‘पुन्हा एकदा फक्त आणि फक्त तथ्य सांगतो!’; आदित्य ठाकरेंनी 6 वर्षानंतरही ठणकावून सांगितलं!

मुंबई तक

• 07:50 PM • 16 Sep 2026

दिशा सालियन प्रकरणावर आदित्य ठाकरे यांनी सोशल मीडियावरून भूमिका स्पष्ट केली आहे. “मी दिशाला कधीही भेटलो नाही,” असं सांगत त्यांनी गेल्या सहा वर्षांपासून नाव जोडण्याचा हेतुपुरस्सर प्रयत्न होत असल्याचा आरोप केला.

Mumbai Tak
Google CTA

मुंबई: दिशा सालियन मृत्यू प्रकरण पुन्हा चर्चेत आल्यानंतर शिवसेना (UBT) नेते आदित्य ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. गेल्या सहा वर्षांपासून राजकीय हेतूने आणि वैयक्तिक द्वेषातून या प्रकरणाशी आपलं नाव जोडण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

हे वाचलं का?

आदित्य ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये स्पष्ट शब्दांत म्हटलं आहे की, “मी दिशा सालियन यांना कधीही भेटलेलो नाही किंवा त्यांच्याशी माझी ओळखही नव्हती.”

‘पुरावा नसताना नाव जोडण्याचा प्रयत्न’

दिशा सालियन यांच्या मृत्यूशी आपला कोणताही संबंध नसतानाही काही लोकांकडून गेल्या सहा वर्षांपासून आपलं नाव या प्रकरणाशी जोडण्याचा हेतुपुरस्सर प्रयत्न सुरू असल्याचं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. राजकीय हेतू, वैयक्तिक द्वेष आणि चारित्र्यहनन करण्याच्या उद्देशाने हे केलं जात असल्याचा दावा त्यांनी केला.

हे ही वाचा>> दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची सीबीआय चौकशी करणार, FIR दाखल

तसंच, तथ्य आणि सत्य नसलेलं हे सातत्याने सुरू असलेलं “खोटं कॅंपेन” दुर्दैवी असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

‘मीडिया ट्रायलने सत्य बदलणार नाही’

आदित्य ठाकरे यांनी टीव्ही चॅनेलवरील चर्चांवरही निशाणा साधला. मोठ्या आवाजात केल्या जाणाऱ्या चर्चा आणि मीडिया ट्रायल्समुळे सत्य बदलणार नाही, असं त्यांनी म्हटलं.

त्याचवेळी या प्रकरणाचा तपास अधिकृत यंत्रणांनी कोणत्याही व्यत्ययाशिवाय, राजकीय हस्तक्षेपाशिवाय आणि निःपक्षपातीपणे करावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

दिशा सालियन प्रकरणात CBI तपास

दरम्यान, दिशा सालियन यांच्या मृत्यू प्रकरणात CBIने FIR दाखल केली आहे. 2020 मधील या प्रकरणाच्या तपासाचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर देण्यात आले. CBIकडून आधीच्या तपासातील कागदपत्रे, संबंधित पोलिस अधिकाऱ्यांची विधाने, साक्षीदार आणि इतर पुराव्यांचा फेरआढावा घेतला जाण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा>> दिशा सालियन प्रकरण CBI कडे गेल्यावर आदित्य ठाकरेंनी दिली 'ही' पहिली प्रतिक्रिया

CBIच्या FIRमध्ये आदित्य ठाकरे यांच्यासह काही इतर व्यक्तींच्या भूमिकेची चौकशी करण्याचा उल्लेख असल्याचं वृत्त आहे. मात्र, या टप्प्यावर या व्यक्तींना आरोपी म्हणून घोषित करण्यात आलेलं नाही, अशी माहितीही समोर आली आहे. तपासादरम्यान भूमिका स्पष्ट झाल्यानंतर पुढील कायदेशीर प्रक्रिया होऊ शकते.

‘अधिकृत यंत्रणांना चौकशी करू द्या’

या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी अधिकृत यंत्रणांना तपास करू देण्याची भूमिका मांडली आहे. राजकीय हस्तक्षेप, चारित्र्यहनन किंवा पूर्वग्रह न ठेवता चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली. त्यांनी आपल्या पोस्टच्या शेवटी स्पष्ट केलं की, चारित्र्यहनन आणि खोट्या प्रचाराच्या माध्यमातून आपल्याला शांत बसवता येईल, असं ज्यांना वाटत असेल तो त्यांचा भ्रम आहे.

“सत्यासाठी, अन्यायाविरुद्ध, देशवासीयांना सोबत घेऊन आमचा लढा सुरुच राहील,” असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, दिशा सालियन यांच्या कुटुंबीयांकडून या प्रकरणाच्या नव्याने होणाऱ्या तपासाबाबत वेगळी भूमिका मांडण्यात आली आहे. दिशा सालियन यांचे वडील सतीश सालियन यांनी CBI तपासावर विश्वास व्यक्त केला असून, तपासातून सत्य समोर येईल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

त्यामुळे आता CBIच्या तपासात नेमके कोणते पुरावे समोर येतात आणि या प्रकरणातील विविध दाव्यांची अधिकृत चौकशीत काय पडताळणी होते, याकडे लक्ष लागलं आहे.