Who was Chandranath Rath : पश्चिम बंगालमधील भाजपचे सर्वात मोठे नेते सुवेंदू अधिकारी यांचे अत्यंत विश्वासू सहकारी चंद्रनाथ रथ (वय 41) यांची बुधवारी रात्री उत्तर 24 परगणा जिल्ह्यात निर्घृण हत्या करण्यात आली. भारतीय हवाई दलातून स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर राजकारणात सक्रिय झालेल्या रथ यांचा प्रवास इंटरेस्टिंग राहिलाय. पूर्व मेदिनीपूरमधील चंडीपूर येथील रहिवासी असलेल्या रथ यांचा कल सुरुवातीला आध्यात्मिक जीवनाकडे होता आणि ते रामकृष्ण मिशनच्या शिस्तीत वाढले होते. मात्र, हवाई दलात जवळपास दोन दशके सेवा केल्यानंतर त्यांनी कॉर्पोरेट क्षेत्रात काम केले आणि त्यानंतर हळूहळू ते शुभेंदु अधिकारी यांच्या कोअर टीमचा भाग बनले. त्यांच्या हत्येमुळे बंगालच्या राजकीय वर्तुळात प्रचंड तणाव निर्माण झाला असून या घटनेने अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.
ADVERTISEMENT
हवाई दलातील सेवेपासून ते राजकारणापर्यंतचा प्रवास; सुवेंदू अधिकारींचे बनले 'संकटमोचक'
चंद्रनाथ रथ यांचे कुटुंब पूर्वी तृणमूल काँग्रेसशी संबंधित होते आणि त्यांच्या मातोश्री हसी रथ यांनी स्थानिक पंचायतीमध्ये पदही भूषवले होते. मात्र, 2020 मध्ये सुवेंदू अधिकारी यांच्याप्रमाणेच या कुटुंबानेही भाजपमध्ये प्रवेश केला. रथ यांनी 2019 मध्ये अधिकारी यांच्यासोबत काम करण्यास सुरुवात केली होती, जेव्हा अधिकारी ममता बॅनर्जींच्या मंत्रिमंडळात मंत्री होते. सुरुवातीला कार्यालयीन समन्वय आणि प्रशासकीय कामांची जबाबदारी सांभाळणाऱ्या रथ यांनी अल्पावधीतच भाजपच्या संघटनात्मक बांधणीत महत्त्वाची भूमिका बजावण्यास सुरुवात केली. संवेदनशील राजकीय जबाबदाऱ्या, निवडणूक मोहिमांचे नियोजन आणि कार्यकर्त्यांशी समन्वय साधण्यात ते निष्णात मानले जात होते. भवानीपूर सारख्या हाय-प्रोफाइल निवडणुकीतही त्यांनी महत्त्वाची जबाबदारी सांभाळली होती, ज्यामुळे ते अधिकारी यांच्या गोटातील एक उगवते नेतृत्व म्हणून ओळखले जाऊ लागले होते.
हेही वाचा : बायकोने हात धरले, प्रियकराने घोटला गळा अन् नंतर...निवृत्त लष्करी जवानाला कसे संपवले?
भवानीपूरमधील तो गाजलेला विरोध आणि पोलिसांशी झालेली झटापट
चंद्रनाथ रथ यांच्या राजकीय सक्रियतेचे उदाहरण अलीकडेच 30 एप्रिल रोजी पाहायला मिळाले होते. मतमोजणीच्या तीन दिवस आधी जेव्हा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भवानीपूर येथील स्ट्राँगरूमला भेट दिली होती, तेव्हा सुवेंदू अधिकारी यांच्या अनुपस्थितीत रथ यांनी भाजप समर्थकांचे नेतृत्व केले होते. मतमोजणी केंद्राबाहेर तृणमूल काँग्रेसचे प्रचाराचे वाहन बेकायदेशीरपणे उभे असल्याचा आरोप करत त्यांनी पोलिसांशी कडाडून वाद घातला होता. रथ यांच्या तक्रारीनंतर भाजप कार्यकर्त्यांनी तिथे तीव्र निदर्शने केली होती, ज्याची दखल घेत अखेर पोलीस आणि सीआरपीएफने ते वाहन तिथून हटवले होते. या घटनेमुळे रथ हे पक्षाच्या आक्रमक फळीतील एक महत्त्वाचे नाव बनले होते आणि त्यांची संघटनात्मक पकड अधिक मजबूत झाली होती.
दुचाकीस्वारांकडून गोळीबार; चंद्रनाथ रथ यांचा दुर्दैवी अंत
चंद्रनाथ रथ यांचा हा राजकीय प्रवास बुधवारी रात्री रक्ताच्या थारोळ्यात संपला. उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील मध्यमाग्राम येथील डोहारीया परिसरात दुचाकीवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी रथ यांच्या गाडीला अडवले आणि त्यांच्यावर अगदी जवळून गोळ्या झाडल्या. या प्राणघातक हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला असून या घटनेने निवडणूक निकालानंतरच्या बंगालमधील आधीच अस्थिर असलेल्या वातावरणात तेल ओतण्याचे काम केले आहे. अज्ञात हल्लेखोरांनी ज्या पद्धतीने नियोजनबद्धरीत्या हा हल्ला केला, त्यावरून ही सुपारी देऊन केलेली हत्या असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या हत्येनंतर बंगालमधील विरोधी पक्षांनी सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप केले असून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
तब्बल 22 तास मृत बाळ होतं आईच्या पोटात, अन् डॉक्टरांना हवे होते पैसे... चीड आणणारी घटना
ADVERTISEMENT











