मनोज जरांगे पाटील प्रचंड संतापले, एकनाथ शिंदेंवर जोरदार टीका

मुंबई तक

• 08:33 AM • 15 Sep 2026

मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. मराठा आरक्षण आणि त्यासाठी सुरू केलेल्या आंदोलनाचा मुद्दा उपस्थित करत मनोज जरांगे आक्रमक झाले. यावेळी एकनाथ शिंदेंना अरेतुरे करत त्यांनी संताप व्यक्त केला.

Manoj Jarange Patil

Manoj Jarange Patil

Google CTA

बातम्या हायलाइट

point

मनोज जरांगे पाटील प्रचंड संतापले

point

एकनाथ शिंदेंवर जोरदार टीका

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अत्यंत आक्रमक शब्दांत हल्लाबोल केला आहे. सत्ताधाऱ्यांशी चांगले संबंध ठेवल्यास कोणताही त्रास होत नाही, असा सल्ला देणाऱ्यांचा जरांगे पाटलांनी खरपूस समाचार घेतला. निवडणूक जिंकण्याच्या वेळी शिंदे यांना मनोज जरांगे आणि मराठा समाजाची आठवण होते, असा थेट आरोप करत त्यांनी शिंदेंचा एकेरी उल्लेख करत संताप व्यक्त केला. शिवसेना फुटल्यानंतर लागलेला गद्दारीचा डाग पुसण्यासाठी मराठ्यांची मदत लागली होती आणि संकटाच्या काळात घरात बसून मदतीचा टाहो फोडला जात होता, याची आठवण त्यांनी करून दिली.

हे वाचलं का?

मैत्रीला लाथ मारण्याची तयारी

आपल्या भाषेवरून टीका करणाऱ्यांवरही मनोज जरांगे यांनी कडाडून निशाणा साधला. शिवराळ भाषेचा मुद्दा उपस्थित करणारे काही मोजकेच लोक आहेत. गरीब मराठ्यांनी आणि मनोज जरांगे यांनी मदत केली नसती, तर आज हे प्रवक्ते कुठेही दिसले नसते, असे ते म्हणाले. पदाला, पैशाला आणि मैत्रीला लाथ मारण्याची तयारी दर्शवत, समाजाच्या हितासाठी आपण एका इंचही मागे हटणार नाही, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.

हे ही वाचा : Maharashtra Weather : राज्यात 'या' जिल्ह्यांत पाऊस सक्रिय, कुठे मध्यम तर... IMD चा अलर्ट

म्हणून चौकशा लावल्या

आंदोलनासाठी लागणाऱ्या आर्थिक मदतीचे समर्थन करताना जरांगे पाटील यांनी सांगितले की, राज्यभरातील हजारो गरीब मराठा बांधव स्वतःच्या दातृत्वाने या लढ्याला मदत करत आहेत. एवढा मोठा लढा एकट्या-दुकट्याने चालवता येत नाही; जसे गावात सप्ताह करायचा असल्यास सर्वांना मदतीचा हात लावावा लागतो, तसेच हे आंदोलनही सर्वांच्या सहकार्याने चालत आहे. आपल्याच समाजाच्या लेकरांना आणि मदत करणाऱ्यांना सरकार जाणीवपूर्वक चौकशांच्या जाळ्यात अडकवून संकटात आणत आहे, असा गंभीर आरोप त्यांनी केला.

हे ही वाचा : बारामतीत गरोदर महिलेवर लैंगिक अत्याचार करून खून, गुप्तांगावर जखमा

बावनकुळेंना इशारा

आंदोलनाला मदत करणाऱ्यांच्या लागणाऱ्या चौकशांवरून जरांगे यांनी चंद्रशेखर बावनकुळे आणि संबंधित प्रशासकीय विभागांना थेट इशारा दिला. आंदोलनातून मोकळे झाल्यावर ज्या ज्या सरकारी कार्यालयांकडून चुकीच्या पद्धतीने चौकशी लावली जाईल, त्या सर्व विभागांच्या आणि बावनकुळेंच्या मंत्रालयातील कार्यालयांना घेराव घालण्याचा इशारा त्यांनी दिला. सत्ताधाऱ्यांच्या जवळचे डॉक्टर, इंजिनिअर, कंत्राटदार आणि शिक्षकांच्याही चौकशा लावल्या तर तुम्हाला खरी झळ काय असते हे कळेल, अशा शब्दांत जरांगे पाटलांनी इशारा दिला आहे.