कल्याण: मागील काही दिवसांपासून कल्याण-डोंबिवलीतील राजकीय उलथापालथ हा अवघ्या राज्यात चर्चेचा विषय ठरला आहे. 1995 पासून कल्याण-डोंबिवली महापालिकेवर बहुतांश वेळा शिवसेनेचाच भगवा फडकला आहे. मात्र, यंदा या भागात भाजपने आक्रमक रणनिती अवलंबली आहे. अशावेळी शिवसेना (शिंदे गट) आपली रणनिती कशा पद्धतीने आखणार आणि महापौर बनविण्यासाठी कोणते डावपेच खेळणार याकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलं आहे.
ADVERTISEMENT
मात्र, याचबाबत कल्याणमधील शिवसेनेचे (शिंदे गट) वरिष्ठ नेते आणि माजी नगरसेवक मोहन उगले यांनी या सगळ्या राजकीय डावपेचांबाबत मुंबई Tak सोबत सविस्तर चर्चा केली. पाहा ते नेमकं काय म्हणाले.
वाचा संपूर्ण मुलाखत
- प्रश्न: महापालिका निवडणुका अद्याप जाहीर झालेल्या नाही. पण एवढ्या लवकरच प्रचार सुरू करण्याचं नेमकं तंत्र काय?
मोहन उगले: कडोंमपामध्ये पहिल्यांदाच पॅनल पद्धतीने निवडणूक होत आहे. 1995 पासून ते आतापर्यंत सिंगल पद्धतीने मतदान झालं आहे इथे. त्यामुळे नागरिकांना याबद्दल काही माहिती नाही. आमचा मुख्य उद्देश आहे जनजागृती करणे. सर्वसामान्य जे कार्यकर्ते आहेत त्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना हे समजून सांगणं आणि कार्येकर्ते हे मतदारांना यंदाच्या मतदानाबाबत जागरूक करतील. याच दृष्टीने यंदा शिवसेनेतर्फे आपण अगोदरपासून जनजागृती सुरू करत आहोत. त्यामुळे हा काही प्रचार नाही. ती जनजागृती आहे.
- प्रश्न: पॅनल पद्धतीचा मतदानावर परिणाम होण्याची शक्यता आहे. लोकांमध्ये संभ्रम तर आहेच मात्र यासोबतच नगरसेवक निवडीवर देखील त्याचा परिणाम होऊ शकतो?
मोहन उगले: कल्याण-डोंबिवली महापालिकेत पॅनल पद्धतीने निवडणूक होणार असं अनेकदा बोललं गेलं होतं. पण आतापर्यंत कधीही तशी निवडणूक झाली नाही. पण आता पहिल्यांदाच या पद्धतीने निवडणूक होणार आहे. ठाणे, नवी मुंबई वैगरे भागात पॅनल पद्धतीने निवडणूक झालेली आहे. परंतु कल्याण शहरात हे प्रथमच घडतं आहे. यामुळे नागरिकांमध्ये जनजागृती केल्यानंतर सुज्ञ नागरिकांना हे मतदान बरोबर समजेल.
हे ही वाचा>> एकनाथ शिंदेंनी बिहारआधी दिल्लीसाठी का केलेली वाट वाकडी? तुम्ही क्रोनोलॉजी घ्या समजून!
- प्रश्न: तुम्हाला वाटतं पॅनल पद्धतीचा तुम्हाला फायदा होईल?
मोहन उगले: पॅनल पद्धतीचा हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांना फायदा होणार आहे. कारण की, सर्व जण जेव्हा एकत्र येतात, एकत्र बसतात.. तेव्हा याचा फायदा काय आणि तोटा काय हे नागरिकांना कळणार आहे.
- प्रश्न: तुमच्याविरोधात सगळे एकत्र झाले आहेत. अगदी युतीमधील मित्र देखील तुम्हाला पराभूत करण्यासाठी एकत्र झाले आहेत.
मोहन उगले: ही काही माझी पहिलीच निवडणूक नाही. याच्यापूर्वी मी 3 निवडणूक लढलो आहे. तेव्हाही हे सर्व राजकीय पक्ष विरुद्ध मोहन उगले हाच निकष होता आणि हाच निकष कायम राहणार. परंतु मला एकट्याला हरविण्यासाठी सर्व राजकीय पक्षांना एकत्र यावं लागतं त्यातच माझा विजय आहे हे मी मानतो.
- प्रश्न: भाजपने कल्याण-डोंबिवलीत आमचाच महापौर बसणार असा दावा केला आहे. बहुतांश वेळा कल्याणमध्ये शिवसेनेचाच महापौर झाला आहे. पण आजच्या राजकीय परिस्थितीत भाजपचा दावा तुम्हाला किती योग्य वाटतो?
मोहन उगले: हा सगळा जो काही निर्णय आहे तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे घेतील. त्यांना सगळे अधिकार आहेत.. त्यावर तेच भाष्य करू शकतात. सामान्य कार्यकर्ते काय भाष्य करणार यावर?
- प्रश्न: तुम्ही तुमच्या वेदना तर पोहचवल्या पाहिजे ना वरिष्ठांपर्यंत
मोहन उगले: वेदना नाही.. आमची वेदना एकच आहे की, कल्याण शहराला सगळ्या सुख-सोयी तात्काळ उपलब्ध व्हाव्यात. शासनाने जो काही निधी देणं क्रमप्राप्त आहे तो मोठ्या प्रमाणात द्यावा.. म्हणजे शहराचा विकास होईल.
हे ही वाचा>> Inside स्टोरी: फडणवीसांची तक्रार थेट अमित शाहांकडे? 50 मिनिटांत शिंदेंनी शाहांना सांगितल्या 'या' गोष्टी
- प्रश्न: तुम्हाला वाटतं कल्याणमधील रस्ते रुंदीकरण, ट्रफिक या सगळ्यावर एवढ्या लवकर तोडगा निघेल? पुढच्या 5 वर्षात तरी ही सगळी कामं पूर्ण होतील असं अद्याप तरी दिसत नाही.
मोहन उगले: कसं आहे की, शासनाला वाटलं ना कुठल्या कामाला प्राधान्य द्यायचं, शासनावर सगळं काही अवलंबून आहे. त्यामुळे शासनच या शहरासाठी योग्य तो निर्णय घेईल. हा युतीचा बालेकिल्ला आहे. आमदार, खासदार हे युतीचेच आहेत.
- प्रश्न: ठाकरे गटाकडून तुम्हाला काही ऑफर?
मोहन उगले: मला त्याविषयी काही बोलायचं नाही.. मी एक सामान्य कार्यकर्ता आहे.
- प्रश्न: मोहन उगले हे महापौर पदाच्या शर्यतीत असतील का?
मोहन उगले: कदापि नाही.. वरिष्ठ जो निर्णय घेणार तो आम्हाला कायम मान्य आहे.
- प्रश्न: पण इच्छा असायला काय हरकत आहे?
मोहन उगले: इच्छा असली तरी वरिष्ठांच्या मर्जीनुसारच सारं काही होईल. त्यामुळे इच्छा प्रकट करणं हा काही गुन्हा नाही. परंतु जो काही निर्णय आहे ते वरिष्ठच देणार. मी कोणालाही स्पर्धक मानत नाही. मी सगळ्यांना मित्रच मानतो. त्या दृष्टीने मित्र मला पाठिंबा देतील आज ना उद्या.
- प्रश्न: एकनाथ शिंदेंनी तुम्हाला काय कानमंत्र दिलाय निवडणुकीसाठी
मोहन उगले: शिंदे साहेब आम्हाला 1995 च्या निवडणुकीपासून ओळखतात. त्यामुळे वरिष्ठांच्या कोणत्याही गोष्टीत आम्ही विरोध करू शकत नाही.
- प्रश्न: ठाकरे बंधू एकत्र येत आहेत. याचा तुमच्या निवडणुकीवर किती परिणाम होईल?
मोहन उगले: आम्हाला त्याविषयी काही बोलायचं नाही. सर्वसामान्य लोकांना दैंनदिन विषयी प्रश्न आहेत. वरिष्ठ काय निर्णय घेतात किंवा कोणी काय एकत्र आलं तर त्याचे काय परिणाम होतात.. जनतेला काही परिणाम होत नाही. जनतेला हेच पाहिजे की, आज माझ्या दारात कोण येतं. तो गरीब आहे की श्रीमंत हा जनतेसाठी गौण विषय आहे.
नागरिकांच्या संबंधित जे विषय आहेत त्याला आम्ही बांधील आहोत. उदा. जेव्हा कोरोना होता.. कुठल्याही पक्षातील जे आज कोणी दिसतायेत ते आज घरात बसलेले होते. काही तर पळून गेले होते. पण मोहन उगलेची शाखा तर 24 तास सुरू होती. अन्नधान्यपासून सगळ्या गोष्टी शाखेने काम केलं होतं. त्यामुळे आम्हाला निवडणुकीची भीती वाटत नाही.
- प्रश्न: भाजपसोबत युती झाली किंवा नाही झाली याचा या निवडणुकीवर किती परिणाम होईल?
मोहन उगले: युती झाली तरी वरिष्ठच करणार आहेत. नाही झाली तरी सामान्य कार्यकर्त्याला काय वाटतं ते आपल्या वरिष्ठांना त्यांचा निर्णय सांगतील.
- प्रश्न: तुम्हाला वाटतं शिवसेनेचाच महापौर बसावा?
मोहन उगले: 1995 पासून आजतागायतचा इतिहास बघा.. कोणाचा महापौर बसलेला आहे.. शिवसेनेचाच बसला आहे.
ADVERTISEMENT











