मोठी बातमी: 'लवकरच काँग्रेस पक्षात एक...' PM मोदींच 'ते' विधान, आता काँग्रेस पक्षच फुटणार?
काँग्रेसमध्ये सध्या नकारात्मक राजकारण सुरू असून लवकरच पक्षात एक मोठं विभाजन होईल असं खळबळजनक वक्तव्य पंतप्रधान मोदी यांनी बिहार विधानसभा निवडणूक निकालानंतर केलं आहे.
ADVERTISEMENT

नवी दिल्ली: बिहार विधानसभा निवडणुकीत भाजप प्रणित NDA ला अत्यंत भरघोस असं बहुमत मिळालं आहे. तर आरजेडी आणि काँग्रेसचा राज्यातून अक्षरशः सुपडा साफ झाला आहे. NDA च्या याच ऐतिहासिक विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (14 नोव्हेंबर) भाजपच्या केंद्रीय मुख्यालयातून जोरदार भाषण केलं. या भाषणात त्यांनी भाजप कार्यकर्त्यांचे आभार तर मानलेच पण यासोबतच त्यांनी एका अत्यंत खळबळ उडवून देणारं भाकित केलं आहे.
'ही काँग्रेस 'मुस्लिम लिगी माओवादी काँग्रेस' आहे. काँग्रेसचा संपूर्ण अजेंडा यावरच चालतो. यामुळे आता काँग्रेसच्या आतही एक वेगळा गट तयार होत आहे. जो या निगेटिव्ह राजकारणापासून त्रासला आहे.'
'हे जे काँग्रेसचे नामदार (राहुल गांधी) आहेत.. जे काँग्रेसला या मार्गावर घेऊन चालले आहेत याच्याविषयी घोर निराशा, घोर नाराजी काँग्रेस अंतर्गत सुरू आहे. मला तर शंका आहे की, असंही होऊ शकतं की भविष्यात काँग्रेस पक्षाचं एक प्रचंड मोठं विभाजन होईल.' असं म्हणत पंतप्रधान मोदींनी थेट असं म्हटलं आहे की, लवकरच काँग्रेस पक्ष फुटेल.
पाहा पंतप्रधान मोदी नेमकं काय म्हणाले...
'देशातील महानगरांपासून, ग्रामीण भागापर्यंत प्रत्येक वर्गातील, जातीतील, समुदायातील आणि क्षेत्राने NDA ला आपला विश्वास आणि आशीर्वाद दिला आहे. हा आशीर्वाद सलग देत आहेत. भाजपच्या NDA सरकारांना 20-20 वर्षानंतरही जर जनता निवडून देत आहे तर ही प्रो पीपल, प्रो गव्हर्नन्स आणि प्रो डेव्हलपमेंट राजकारणाची स्थापना आहे.' असं मोदी म्हणाले.










