Manoj Jarange Press Conference : मुंबईतील मराठा आंदोलनासाठी आझाद मैदानात उपोषण करण्याची तयारी मनोज जरांगे पाटील यांनी केली होती. मात्र, मुंबई पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी नाकारली आहे. गणेशोत्सवाच्या काळात मोठ्या संख्येने मराठा आंदोलक मुंबईत आल्यास कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असे कारण पोलिसांनी दिले आहे. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या आंदोलनाची रणनीती बदलण्याचा निर्णय घेतला आहे. आता संपूर्ण मराठा आंदोलकांना सोबत घेऊन मुंबईत जाण्याऐवजी आपण स्वतः काही सहकाऱ्यांसह मुंबईला जाणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. त्यानुसार ते चार ते पाच सहकाऱ्यांसह मुंबईकडे रवाना होणार आहेत. पोलिसांनी परवानगी नाकारली असली तरी आपल्याला मुंबईत येण्यापासून कोणीही रोखू शकत नाही, असे जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा : पोलिसांनी मुंबईतील आंदोलनाची परवानगी नाकारली, आता मनोज जरांगेंची पहिली प्रतिक्रिया
‘आधी मी एकटा खिंड लढतो’
अंतरवाली सराटी येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या नव्या रणनीतीची माहिती दिली. पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर आता रणनीतीत बदल करावा लागणार असल्याचे त्यांनी सांगितले. मोठ्या संख्येने मराठे मुंबईत गेल्यास अडचणी निर्माण होतील, असे सांगितले जात असेल तर आपण एकट्याने मुंबईला गेल्यावर परवानगी देणार का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. आपण आधी एकट्याने खिंड लढणार असून मराठ्यांच्या मार्गातील अडथळे दूर करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले. त्यामुळे मुंबईच्या आंदोलनासाठी तयार केलेल्या गाड्या आणि जमा केलेली वर्गणी तशीच ठेवावी, त्यातील एक रुपयाही खर्च करू नये, असे आवाहन त्यांनी मराठा बांधवांना केले. एकाच दिवसात संपूर्ण ताकद खर्च न करता राखीव फौज ठेवण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा : Maharashtra Weather : गणेशोत्सवाच्या आगमनादिवशी वरुणराजाची दमदार हजेरी, IMD चा अलर्ट
'पुढील पाच-सहा दिवसांचा प्रवास जीवघेणा’
मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या पुढील प्रवासाबाबतही माहिती दिली. आपण सलाईन काढली असून त्यामुळे पोटात आग होण्यास सुरुवात झाली असल्याचे त्यांनी सांगितले. पुढील पाच-सहा दिवसांचा प्रवास जीवघेणा असल्याचेही त्यांनी म्हटले. प्रवासादरम्यान मुक्कामासाठी कोणाच्याही घरी न राहता चौकात राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ही शेवटची झुंज असल्याचे सांगत एकाच दिवशी आपली सर्व ताकद खर्च करायची नाही, असे त्यांनी मराठा बांधवांना सांगितले. शिवाजी महाराजांनी ज्याप्रमाणे राखीव फौज ठेवली, त्याचप्रमाणे आपलीही ताकद राखून ठेवायची आहे, असे जरांगे पाटील म्हणाले. त्यामुळे आपण घेतलेल्या निर्णयामुळे नाराज होऊ नका आणि आधी आपल्याला खिंड लढू द्या, असे आवाहन त्यांनी केले.
15 सप्टेंबरला अंतरवाली सराटीतून निघणार
मुंबई पोलिसांनी आझाद मैदानातील उपोषणाला परवानगी नाकारल्यानंतर जरांगे पाटील यांनी एकट्याने मुंबईला जाण्याचा निर्णय जाहीर केला आहे. ते 15 सप्टेंबर रोजी सकाळी अंतरवाली सराटीतून निघणार आहेत. त्यानंतर पाटोदा, श्रीगोंदा, हडपसर आणि खोपोलीमार्गे त्यांचा प्रवास होणार असून 19 सप्टेंबर रोजी ते मुंबईत पोहोचणार आहेत. आता मुंबई पोलीस त्यांना मुंबईच्या वेशीवर रोखणार का, याकडे लक्ष लागले आहे. दरम्यान, जरांगे पाटील यांनी आपल्याला मुंबईत येण्यापासून रोखल्यास लाखो मराठे बिनापरवानगी मुंबईत दाखल होतील, असा इशाराही दिला आहे.
ADVERTISEMENT












