Saayoni Ghosh : पश्चिम बंगालमधील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून तृणमूल काँग्रेसच्या संसदीय दलात उभी फूट पडल्याचे स्पष्ट झाले आहे. पक्षातील 20 बंडखोर खासदारांनी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिरला यांना पत्र लिहून संसदेत आमच्या वेगळ्या गटाला मान्यता देण्याची मागणी केली आहे. या बंडखोर खासदारांच्या यादीत जादवपूरच्या खासदार आणि प्रसिद्ध अभिनेत्री सयानी घोष यांचे नाव समाविष्ट असल्याने ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांच्यासाठी हा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे. पत्रात अभिषेक बॅनर्जी यांच्याऐवजी काकोली घोष दस्तीदार यांना टीएमसी संसदीय दलाचे नेते म्हणून नियुक्त करण्याची मागणी करण्यात आली आहे, ज्यामुळे पक्षात अंतर्गत संघर्ष शिगेला पोहोचल्याचे दिसत आहे.
ADVERTISEMENT
सयानी घोष यांची राजकीय कारकीर्द
सयानी घोष यांची राजकीय कारकीर्द नेहमीच चर्चेत राहिली आहे. 2021 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी टीएमसीमध्ये सामील झालेल्या सयानी यांनी आसनसोलमधून निवडणूक लढवली होती, मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. तरीही, त्यांनी हार न मानता राजकारणात सक्रिय राहणे पसंत केले. त्याच वर्षी त्रिपुरातील स्थानिक निवडणुकीदरम्यान 'खेला होबे' अशी घोषणाबाजी केल्याप्रकरणी त्यांना अटकही झाली होती. 2023 मध्ये टीएमसीच्या युवा विंगच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळल्यानंतर, पश्चिम बंगालमधील कथित भरती घोटाळ्याप्रकरणी ईडीच्या चौकशीमुळे त्या पुन्हा एकदा प्रकाशझोतात आल्या होत्या.
हेही वाचा : आकांक्षाने प्रेमविवाह केला, कुटुंबियांनी एकत्र होऊन सूड उगवला!
खासदार बनल्या, प्रचारही केला पण ऐनवेळी साथ सोडली
सयानी घोष या 1993 मध्ये कोलकाता येथे जन्मलेल्या असून त्या बंगाली चित्रपटसृष्टीतील एक लोकप्रिय चेहरा आहेत. आपल्या वादग्रस्त विधानांसाठी आणि आक्रमक स्वभावासाठी त्या ओळखल्या जातात. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान गायलेल्या एका गाण्यावरून त्यांच्यावर मुस्लिम तुष्टीकरणाचे आरोप झाले होते, तर एका जनसभेदरम्यान त्यांनी दिलेल्या विधानावर भाजपने कडाडून टीका केली होती. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत जादवपूर मतदारसंघातून विजयी झाल्यानंतर त्या संसदेत पोहोचल्या. 2026 च्या विधानसभा निवडणुकीत स्टार प्रचारक म्हणून सक्रिय असलेल्या सयानी घोष यांचा अचानक टीएमसीच्या विरोधात बंड करणे हे राजकीय समीकरणांना कलाटणी देणारे आहे.
या बंडात सयानी घोष यांच्यासोबत अरुप चक्रवर्ती, पार्थ भौमिक, शताब्दी रॉय, जगदीश वसुनिया, काकोली घोष दस्तीदार, प्रसून बनर्जी, कालीपदा सोरेन, शर्मिला सरकार, जून मालिया, वापी हलदर, असित मल आणि सुवेंदु शेखर रॉय यांसारख्या प्रमुख खासदारांचा समावेश आहे. एकूण 20 खासदारांनी स्वाक्षरी केलेले हे पत्र लोकसभा अध्यक्षांना सादर करण्यात आले आहे. या घडामोडींमुळे तृणमूल काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी अधिक तीव्र झाली असून, आगामी काळात पक्षाच्या नेतृत्वावर याचे गंभीर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
ADVERTISEMENT











