“राष्ट्रवादी काँग्रेस तोडण्यासाठी… “, ‘त्या’ चर्चेवर संजय राऊत स्पष्टच बोलले

अजित पवारांनी अमित शाहांना भेटल्याची चर्चा फेटाळली. आता या सगळ्या राजकीय प्रकरणावर खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं.

MP Sanjay Raut Reaction on ajit pawar and bjp alliance

MP Sanjay Raut Reaction on ajit pawar and bjp alliance

भागवत हिरेकर

17 Apr 2023 (अपडेटेड: 17 Apr 2023, 10:16 AM)

follow google news

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल सुप्रीम कोर्टाने राखून ठेवलेला आहे. हा निकाल लवकरच येईल, अशी चर्चा आता सुरू झाली असून, त्याचं अनुषंगाने अजित पवारांच्या नावाभोवती आणखी एका चर्चेनं फेर धरला आहे. सुप्रीम कोर्टात 16 आमदार अपात्र ठरले, तर अजित पवार आणि राष्ट्रवादीचे आमदार भाजपसोबत जाऊ शकतात. त्यात शरद पवारांनीही पक्षातील आमदारांबद्दल केलेल्या विधानाने या चर्चेला हवा मिळाली. पण, लगेच अजित पवारांनी अमित शाहांना भेटल्याची चर्चा फेटाळली. आता या सगळ्या राजकीय प्रकरणावर खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं.

हे वाचलं का?

मुंबईत माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, “काल मी सामनामध्ये नक्कीच लिहिलं आहे. ज्या पद्धतीने शिवसेना फोडली. ईडी सीबीआय पोलीस यंत्रणा तपास यंत्रणा यांचा दुरुपयोग करून दबाव टाकून शिवसेना तोंडली आणि हे सरकार बनवण्यात आलं.”

हेही वाचा >> मातोश्री संकटात! आता रश्मी ठाकरेही मैदानात उतरणार, बालेकिल्ल्यात एन्ट्री

“त्याच पद्धतीचा दबाव राष्ट्रवादी काँग्रेस तोडण्यासाठी टाकला जात आहे. काही आमदारांवर काही प्रकरणं सुरू आहेत. त्यांच्यावर धाडी घालणं, त्यांच्या कुटुंबीयांना धमकावणं असे प्रकार राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या बाबतीत आणि आमदारांच्या बाबतीत चालू आहेत. त्यांना सांगितलं जात आहे की, तुम्ही राष्ट्रवादी सोडा आणि भाजपला पाठिंबा द्या. जसं शिवसेनेच्या बाबतीत झालं.”

आदित्य ठाकरेंच्या विधानाचा संदर्भ देत राऊतांनी सांगितलं प्रकरण

“आदित्य ठाकरे यांनी जसं स्पष्ट केलं की, मुख्यमंत्री (एकनाथ शिंदे) आणि मंत्री कसे मातोश्रीवर येऊन रडत होते. शरद पवार साहेबांचं असं म्हणणं आहे, जे आमच्याशी बोलताना आम्हाला जाणवलं. या दबावामुळे कुणी जर पक्षातून बाहेर पडत असेल, तर तो त्यांचा व्यक्तिगत निर्णय आहे. तो पक्षाचा निर्णय नाही. पक्ष म्हणून राष्ट्रवादी भाजपबरोबर कधीच जाणार नाही. तो महाविकास आघाडीचा घटक आहे आणि हे पवार साहेबांचे स्पष्ट मत आहे ते त्यांना त्या बैठकीत सांगितलं”, असंही संजय राऊत म्हणाले.

अजित पवारांच्या नाराजीबद्दल राऊत काय म्हणाले?

“अजित पवार काल आमच्याबरोबर होते. ते नागपुरातील महाविकास आघाडीच्या सभेसाठी आले होते. काल अजित पवारांचा आमच्या सोबत चांगला संवाद होता. अजित पवार हे आमच्याच सोबत विमानामध्ये होते. अजित पवार, मी, उद्धव ठाकरे साहेब हे सगळे सहकारी होते आणि मला अजिबात वाटत नाही की, ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून वेगळ्या दिशेने जातील. त्यांच्याशी चर्चा करताना वाटले नाही. नागपूरवरून आल्यानंतर ते उद्धव ठाकरेंसोबत रुग्णांची भेट घेण्यासाठी गेले. त्यांच्याशी आमचा संवाद चांगला आहे”, असं संजय राऊत म्हणाले.

    follow whatsapp