Asgar Ali Vohra : मीरा रोड येथील 81 वर्षीय असगर अली वोरा यांनी दिल्लीत त्यांचे शालेय मित्र आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन जमिनीच्या अतिक्रमणाबाबत तक्रार केली होती. भाईंदर येथील आपल्या मालकीच्या भूखंडावर स्थानिक भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्या बांधकाम कंपनीने बेकायदेशीर ताबा मिळवल्याचा गंभीर आरोप वोरा यांनी केला होता. थेट पंतप्रधानांपर्यंत हे प्रकरण पोहोचल्यानंतर स्थानिक राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. गुजरातच्या वडनगर येथील बीएन स्कूलमध्ये पंतप्रधान मोदींसोबत असगरअली वोरा यांनी शिक्षण घेतले आहे.
ADVERTISEMENT
मेहतांनी जमिनीची ताबा सोडला
पंतप्रधानांसोबत झालेल्या या उच्चस्तरीय भेटीनंतर अवघ्या काही दिवसांतच या वादग्रस्त जमीन प्रकरणाला मोठे वळण मिळाले आहे. भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी वादग्रस्त जमिनीचा ताबा सोडत असल्याची अधिकृत घोषणा मंगळवारी (15 सप्टेंबर) केली. एवढेच नव्हे तर, या भूखंडावर बांधकाम करण्यासाठी प्रशासनाकडून घेण्यात आलेली परवानगी रद्द करून ती परत सुपूर्द करण्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
हे ही वाचा : ठाकरेंचा 'तो' अधिकार शिंदेंना खुपला, आयोगानेही नाकारला! सुप्रीम कोर्टात मोठा मुद्दा
तक्रारही मागे घेतली
याशिवाय असगर अली वोरा यांच्याविरोधात यापूर्वी दाखल करण्यात आलेली तक्रारही मागे घेण्याचा निर्णय नरेंद्र मेहता यांनी घेतला आहे. पंतप्रधान मोदींच्या मध्यस्थीची चर्चा रंगल्यानंतर आमदारांनी घेतलेल्या या माघारीच्या निर्णयामुळे कोट्यवधी रुपयांच्या या जमीन वादावर अखेर पडदा पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या अनपेक्षित घडामोडींमुळे स्थानिक पातळीवर आणि राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.
हे ही वाचा : जरांगेंच्या भाषेवर मंत्रिमंडळात नाराजी, मुंबईच्या वेशीवर रोखण्याची मंत्र्यांची मागणी
कॅमेऱ्यासमोर प्रतिक्रियेस नकार
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर राजकीय वातावरण तापले असले तरी आमदार नरेंद्र मेहता यांनी कॅमेऱ्यासमोर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास स्पष्ट नकार दिला आहे. थेट पंतप्रधान कार्यालयाची दखल आणि आमदारांची अचानक झालेली माघार यामुळे मीरा-भाईंदर परिसरात हा विषय सध्या अत्यंत चर्चेचा ठरत असून, असगर अली वोरा यांना अखेर न्याय मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे.
ADVERTISEMENT












