'काँग्रेस एक बांडगूळ ते मित्र पक्षालाच...', BMC निवडणुकीसाठी PM मोदींचा उद्धव ठाकरेंना हळूच इशारा?

बिहार निवडणूक निकालानंतर विजयी भाषणात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अप्रत्यक्षपणे शिवसेना UBT पक्षाला काँग्रेसची साथ सोडण्याचा इशारा तर दिलेला नाही ना? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. जाणून घ्या पंतप्रधान मोदी नेमकं काय म्हणाले.

congress is a parasite they are trying to make their own comeback by destroying vote bank of their allies pm modi subtle warning to uddhav thackeray

फाइल फोटो, सौजन्य: पीटीआय

मुंबई तक

14 Nov 2025 (अपडेटेड: 14 Nov 2025, 11:52 PM)

follow google news

नवी दिल्ली: बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपने अत्यंत घवघवीत असं यश मिळवलं आहे. त्यांच्या NDA आघाडीला 200 हून अधिक जागा मिळाल्याने त्यांचा सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. तर दुसरीकडे आरजेडी आणि काँग्रेससह महागठबंधनचा पार धुव्वा उडला आहे. त्यांना अवघ्या 35 जागांवरच समाधान मानावं लागलं आहे. बिहारमधील याच विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (14 नोव्हेंबर) भाजपच्या केंद्रीय मुख्यालयात येऊन जाहीर भाषण केलं. पण याच भाषणात मोदींनी काँग्रेसबाबत बोलताना त्यांच्या मित्रपक्षांना एक इशाराही दिला आहे. ज्याबाबत आता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. 
 
'काँग्रेससोबत असलेल्या त्यांच्या मित्र पक्षांनी काँग्रेसपासून सावध राहावं. नाहीतर ते तुमची व्होटबँक गिळून स्वत:चं पुनरागमन करतील.' असं म्हणत पंतप्रधान मोदींनी आता इंडिया आघाडीमध्ये चलबिचल होण्यासाठी एक वेगळीच खेळी केली आहे.

हे वाचलं का?

निकाल बिहारचा पण PM मोदींचा उद्धव ठाकरेंना हळूच इशारा?

दरम्यान, हा इशारा उद्धव ठाकरे यांना तर नाही ना? अशी चर्चा आता दबक्या आवाजात सुरू झाली आहे. अखंड शिवसेनेची आणि भाजप ही युती अनेक वर्ष महाराष्ट्रात होती. पण महाराष्ट्रात 2019 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरेंनी भाजपसोबतची युती तोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत मिळून सत्ता स्थापन केली होती.

हे ही वाचा>> मोठी बातमी: आता काँग्रेस पक्षच फुटणार? खुद्द PM मोदी म्हणाले, 'लवकरच काँग्रेस पक्षात एक मोठं...'

मात्र, अडीच वर्षातच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात बंड झालं आणि पक्षात मोठी फूट पडली. यथावकाश शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह या दोन्ही गोष्टी एकनाथ शिंदेंना मिळाल्या. त्यामुळे पुन्हा शिवसेना-भाजप युती झाली. पण असं असलं तरी आता पुन्हा एकदा राज्यातील राजकीय समीकरणं बदलली आहेत. 

2024 विधानसभा निवडणुकीत शिवसेना UBT ला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे आगामी महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांसाठी दोन्ही ठाकरे बंधू हे एकत्र आले आहे. त्यांच्या पक्षातील अधिकृत युती जाहीर झालेली नसली तरी आता पुढील निवडणुका ते युतीतच लढतील अशी दाट शक्यता आहे. 

तर दुसरीकडे शिवसेना UBT ने अद्यापही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) यांच्यासोबत आपली महाविकास आघाडी ही कायम ठेवली आहे. कारण हे तिन्ही पक्ष मिळून सध्याच्या नगरपरिषद आणि नगर पंचायत निवडणुका लढणार आहे. त्यामुळे राज्यात भाजपसमोर एक कडवं आव्हान उभं राहण्याची शक्यता आहे. याच सगळ्या शक्यता लक्षात थेट शिवसेना UBT पक्षाला काँग्रेसपासून वेगळं करण्याची खुद्द पंतप्रधान मोदींची खेळी तर नाही ना? अशी चर्चा सुरू झाली आहे.

हे ही वाचा>> Bihar Chief Minister: भाजपला आता JDU ची गरज लागणार नाही, बनवू शकतात स्वत:चाही मुख्यमंत्री... नेमकं गणित समजून घ्या!

मुंबई महापालिका निवडणुकीत दोन्ही ठाकरे एकत्र आल्यास भाजपसमोरचं आव्हान हे नक्कीच कठीण होऊ शकतं. अशावेळी काँग्रेसही शिवसेनेसोबत असली तर भाजपला त्याचा मोठा फटका बसू शकतो असं राजकीय तज्ज्ञांचं म्हणणं आहे. या सगळ्या शक्यता लक्षात घेऊनच आज पंतप्रधान मोदींनी काँग्रेसबाबतचं विधान केलेलं असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

भाजपसोबत पुन्हा युतीच्या चर्चा, पण..

दरम्यान, मागील काही महिन्यांपासून राजकीय वर्तुळात अशी देखील चर्चा सातत्याने होत आहे की, भाजप आणि शिवसेना UBT हे पुन्हा युती करू शकतात. तूर्तास तरी या सगळ्या केवळ चर्चा आहेत. मात्र, राजकारणात कधी काय होईल याबाबत कोणीही अचूक अंदाज बांधू शकत नाही. पण आज पंतप्रधान मोदींनी ज्या पद्धतीने काँग्रेसच्या मित्र पक्षांना काँग्रेसपासून दूर जाण्याचा जो सल्ला दिला आहे तो खरं तर शिवसेना UBT साठी एक गर्भित इशारा देखील असू शकतो.

'काँग्रेस एक बांडगूळ ते मित्र पक्षालाच...', पाहा पंतप्रधान मोदी नेमकं काय म्हणाले

'काँग्रेसचे जे मित्र पक्ष आहेत.. त्यांनाही समजू लागलं आहे की, काँग्रेस आपल्या निगेटिव्ह राजकारणात सगळ्यांना एकत्र बुडवत आहे. तुम्हाला लक्षात असेल की, यासाठीच मी बिहार निवडणुकीतही म्हटलं होतं की, काँग्रेसचे नामदार तलावात बुडी मारून बिहार निवडणुकीत स्वत: बुडण्यासाठी आणि दुसऱ्यांना बुडविण्याची प्रॅक्टिस करत आहेत.' 

'मी याआधीही याच मंचावरून काँग्रेसच्या मित्रपक्षांना इशाराही दिला होता.. मी म्हटलं होतं की, काँग्रेस एक ओझं आहे. काँग्रेस एक अशी परजीवी आहे जे आपल्या मित्रपक्षांची व्होट बँक गिळून स्वत:चं पुनरागमन करू पाहते. यामुळे काँग्रेसपासून सावधान राहण्याची गरज त्यांच्या मित्रपक्षांना देखील आहे.'

'आज बिहारमध्ये आरजेडीला साप डसला आहे.. आता लवकरच दोघांमधील (आरजेडी आणि काँग्रेस) भांडण हे उघडपणे समोर येईल.' असं म्हणत मोदींनी काँग्रेसच्या मित्रपक्षांमध्ये आता संभ्रमाचं वातावरण निर्माण केलं आहे.

'लवकरच काँग्रेस फुटणार..', मोदींचं उघड-उघड विधान 

दुसरीकडे पंतप्रधान मोदी असंही म्हणाले की, 'काँग्रेसच्या राजकारण हे आता फक्त नकारात्मक राजकारण आहे. कधी चौकीदार चोर आहे हा नारा.. संसदेचा वेळ वाया घालवणं, प्रत्येक संस्थेवर हल्ला करणं.. कधी EVM बाबत शंका, कधी निवडणूक आयोगाला शिव्या तर कधी व्होट चोरीचा खोटा आरोप.' 

'याशिवाय जाती-धर्माच्या नावावर लोकांमध्ये भेद निर्माण करणं. याशिवाय देशाच्या शत्रूंचा अजेंडा पुढे आणणं.. काँग्रेसकडे देशासाठी कोणतंही पॉझेटिव्ह व्हिजन नाही. सत्य हे आहे की, आज काँग्रेस.. हे मी फार गांभीर्याने सांगत आहे. आज काँग्रेस 'मुस्लिम लिगी माओवादी काँग्रेस' म्हणजे 'MMC' बनली आहे.' 

'ही काँग्रेस 'मुस्लिम लिगी माओवादी काँग्रेस' आहे. काँग्रेसचा संपूर्ण अजेंडा यावरच चालतो. यामुळे आता काँग्रेसच्या आतही एक वेगळा गट तयार होत आहे. जो या निगेटिव्ह राजकारणापासून त्रासला आहे.' 

'हे जे काँग्रेसचे नामदार आहेत.. जे काँग्रेसला या मार्गावर घेऊन चालले आहेत याच्याविषयी घोर निराशा, घोर नाराजी काँग्रेस अंतर्गत सुरू आहे. मला तर शंका आहे की, असंही होऊ शकतं की भविष्यात काँग्रेस पक्षाचं एक प्रचंड मोठं विभाजन होईल.'

Y

    follow whatsapp