Big Breaking: CM फडणवीसांच्या नागपुरात दोन गटात तुफान राडा, दगडफेक आणि जाळपोळ

योगेश पांडे

17 Mar 2025 (अपडेटेड: 17 Mar 2025, 10:07 PM)

नागपुरात दोन गटात जोरदार दगडफेक झाली असून अनेक ठिकाणी जाळपोळ करण्यात आली. कबरीच्या वादावरून हा हिंसाचार झाला असल्याचं बोललं जात आहे.

फोटो सौजन्य: ANI

फोटो सौजन्य: ANI

Google CTA

नागपूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूरमध्ये दोन गटात तुफान राडा झाल्याचं प्राथमिक वृत्त नुकतंच हाती आलं आहे. नागपुरातील महल परिसरात जोरदार दगडफेक सुरू असून जाळपोळ देखील करण्यात आहे. या सगळ्या प्रकारामुळे सध्या नागपुरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे.

हे वाचलं का?

दरम्यान, अद्यापही या परिसरात दगडफेक आणि जाळपोळ सुरू असून हिंसाचार हा आटोक्यात आलेला नाही. त्यामुळे पोलीस दोन्ही गटांना शांत करण्याचा प्रयत्न करत आहेत. या हिंसाचारावर नियंत्रण आणण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या देखील फोडण्यात आल्या आहे. मात्र, तरीही दोन्ही गटातील लोकं मागे हटण्यास तयार नाहीत.

नागपुरात नेमकं काय घडलं?

औरंगजेबाच्या कबरीवरून नागपुरात मोठा वाद निर्माण झाला आहे. विश्व हिंदू परिषद (VHP) आणि बजरंग दल सारख्या हिंदू संघटना सतत कबर हटवण्याची मागणी करत आहेत. सोमवारी सकाळी नागपुरात त्यांच्या मागण्यांच्या समर्थनार्थ मोठे निदर्शने करण्यात आली. निषेधादरम्यान, काही संघटनांनी औरंगजेबाची 'कबर' प्रतीकात्मकपणे जाळली.

यामुळे नागपूरच्या महाल परिसरातील शिवाजी पुतळ्यासमोर मुस्लिम समाजाचे लोक जमले आणि त्यांनी निषेध केला. त्याचवेळी अचानक दगडफेक आणि जाळपोळ करण्यास सुरुवात झाली आणि वातावरण अधिक चिघळू लागलं.

नागपूर पोलीस घटनास्थळी दाखल

दरम्यान, या हिंसाचाराबाबत नागपूरचे डीसीपी अर्चित चांडक म्हणाले की, 'ही घटना काही गैरसमजामुळे घडली. आता परिस्थिती नियंत्रणात आहे. येथे आमचे पथक मजबूत आहे. मी सर्वांना बाहेर न पडण्याचं किंवा दगडफेक करण्याचे आवाहन करतो. दगडफेक होत होती, म्हणून आम्ही अश्रूधुराचा वापरही केला. इथे काही वाहनांना आग लावण्यात आली होती. त्यामुळे आम्ही अग्निशमन दलाला बोलावून आग विझवली.'

'दरम्यान, काही पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत, दगडफेकीत माझ्या पायालाही किरकोळ दुखापत झाली. पण आम्ही सर्वांना शांतता राखण्याचे आवाहन करतो. अफवांवर विश्वास ठेवू नका, कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नका आणि पोलिसांना सहकार्य करा. आम्ही कायदेशीर कारवाई करत आहोत.' असं ते या घटनेबाबत म्हणाले. 

दरम्यान, या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माहिती देण्यात आली असून त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना प्रशासनाला आदेश दिले आहेत.