आधी मुलाने नाद करु नका म्हणत अजितदादांना आव्हान दिलं, आता एका दिवसात राजन पाटील अन् बाळराजेंचा माफीनामा
Rajan Patil and Balraje Patil Apologized to Ajit Pawar : आधी मुलाने नाद करु नका म्हणत अजितदादांना आव्हान दिलं, आता एका दिवसात राजन पाटील अन् बाळराजेंचा माफीनामा
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
आधी मुलाने नाद करु नका म्हणत अजितदादांना आव्हान दिलं
आता एका दिवसात राजन पाटील अन् बाळराजेंचा माफीनामा
Rajan Patil and Balraje Patil Apologized to Ajit Pawar, solapur :‘अजित पवार कोणाचाही नाद करा, अनगरकरांचा नाद करु नका', असं म्हणत भाजप नेते राजन पाटील यांच्या यांच्या मुलाने म्हणजे बाळराजे पाटील यांनी उपमुख्यमंत्र्यांना आव्हान दिलं होतं. राजन पाटील यांच्या सून प्राजक्ता पाटील यांची अनगर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. त्यानंतर अनगर येथे झालेल्या जल्लोषादरम्यान माजी आमदार राजन पाटील यांच्या ज्येष्ठ पुत्रांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना थेट इशारा दिला होता. बाळराजेंच्या या वक्तव्यांचा व्हिडीओ संपूर्ण राज्यात व्हायरल झाला. दरम्यान, संपूर्ण राज्यात हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पाटील पित्रा-पुत्रांना उपरती आली आहेत. दोघांनीही अजित पवारांची माफी मागितली आहे.
राजन पाटील आणि त्यांचे पुत्र काय म्हणाले?
राजन पाटील म्हणाले, "माझ्या मुलाच्या तोंडून न कळत, भावनेत, उत्साहात जे अपशब्द गेलेत ते व्हायला नको होते. त्याबद्दल मी अजितदादा आणि पवार परिवाराचं अंतःकरणपूर्वक दिलगिरी व्यक्त करतो, क्षमा व्यक्त करतो, मोठ्या साहेबांच्या चरणी मी नतमस्तक होतो. माझी विनंती हा विषय आता थांबवावा. अजितदादांनी पार्थ किंवा जयसारखं समजून बाळराजे पाटलांना पदरात घ्यावं." शिवाय, अजितदादा मोठे नेते आहेत, मी दिलगिरी व्यक्त करतो, असं बाळराजे पाटील म्हणाले आहेत.
अनगर नगरपंचायतीची निवडणूक यावेळी राज्यातील सर्वाधिक चर्चेचा विषय ठरली. राजन पाटील यांच्या बिनविरोध परंपरेला या वेळी प्रथमच धक्का बसला होता. राष्ट्रवादी काँग्रेसकडून उज्वला थिटे यांनी पोलिस बंदोबस्तात नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करून पाटील कुटुंबाच्या वर्चस्वाला आव्हान दिले होते. मात्र छाननीदरम्यान त्यांचा अर्ज बाद झाला. यानंतर पाटील समर्थकांनी नगरपंचायत कार्यालयासमोर जल्लोष केला आणि त्याच वेळी विक्रांत पाटील यांनी अजित पवारांना हे आव्हान दिले. ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रुपांतर झाल्यानंतरची ही पहिलीच निवडणूक. यामध्ये भाजपकडून राजन पाटील यांची सून प्राजक्ता अजिंक्यराणा पाटील यांच्या उमेदवारीची घोषणा झाली होती. पाटील समर्थकांना निवडणूक पूर्वीप्रमाणेच बिनविरोध होईल अशी खात्री होती. पण राष्ट्रवादीच्या उज्वला थिटे यांनी अर्ज दाखल करताच राजकीय वातावरण तापले. पोलिस बंदोबस्तात उमेदवारी दाखल केल्यामुळे ही निवडणूक राज्यभर चर्चेचा विषय ठरली.
उज्ज्वला थिटे यांचा अर्ज झाला बाद, प्राजक्ता पाटील बिनविरोध होणार नगराध्यक्ष
छाननीदरम्यान अपक्ष उमेदवार सरस्वती शिंदे यांनी केलेल्या आक्षेपांवर आधारित उज्वला थिटे यांचा अर्ज बाद करण्यात आला. अर्ज बाद झाल्यानंतर पाटील गटात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आणि कार्यालयासमोर मोठा जल्लोष झाला. या जल्लोषात विक्रांत उर्फ बाळराजे पाटील यांना कार्यकर्त्यांनी खांद्यावर घेऊन उत्साह व्यक्त केला.










