Sudhir Mungantiwar on sanjay raut, मुंबई Tak बैठक : राज्यात सुरु असलेलं पक्षांतर आणि फोडाफोडीच्या राजकारणावर काँग्रेस नेते नाना पटोले आणि भाजप नेते सुधीर मुनगंटीवर यांनी मुंबई Tak च्या बैठकीत समोर-समोर चर्चा केली. यावेळी नाना पटोले यांनी सत्ताधारी पक्षांवर जोरदार टीका केली. तर दुसरीकडे सुधीर मुनगंटीवर यांनी प्रत्युत्तर दिले. दरम्यान, पक्षांतराच्या मुद्द्यावरुन सुधीर मुनगंटीवार यांनी एक प्रकारे संजय राऊत यांचं कौतुक केलं. ते नेमकं काय म्हणाले? जाणून घेऊयात...
ADVERTISEMENT
"ईडी आणि सीबीआयमुळे माणसं आमच्याकडे येतात. तर मग संजय राऊत आमच्या पक्षात प्रवेश का करत नाहीत? शिवाय, राहुल गांधी आमच्या पक्षात का येत नाहीत?", असा सवाल सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित केला.
सुधीर मुनगंटीवार यावेळी बोलताना म्हणाले, आज आर.आर.पाटलांची आठवण होते. त्यांच्याबद्दल मला फार आदर आहे. ते मला घरी जेवायला बोलवायचे. मला राष्ट्रवादीत येण्याची ऑफर देऊन मंत्री करतो म्हणायचे. मात्र, मी माझ्या भूमिकेवर ठाम राहिलो. लोकं पक्ष का बदलतात? याची काही कारणं आहेत. प्रत्येकाला वाटतं आपल्या मतदारसंघाचा विकास 5 वर्षात झाला पाहिजे. तुम्ही (काँग्रेस) आत्तापर्यंत लोकं फोडले तर ते ईश्वरी कार्य होतं आता आम्ही केलं तर लोकशाहीवरुन प्रश्न विचारला जातो.
निधी मिळत नाही, खासदारांचा आरोप; मुनगंटीवार यांचं प्रत्युत्तर
पुढे बोलताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले, निधी मिळत नाही हा आरोप तर्कहीन आहे. लाडकी बहीण योजना काँग्रेस आमदाराच्या मतदारसंघात सुरु नाही का? कर्जमुक्ती काँग्रेस आमदाराच्या मतदारसंघात होणार नाही का? निधीबाबत भेदभाव केला जात नाही. पक्ष सोडताना त्यांना काहीतरी कारण द्यावं लागत असतं. ठाकरेंचं सरकार असताना त्यांच्याच आमदारांना उद्धव ठाकरे भेटत नव्हते. त्यांना निधी नव्हते. त्यामुळे 50 आमदार सोडून गेले.
सरकारला सर्वसामान्यांच्या प्रश्नांशी काही देणं-घेणं नाही - नाना पटोले
नाना पटोले यावेळी बोलतान् म्हणाले, शिवसेनेचे आमचे सहकारी काल शिंदेसेनेत गेले. सरकार त्यांनी दिलेल्या वचननाम्यात कुठेही खरे उतरत नाहीये. जनतेच्या मूळ मुद्द्यांना डायवर्ट करण्यासाठी ही फोडाफोडी वगैरे सुरु आहे. याला फोडा त्याला फोडा असं करुन सत्ता आणण्याचा प्रयत्न सुरु आहे. महाराष्ट्राची पुरोगामी म्हणून ओळख होती. मात्र, आता राजकारण लयास चाललेलं आहे. विधानसभेचं कामकाज ज्या पद्धतीने सुरु आहे, त्यामध्ये मंत्र्यांना लोकांच्या प्रश्नांशी देणं-घेणं नाही.
काही दिवसांपूर्वी लोकलमध्ये हत्या झाली. उत्तर महाराष्ट्रात एका महिलेवर सामुहिक अत्याचार झाला. यावर विधानसभेत आम्ही बोललो. त्याचं मंत्र्यांना काही देणं-घेणं नाही. सरकारकडून सामान्य लोकांना लुटलं जातंय. नरेंद्र मोदींनी राष्ट्रवादीने 70 हजार कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप करतात. त्यानंतर 8 दिवसात अजित पवार भाजपसोबत जातात. त्यांना राज्याच्या तिजोरीची चावी देण्यात येते, असा आरोपही नाना पटोले यांनी केला.
ADVERTISEMENT











