वाघासारखा माणूस! बाळासाहेबांना आठवताना…: नितीन गडकरी
नितीन गडकरी आजवर अनेक महापुरुषांचं मार्गदर्शन घेण्याचं भाग्य मला लाभलं आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे त्या दिग्गजांपैकीच एक होय. बाळसाहेब ठाकरे यांनी माझ्या मनावर व्यक्तिमत्वावर आणि सार्वजनिक जीवनावर मोठा प्रभाव टाकण्याचं काम केलं. मी जेव्हा भूतकाळात डोकावून पाहतो तेव्हा मला स्वतःच्या मातीची गर्जना करणारा वाघच त्यांच्या रूपाने दिसतो. बाळासाहेब ठाकरे मला स्वर्गातूनही आशीर्वाद देत असतील […]
ADVERTISEMENT

नितीन गडकरी
आजवर अनेक महापुरुषांचं मार्गदर्शन घेण्याचं भाग्य मला लाभलं आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे त्या दिग्गजांपैकीच एक होय. बाळसाहेब ठाकरे यांनी माझ्या मनावर व्यक्तिमत्वावर आणि सार्वजनिक जीवनावर मोठा प्रभाव टाकण्याचं काम केलं. मी जेव्हा भूतकाळात डोकावून पाहतो तेव्हा मला स्वतःच्या मातीची गर्जना करणारा वाघच त्यांच्या रूपाने दिसतो. बाळासाहेब ठाकरे मला स्वर्गातूनही आशीर्वाद देत असतील याची मला खात्री आहे. बाळासाहेब हे दृढनिश्चयी, धाडसी, आक्रमक तरीही अत्यंत दयाळू अंतःकरणाचे होते. मी त्यांच्या व्यक्तिमत्वाचे हे पैलू जवळून पाहिले आहेत.
मी त्यांच्याकडून या सगळ्या गोष्टी आत्मसात करण्याचा माझ्या परिने प्रयत्न केला आणि सार्वजनिक जीवनात मला त्या गोष्टी उपयुक्त ठरत आहेत. त्यांनी माझ्यावर पोटच्या मुलाप्रमाणे प्रेम केलं. ते असे नेते होते जे एखादा प्रसंग आला तर धर्म, जात, पंथ, निष्ठा याच्याही पलिकडे जाऊन निर्णय घेऊ शकत होते. ती ताकद त्यांच्यामध्ये होती. मला लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळचा एक प्रसंग आठवतो. विदर्भातील एका मतदार संघात एका शिवसैनिकाची उमेदवारी निश्चित करण्यास म्हणजेच ती जागा त्याला देण्यात आम्ही थोडं नाखुष होतो कारण त्या भागातली जातीय समीकरणं त्याच्या बाजूने नव्हती. त्यावेळी बाळासाहेबांनी गर्जना केली आणि म्हणाले की मी सार्वजनिक जीवनात जात, पात, पंथ याला कोणतंही महत्त्व देत नाही. ते अत्यंत कठोरपणे आणि तेवढ्याच स्पष्टपणे त्यांनी आम्हाला बजावलं. उमेदवार निश्चित झाला आणि त्याने निवडणूक जिंकली.










