मालवण : आगामी नगरपालिका निवडणुकीची धामधूम सुरू असताना राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मालवण-कुडाळचे आमदार नीलेश राणे यांनी बुधवारी सायंकाळी केलेल्या अचानक स्टिंग ऑपरेशनमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली. राणे यांनी थेट भाजपचे जिल्हा चिटणीस विजय केनवडेकर यांच्या घरी प्रवेश करून तपासणी केली. यावेळी त्यांच्या घरातून मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम आढळल्याचा दावा त्यांनी केला. मात्र, भाजप नेते आणि मंत्री आशिष शेलार यांनी निलेश राणेंचे आरोप फेटाळले आहेत.
ADVERTISEMENT
स्टिंग ऑपरेशननंतर निवडणूक आयोग आणि पोलिसांचा पाचारण
स्टिंग ऑपरेशनदरम्यान राणे यांनी तात्काळ निवडणूक विभागाच्या पथकाला तसेच मालवण पोलिसांना घटनास्थळी बोलावून कारवाईची मागणी केली. भाजप प्रदेशाध्यक्षांच्या दौऱ्यानंतर स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांकडे मोठ्या प्रमाणावर रक्कम पोहोचली असल्याचा गंभीर आरोप राणेंनी केला. या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना विजय केनवडेकर यांनी संपूर्ण प्रकरण फेटाळून लावत सांगितले की, “ही रक्कम माझ्या बांधकाम व्यवसायातील आहे. घरात कोणताही बेकायदेशीर पैसा नाही. आमदार राणे यांनी केलेले सर्व आरोप चुकीचे आणि दिशाभूल करणारे आहेत.”
सिंधुदुर्गात युती तुटण्यामागे कोण?
युती तुटण्याच्या मुद्द्यावरूनही राणे यांचा भाजप नेतृत्वावर निशाणा चुकला नाही. सिंधुदुर्गात भाजप-शिवसेनेची युती न होण्यामागे वरिष्ठ नेतृत्व जबाबदार नसून भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भूमिका कारणीभूत असल्याचा आरोप त्यांनी केला. राणे म्हणाले की, “रत्नागिरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी शिवसेनेशी ताळमेळ साधला गेला. राजापूर, लांजा, चिपळूण येथेही तसेच झाले. मग सिंधुदुर्गाबाबत प्रदेशाध्यक्षांना नेमका काय राग आहे?” याच अनुषंगाने त्यांनी पुढे प्रश्न उपस्थित केला की, “चंद्रशेखर बावनकुळे आणि चंद्रकांत पाटील यांच्यासारख्यांनी प्रदेशाध्यक्षपदाची उंची वाढवली. परंतु आता काही नेते दोन-तीन जिल्ह्यांच्या राजकारणापुरतेच स्वतःला मर्यादित करून घेत आहेत. महायुती नाकारण्यात नेमका काय उद्देश आहे? हे अद्याप स्पष्ट नाही. याचे उत्तर फक्त रवींद्र चव्हाण देऊ शकतात.”
या संपूर्ण प्रकरणामुळे मालवण आणि सिंधुदुर्गातील राजकीय वातावरण अधिक चिघळले आहे. निवडणूक तोंडावर असताना स्टिंग ऑपरेशन, रोख रक्कमेबाबतचे आरोप-प्रत्यारोप आणि युती तुटण्याच्या चर्चा या सर्व घटनांमुळे स्थानिक राजकारणात अस्थिरता निर्माण झाली आहे. आगामी दिवसांत या प्रकरणात निवडणूक विभाग, पोलिस आणि पक्ष नेतृत्व कोणती भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
'गौतम गंभीर हाय हाय..' भारताच्या मोठ्या पराभवानंतर चाहत्यांची घोषणाबाजी, सिराज मदतीला धावला VIDEO
ADVERTISEMENT











