अनगर (सोलापूर): ठिकाण: मोहोळ, 5 एप्रिल 2005 चा दिवस... शिवसेनेचा उपतालुकाप्रमुख असलेल्या व्यक्तीला दुकानासमोरुन उचललं जातं. हातपाय तोडत त्याचा गळाच कापला जातो. एवढंच नाही तर त्याच्या तोंडावर लघुशंका केली जाते. या क्रूर हत्येने एकच खळबळ उडते. दंगल उसळते, अख्खं मोहोळ गाव जळतं. विधानसभेत मुद्दा गाजतो, भाजप-सेना प्रचंड आक्रमक होते. 13 आरोपी पकडले जातात. त्यात तत्कालीन आमदार पुत्राचाही समावेश असतो. दीडेक वर्षातच सगळे आरोपी बाहेर येतात. हत्या झालेल्या शिवसेना नेत्याचं नाव पंडित कमलाकर देशमुख. तर या प्रकरणात मुख्य आरोपी होते बाळराजे राजन पाटील. आता अनगरमधील दहशत आणि राजकारणावर सातत्यानं बोललं जात आहे आणि त्यातच सतत पंडित देशमुख यांच्या हत्येचं प्रकरणही चर्चेत येत आहे. याच गाजलेल्या प्रकरणाचा सविस्तर आढावा आपण घेऊया.
ADVERTISEMENT
नेमकं काय आहे 'ते' हत्या प्रकरण?
जुनीजाणती माणसं सांगतात आजही या पंडित देशमुखांच्या हत्येच्या घटनेची आठवण आली तरी भीती वाटते. राजन पाटील तिसऱ्यांदा विधानसभेत निवडून गेले होते. मोहोळमध्ये त्यांचं वर्चस्व त्याआधीपासूनचं. त्यात शिवसेना उपतालुकाप्रमुख पंडित देशमुख स्थानिक लेव्हलला एक्टिव्ह कार्यकर्ते. पाटलांच्या विरोधात थेट नडायचे. राजन पाटलांचे पुत्र बाळराजेंची नुकतीच राजकारणात एन्ट्री झाली होती. निवडणूक होऊन काही दिवसच झालेले, त्यात देशमुखांनी चॅलेंज केलं. काही जणांनी पंडित देशमुखांना दुकानापासून भरदिवसा उचललं. क्रूरपणे त्यांची हत्या करण्यात आली.
हे ही वाचा>> आधी मुलाने नाद करु नका म्हणत अजितदादांना आव्हान दिलं, आता एका दिवसात राजन पाटील अन् बाळराजेंचा माफीनामा
राष्ट्रवादीचे आताचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील या घटनेचं सतत वर्णन मीडियासमोर येऊन करताहेत. ते सांगतात, 'पंडित देशमुख यांचा मर्डर या बाळराजे पाटलानं केला. यामध्ये 13 आरोपी होते. त्यावेळी गृहमंत्री आर. आर. पाटील होते. ते राष्ट्रवादीचेच होते. आर आर आबांच्या पाया पडून माझ्या पोराला वाचवा म्हणत पाटीलकी गुंडाळून घरी ठेवत गेले होते. हाच तो बाळराजे आहे, मर्डर करणारा बाळराजे पाटील होता. शिवसेना जिल्हाप्रमुख पंडित देशमुखचा मर्डर केला. त्यांचे हातपाय तोडले, गळा कापला, जीभ कापली, एवढंच नाही तर विकृत बाळराजे पाटलाने त्यांच्या तोंडावर लघुशंका केली', अशा शब्दात उमेश पाटलांनी भीषण आरोप केलेत जे पब्लिक डोमेनमध्ये आहेत. 'मुंबई Tak'वरही हा व्हिडीओ आपण पाहू शकता.
तर 2005 मध्ये हत्या झाली त्यावेळी विरोधी पक्षनेते नारायण राणेंनी विधानसभेत जोरदारपण हा मुद्दा मांडला होता. स्थगन प्रस्ताव आणत या हत्येत सत्तारुढ पक्षाचे नेते सामील असल्याचा आरोप केला होता. शिवाय स्थानिक पोलिसही यात आरोपींना मदत करत असल्याचा आरोप केला होता. पोलीस निरीक्षकांच्या अटकेची मागणीही राणेंनी केलेली. त्यावेळचे सोलापूरचे आमदार नरसय्या आडम मास्तरांनी देखील हा विषय लावून धरलेला. जमावाने देशमुखांचा मृतदेह पोलीस ठाण्यात आणून ठेवला तेव्हा पोलीस पळून गेले असा आरोप आडम मास्तरांनी विधानसभेत केलेला. बाबासाहेब कुपेकर अध्यक्ष होते, विरोधकांच्या निशाण्यावर अर्थातच होते सत्ताधारी आमदार राजन पाटील. गोंधळ झाला, कागद भिरकावले गेले. सभागृह बंद पाडलं गेलं. मग त्यांच्याच पक्षाचे गृहमंत्री असलेल्या आर. आर. पाटलांनी या प्रकरणाची निष्पक्षपणे चौकशी करण्याची ग्वाही दिली. उद्धव ठाकरे, मनोहर जोशींनी मोहोळमध्ये येऊन तेव्हा देशमुख कुटुंबाची भेट घेतली होती, अशा बातम्याही पेपरमध्ये दिसतात.
हे ही वाचा>> भाजप नेते राजन पाटलांचा जंगलराज की वेगळाच गेम? उज्ज्वला थिटेंच्या अर्जानंतरच्या अनगर राड्याचा Start टू End पिक्चर!
नंतर आरोपी पकडले जातात. एकूण 13 आरोपी. त्यात मुख्य आरोपी विक्रांत उर्फ बाळराजे पाटील. 18 महिने जेलमध्ये राहिल्यानंतर केसचा निकाल लागला आणि सगळे निर्दोष सुटले. पाटील विरुद्ध देशमुख रायव्हलरी नंतरही चालत राहिली. पुढे बाळराजे विरुद्ध विक्रमसिंह देशमुख यांच्यातही अनेकदा तणाव झाला, तशा बातम्याही आल्या. केसेसही दाखल झाल्या. जेलमधून सुटल्यानंतर बाळराजे पाटील त्याच मोहोळमधून मोठी मतं घेऊन झेडपी सदस्य झाले, नंतर 2009 साली झेडपीचे उपाध्यक्षही झाले. 2014 मध्ये माढ्यात शिवसेना युवसेना प्रमुख महेश देशमुख यांच्यावरील हल्ल्या प्रकरणात बाळराजेंचे नाव पुढे आलेलं. याही प्रकरणात बाळराजे आणि त्यांचे बंधू अजिंक्यराणा पाटलांवर गुन्हा दाखल झाला होता.
तर पंडित देशमुख हत्या प्रकरणात वीस वर्ष झालं राज्य सरकारच्या वतीनं हायकोर्टात अपील दाखल आहे. तरी केस बोर्डावर नाही. यात राज्य सरकारचं लॉ एन्ड जुडीशरी डिपार्टमेंट काय करतंय? असा सवालही उमेश पाटील करत आहेत. सरकार पक्षाकडून अपिलाचा पाठपुरावा करण्याची जबाबदारी गृह विभागाची आहे. हे अपील बोर्डावर का येत नाही, कोणती यंत्रणा यामागे काम करतेय, हायकोर्टाची यंत्रणा हे लोकं मॅनेज करु शकतात, केस बोर्डावरच येऊ द्यायची नाही, मग चालेल आणि निकाल लागेल हा तर पुढचा टप्पा आहे, असंही उमेश पाटील सांगतात.
'पाटलांच्या पोरांना लग्नाआधीच तुझ्याएवढी एवढी बाळं असतात. त्याचा आम्हाला स्वाभिमान आहे. आमच्या पोरांना वयाच्या 17व्या वर्षीच 302, 307 ची कलमं लागली आहेत, याचा आम्हाला अभिमान आहे..' साखर कारखान्याची निवडणूक लागलेली, प्रचार ऐन जोरात असताना राजन पाटलांनी केलेलं हे वक्तव्य प्रचंड चर्चेत राहिलं, सडकून टीकाही त्यावेळी झाली होती.
आता अनगर नगरपंचायत निवडणुकीच्या निमित्तानं अनगरकर पाटलांची पुन्हा चर्चा सुरु झाली. कित्येक वर्षांपासून अनगरची ग्रामपंचायत बिनविरोध करण्याची परंपरा संपुष्टात येता येता वाचली. कारण राजन पाटलांना चॅलेंज करत पोलीस प्रोटेक्शनमध्ये फिल्मी स्टाईल भरलेला उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद झाला. राजन पाटलांचं वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झालं आणि सूनबाई नगराध्यक्ष पदावर विराजमान झाल्या. आता अनगरकर पाटलांच्या या वर्चस्वाला हादरा देण्याचं काम केलं दोन पाटलांनीच. एक उमेश पाटील आणि दुसऱ्या उज्ज्वला थिटे पाटील...
एकहाती नगरपंचायत जिंकली आणि राजन पाटलांनी मिशीवर ताव मारला, दंड थोपटले तर बाळराजेंनी तर चक्क अजितदादांना नाद न करण्याचं ओपन चॅलेंज दिलं. अर्थात दोघांनीही नंतर माफी मागितली. पण विषय अजून संपलेला नाही. मोहोळच्या राजकारणात राजन पाटलांना तसं तर कुणी तगडा प्रतिस्पर्धी मिळालाच नाही. राजन पाटील हाच पक्ष आणि ते सांगतील तीच पूर्वदिशा असं कार्यकर्ते सांगतात. मात्र अलीकडेच त्यांच्याच कधीकाळी सोबत असलेल्या उमेश पाटलांनी त्यांना अंगावर घ्यायला सुरुवात केली. बरं दोघेही अजितदादांच्या राष्ट्रवादीत असताना यांच्यातली शत्रुत्व चर्चेत राहिलेलं. दादांनीही कधी यात मध्यस्थीचा प्रयत्न केलाय असं दिसलं नाही.
राजन पाटलांची दहशत, जंगलराज वगैरेच्या चर्चा सध्या होताना दिसतात. तसे आरोप उज्ज्वला थिटे आणि उमेश पाटील सतत करत आहेत. राजन पाटलांनी प्रत्येक आरोपांचं व्यवस्थितपणे उत्तर दिलंय. 'इथले लोकं काय म्हणतात ते बघा..' असं म्हणत राजन पाटील आपल्यावरचे सगळे आरोप फेटाळतात. उज्वला थिटेंच्या धमक्यांच्या आरोपांवर राजन पाटील म्हणतात, इथे कायद्याचं राज्य आहे. त्यांना एवढं वाटत होतं तर त्यांनी पोलिसांना अर्ज द्यायला हवा होता. पोलीस तर आमचे नाहीयेत, असं राजन पाटील सांगताहेत खरं मात्र इतिहास तितकाच रंजक आहे आणि याची चर्चा अख्ख्या सोलापूर जिल्ह्यात होतेय.
अनगर किंवा मोहोळमध्ये काय चाललंय याची सध्या सगळीकडेच जोरदार चर्चा आहे. त्यामुळं पाटलांची दहशत आहे की खरंच कायद्याचं राज्य आहे? असा सवाल आजही अनेक जण विचारत आहेत.
ADVERTISEMENT











