नवी दिल्ली: एकीकडे बिहारचा निकाल जाहीर झालेला असताना दुसरीकडे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अचानक केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची राजधानी दिल्लीत जाऊन भेट घेतली. याच भेटीनंतर अनेक तर्कवितर्क आता लढवले जात आहेत. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. तर दुसरीकडे अजित पवारांचे पुत्र पार्थ पवारांच्या जमीन प्रकरणामुळे अडचणीत आल्याने देखील अजित पवारांनी ही भेट घेतली असल्याचं बोललं जात आहे.
ADVERTISEMENT
अजित पवारांनी अचानक घेतली अमित शाहांची भेट
अजित पवारांनी थेट अमित शाह यांच्या दिल्लीतील शासकीय निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. अजित पवारांनी बिहारच्या निकालानंतर अमित शाह यांचं अभिनंदन केलं. दुसरीकडे दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड साधारण अर्धा तास चर्चा झाली. या चर्चेचा तपशील समोर आला नसला तरी राज्यात गाजत असलेल्या जमीन घोटाळ्याविषयी ही भेट असल्याचं आता बोललं जात आहे.
हे ही वाचा>> खडसेंचं ऐकलं असतं तर पार्थ प्रकरण आलंच नसतं! अचानक एंट्री झालेला हेमंत गावंडे आहे तरी कोण?
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या भेटीचं कारण सांगितलं आहे. नागपुरात देवेंद्र फडणवीस होते, यावेळी माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, अजित पवारांनी महाराष्ट्रातल्या काही मुद्यांवर भेट घेतली आहे. पार्थ पवारांबाबत ती भेट आहे असं मला वाटत नाही.
देवेंद्र फडणवीसांनी जरी महाराष्ट्रातल्या मुद्यावर अजित पवार शाहांना भेटले असं म्हटलं असलं तरी अजित पवार एकटेच का शाहांना भेटायला गेले? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दुसरीकडे जर अजित पवार महाराष्ट्रातल्या प्रश्नांवर अमित शाहांची भेट घेण्यासाठी गेले असतील तर बंद दाराआड चर्चेची आवश्यकता होती का? असा देखील प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
हे ही वाचा>> 'ही आहे जमीन चोरी', पार्थ पवारांचा जमीन व्यवहार अन् राहुल गांधींच्या ट्वीटने खळबळ
दरम्यान, पुण्यातील मुंढव्याच्या जमीन प्रकरणात जी समिती नेमली होती तिचा अहवाल सोमवारी सादर केला जाणार आहे. या अहवालामध्ये पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला जबाबदार धरलं जातंय का? हे पाहावं लागणार आहे. या सगळ्या पार्श्वभूमिवर अजित पवारांची शाहांसोबतच्या भेटीला वेगळंच महत्त्व प्राप्त झालं आहे. पार्थ पवार यांच्या प्रकरणानंतर अजित पवार सरकारमधून बाहेर पडणार होते असा गौप्यस्फोट ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी केला होता. या आरोपांचं जरी खंडण केलं असलं तरी दादांची शाहांसोबतच्या बंद दाराआड झालेल्या चर्चेमुळे अनेक प्रश्न आता उपस्थित केले जात आहे.
ADVERTISEMENT











