गणेश जाधव, धाराशिव: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या अमेडिया या कंपनीचा जमीन घोटाळा समोर आल्यानंतर आता या प्रकरणात धाराशिव कनेक्शन देखील उजेडात आले आहे. अमेडिया कंपनीत पार्थ पवार यांच्यासोबत भागीदारी करणारे दिग्विजय पाटील हे राज्यसभा सदस्य सुनेत्रा पवार यांचे भाचे असल्याचे उघड झाले आहे.
ADVERTISEMENT
या प्रकरणात पार्थ पवार यांच्या नातेवाईकाचा थेट सहभाग समोर आल्यामुळे आता दिग्विजय पाटील यांच्या आर्थिक व्यवहारांची स्वतंत्र तपासणी सुरू होणार असल्याची माहिती मिळत आहे.
कोण आहेत दिग्विजय पाटील
दिग्विजय हे सुनेत्रा पवार यांचे बंधु अमरसिंह पाटील यांचे पुत्र आहेत.अमरसिंह पाटील आणि सुनेत्रा पवार हे माजी मंत्री डॉ. पदमसिंह पाटील यांचे सावत्र भाऊ-बहिण आहेत. मात्र दोघांमध्ये राजकीय मतभेद असल्याने आर्थिक अथवा व्यावसायिक संबंध नव्हते. अमरसिंह पाटील हे तेर येथे शेती व्यवसायात गुंतलेले होते. ते 2016 च्या जिल्हा परिषद निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर सक्रिय राजकारणापासून दूर राहिले. पुढे काही काळ ते बारामती आणि पुण्यात राहिले. वर्ष 2018 मध्ये अल्पशा आजाराने त्यांचे निधन झाले.
दिग्विजय पाटील यांचे बालपण सुनेत्रा पवार यांच्या देखरेखीखाली गेले. प्राथमिक शिक्षण बिबेवाडी, पुणे येथे तर उच्च शिक्षण एमआयटी महाविद्यालयातून बीए पदवीपर्यंत पूर्ण झाले. सध्या ते आई आणि आजीसह पुण्यात वास्तव्यास आहेत. त्यामुळे ते फक्त घरगुती कार्यक्रमासाठी तेर येथील मूळ गावी येत असत दिग्विजय यांचा धाराशिव येथे कोणताही मोठा उद्योग असल्याचे तूर्तास तरी समोर आले नाही दिग्विजय आणि पार्थ पवार हे समवयस्क असून दोघांमध्ये मैत्री आणि पुढे व्यावसायिक भागीदारी निर्माण झाली.
जमीन घोटाळ्याचा तपशील
अवघे 1 लाख रुपयांचे भांडवल असलेल्या अमेडिया कंपनीला कोरेगाव पार्क परिसरातील 40 एकर शासकीय जमीन, ज्याची बाजार किंमत सुमारे 1800 कोटी रुपये, आयटी पार्क प्रकल्पासाठी फक्त 300 कोटी रुपयांत देण्यात आली असल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे या व्यवहारासाठी लागणारे 21 कोटी रुपयांचे स्टॅम्प शुल्क माफ करण्यात आले आणि कंपनीने केवळ 500 रुपये मुद्रांक शुल्क भरले.
ही जमीन महार वतनातील असल्याने तिच्या खरेदी-विक्री प्रक्रियेत नियमभंग झाल्याचा आरोप आहे. हा व्यवहार पॅरामाऊंट इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीमार्फत करण्यात आला असून प्रत्यक्ष खरेदी खत गायकवाड आणि 274 मूळ मालकांसोबत करण्यात आले.
ADVERTISEMENT











