प्रतीक आहे असं स्पष्ट दिसतंय. आणि ही मानसिकता काय आहे ? तर मुंबई जी मराठी माणसाची होतीच , तिला महाराष्ट्रापासून पासून वेगळं करण्याचा डाव मराठी नेत्यांनी आणि जनतेने उधळून लावला. आणि आपली मराठी मुंबई महाराष्ट्रातच राहिली. त्याबद्दलची गेली अनेक दशकं यांच्या पोटात साचलेली मळमळ पुन्हा एकदा बाहेर ओकायला सुरुवात केली आहे !
हेही वाचा : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं काय होणार? सर्वोच्च न्यायालयात आज नेमकं काय घडलं?
खरंतर जितेंद्र सिंग यांचा मुंबईशी काही संबंध नाही, ना महाराष्ट्राशी, ना गुजरातशी. ते येतात जम्मूमधून.. पण आपल्या शीर्ष नेतृत्वाच्या मनात काय चाललं आहे ते ओळखून तसं बोलून शाबासकी मिळवणे हाच त्यांचा उद्देश आहे.
या निमित्ताने फक्त मुंबई नाही तर आता एमएमआर परिसरात राहणाऱ्या तमाम मराठी जनांना माझं आवाहन आहे की, आता तरी डोळे उघडा. यांना 'मुंबई' हे नाव खटकतं कारण हे नाव आपल्या मुंबा आईच्या म्हणजे मुंबईची जी मूळची देवी आहे तिच्या नावावरून हे नाव घेतलं आहे. त्या देवीची सगळी लेकरं म्हणजे इथे पिढ्यानपिढ्या राहणारी मराठी माणसं. तुम्ही आणि तुमचं शहर यांना खुपतंय.
आज केंद्र सरकारने तिकडे चंदिगढ शहर पंजाबच्या हातातून काढून घ्यायचा प्रयत्न केला. त्याला सर्वपक्षीय विरोध झाला म्हणून त्यांनी माघार घेतली, पण ती तात्कालिक माघार आहे. असाच काहीतरी डाव मुंबईच्या बाबतीत १००% शिजत असणार. 'मुंबई' नको 'बॉंबे'च हवं यातून हळूच हे शहर ताब्यात घेण्याचा प्रयत्न नक्की सुरु आहे. आधी मुंबई आणि मग संपूर्ण एमएमआर परिसर ताब्यात घेऊन तो गुजरातला जोडण्याचा प्रयत्न सुरु आहे ! तेंव्हा मराठी माणसा जागा हो. इथे आधीच केंद्रीय हस्तक उद्योगपती इत्यादींनी काय काय ताब्यात घ्यायला सुरु केलं आहे हे आपण रोज पाहतो आहोतच ! आतातरी मराठी माणसांना हे कळायला हवं !
इतर महत्त्वाच्या बातम्या
माजी आमदार निर्मला गावित यांना कारने दिली धडक, हादरवून टाकणारी अपघाताची घटना, रुग्णालयात दाखल
ADVERTISEMENT











