नवी दिल्ली: बिहार विधानसभा निवडणुकीत भाजप प्रणित NDA ला अत्यंत भरघोस असं बहुमत मिळालं आहे. तर आरजेडी आणि काँग्रेसचा राज्यातून अक्षरशः सुपडा साफ झाला आहे. NDA च्या याच ऐतिहासिक विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (14 नोव्हेंबर) भाजपच्या केंद्रीय मुख्यालयातून जोरदार भाषण केलं. या भाषणात त्यांनी भाजप कार्यकर्त्यांचे आभार तर मानलेच पण यासोबतच त्यांनी एका अत्यंत खळबळ उडवून देणारं भाकित केलं आहे.
ADVERTISEMENT
'ही काँग्रेस 'मुस्लिम लिगी माओवादी काँग्रेस' आहे. काँग्रेसचा संपूर्ण अजेंडा यावरच चालतो. यामुळे आता काँग्रेसच्या आतही एक वेगळा गट तयार होत आहे. जो या निगेटिव्ह राजकारणापासून त्रासला आहे.'
'हे जे काँग्रेसचे नामदार (राहुल गांधी) आहेत.. जे काँग्रेसला या मार्गावर घेऊन चालले आहेत याच्याविषयी घोर निराशा, घोर नाराजी काँग्रेस अंतर्गत सुरू आहे. मला तर शंका आहे की, असंही होऊ शकतं की भविष्यात काँग्रेस पक्षाचं एक प्रचंड मोठं विभाजन होईल.' असं म्हणत पंतप्रधान मोदींनी थेट असं म्हटलं आहे की, लवकरच काँग्रेस पक्ष फुटेल.
पाहा पंतप्रधान मोदी नेमकं काय म्हणाले...
'देशातील महानगरांपासून, ग्रामीण भागापर्यंत प्रत्येक वर्गातील, जातीतील, समुदायातील आणि क्षेत्राने NDA ला आपला विश्वास आणि आशीर्वाद दिला आहे. हा आशीर्वाद सलग देत आहेत. भाजपच्या NDA सरकारांना 20-20 वर्षानंतरही जर जनता निवडून देत आहे तर ही प्रो पीपल, प्रो गव्हर्नन्स आणि प्रो डेव्हलपमेंट राजकारणाची स्थापना आहे.' असं मोदी म्हणाले.
हे ही वाचा>> Bihar Chief Minister: भाजपला आता JDU ची गरज लागणार नाही, बनवू शकतात स्वत:चाही मुख्यमंत्री... नेमकं गणित समजून घ्या!
'अनेक राज्यांमध्ये काँग्रेसला वर्षानुवर्षे सत्ताच मिळालेली नाही'
'हा भारतातील राजकारणाचा नवा आधार आहे. याच आधाराने आम्ही बिहारला आणि देशाला विकसित बनवू. ज्या पक्षाने अनेक दशकं देशावर राज्य केलं त्या पक्षावरील लोकांचा विश्वास दिवसेंदिवस कमी होत चालला आहे. काँग्रेस देशातील अनेक राज्यांमध्ये बरीच वर्ष सत्तेच्या बाहेर आहे.'
'बिहारमधून 35 वर्ष, गुजरातमधून 35 वर्ष, उत्तर प्रदेशातून देखील जवळजवळ 4 दशकं आणि प. बंगालमधून 5 दशकांपासून काँग्रेसचं सरकार बनू शकलेलं नाही.'
हे ही वाचा>> भाजपची नवखी उमेदवार मैथिली ठाकूर बनली आमदार, दिग्गज नेत्याला चारली धूळ
'मागील 3 लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस 3 अंकी संख्येपर्यंत देखील पोहचू शकलेली नाही. 2024 च्या लोकसभा निवडणुकीनंतर देशातील 6 राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका झाल्या. यामध्येही काँग्रेस 100 जागांचा आकडा पार करू शकलेलं नाही. मी 6 विधानसभांबाबत बोलतोय.'
'आजच्या निवडणुकीत आमचे जेवढे आमदार निवडून आले आहेत. काँग्रेस मागील 6 निवडणुकीत तेवढे आमदार निवडून आणू शकलेली नाही. आता आम्हाला एका निवडणुकीत जेवढ्या जागा मिळाल्या आहेत तेवढा यांना 6 निवडणुकांमध्येही मिळालेल्या नाहीत.' असं म्हणत मोदींनी पुन्हा एकदा काँग्रेसला डिवचलं आहे.
'लवकरच काँग्रेसमध्ये मोठं विभाजन होणार'
'काँग्रेसच्या राजकारण हे आता फक्त नकारात्मक राजकारण आहे. कधी चौकीदार चोर आहे हा नारा.. संसदेचा वेळ वाया घालवणं, प्रत्येक संस्थेवर हल्ला करणं.. कधी EVM बाबत शंका, कधी निवडणूक आयोगाला शिव्या तर कधी व्होट चोरीचा खोटा आरोप.'
'याशिवाय जाती-धर्माच्या नावावर लोकांमध्ये भेद निर्माण करणं. याशिवाय देशाच्या शत्रूंचा अजेंडा पुढे आणणं.. काँग्रेसकडे देशासाठी कोणतंही पॉझेटिव्ह व्हिजन नाही. सत्य हे आहे की, आज काँग्रेस.. हे मी फार गांभीर्याने सांगत आहे. आज काँग्रेस 'मुस्लिम लिगी माओवादी काँग्रेस' म्हणजे 'MMC' बनली आहे.'
'ही काँग्रेस 'मुस्लिम लिगी माओवादी काँग्रेस' आहे. काँग्रेसचा संपूर्ण अजेंडा यावरच चालतो. यामुळे आता काँग्रेसच्या आतही एक वेगळा गट तयार होत आहे. जो या निगेटिव्ह राजकारणापासून त्रासला आहे.'
'हे जे काँग्रेसचे नामदार आहेत.. जे काँग्रेसला या मार्गावर घेऊन चालले आहेत याच्याविषयी घोर निराशा, घोर नाराजी काँग्रेस अंतर्गत सुरू आहे. मला तर शंका आहे की, असंही होऊ शकतं की भविष्यात काँग्रेस पक्षाचं एक प्रचंड मोठं विभाजन होईल.' असं अत्यंत मोठं वक्तव्य पंतप्रधान मोदींनी केलं आहे.
ADVERTISEMENT











