मुंबई: मुंबईतील वरळी येथे महायुतीच्या महिला आघाडीच्या ‘आक्रोश मोर्चा’मुळे आज (21 एप्रिल) दुपारपासून प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली. या कोंडीत एका तासापासून अडकलेल्या एका सामान्य महिलाने आंदोलनस्थळी धाव घेऊन प्रचंड गोंधळ घातला. संतापाच्या भरात तिने आंदोलन करणाऱ्या महिलांना शिवीगाळ केली, पोलिसांना जाब विचारला आणि “बाजूच्या मैदानात आंदोलन करा, रस्त्यावर नाही!” असा आग्रह धरला. या घटनेमुळे मोर्च्याच्या ठिकाणी तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले.
ADVERTISEMENT
नेमकं काय घडलं?
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, महायुतीच्या महिला आघाडीने आज सकाळपासून वरळीतील एका प्रमुख रस्त्यावर ‘आक्रोश मोर्चा’ काढला होता. महिला आरक्षण विधेयक लोकसभेत संमत न झाल्याने महायुतीच्या महिला आघाडीने काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांविरोधात हा मोर्चा काढला होता. मात्र या मोर्च्यामुळे वरळी आणि आसपासच्या रस्त्यांवर वाहनांची प्रचंड रांग लागली होती. दुपारी एक वाजता जवळपास एक तास वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती.
हे ही वाचा>> पंतप्रधान मोदी LIVE: संबोधनाच्या सुरुवातीलाच मोदी संतापले, 'या' विषयावरून प्रचंड चिडले!
याच वेळी एका चारचाकी वाहनातून प्रवास करणारी एक महिला ही या कोंडीत अडकली होती. मात्र तासाभरापासून ट्रॅफिक जाम असल्याने महिलेला संताप अनावर झाला. ती आपली कार सोडून थेट मोर्च्यात सहभागी झालेल्या महिलांकडे धाव घेतली. “एक तासापासून इथे अडकले आहे. तुम्हाला आंदोलन करायचे असेल तर बाजूच्या मैदानात बसा! आमच्या रोजच्या आयुष्यात अडथळा आणू नका!” अशा शब्दांत तिने आंदोलनकर्त्यांवर तोंडसुख घेतले.
संतापाच्या भरात तिने काही आंदोलनकर्त्या महिलांना शिवीगाळही केली. तसेच घटनास्थळी तैनात असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांना तिने थेट जाब विचारला. “तुम्ही काय करताय? लोकांच्या रोजगाराला, मुलांच्या शाळेला अडथळा होत आहे, तरीही तुम्ही आंदोलन चालू ठेवताय? रस्ता खाली करा!” असे म्हणत तिने पोलिसांनाही धारेवर धरले.
हे ही वाचा>> महिला आरक्षण घटना दुरुस्ती विधेयक नामंजूर, मोदी सरकारला मोठा धक्का
या घटनेमुळे मोर्च्यात काही क्षण गोंधळ निर्माण झाला. काही आंदोलनकर्त्या महिलांनी त्या महिलेला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, तर काहींनी तिच्या संतापाला उत्तर दिले. पोलिसांनी तातडीने त्या महिलेला शांत करण्याचा प्रयत्न केला आणि तिला सुरक्षितपणे बाजूला नेले. मात्र तिच्या आक्रोशामुळे आसपासच्या वाहनचालकांनीही हात उंचावून पाठिंबा दर्शविला.
मंत्री गिरीश महाजन आणि महापौर रितू तावडेंसमोर जाऊन महिलेने व्यक्त केला संताप
दरम्यान, यावेळी या मोर्च्यात भाजपचे मंत्री गिरीश महाजन आणि मुंबईच्या महापौर रितू तावडे या देखील सहभागी झाल्या होत्या. याचवेळी संबंधित महिलेने थेट त्यांच्यासमोर जाऊन वाहतूक कोंडीबाबत तक्रार केली. तसंच आपला संतापही व्यक्त केला.
सध्या वरळी परिसरात वाहतूक कोंडी अद्याप कायम आहे. पोलिसांनी पर्यायी मार्ग उपलब्ध करून दिले असले तरी नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याची तक्रार नागरिक करत आहेत.
ADVERTISEMENT











