
कल्याण: मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे हटवण्यासाठी तीन मेपर्यंतचा अल्टीमेटम दिला आहे. त्यावरून राज्यातील राजकारण तापलं आहे. कायदा व्यवस्था बिघडू नये म्हणून यासाठी पोलीस यंत्रणेने पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे .
कल्याण डोंबिवली मधील मनसे जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर यांच्यासह कार्यकर्त्यांना सीआरपीसी 149 प्रमाणे नोटीस पाठवल्या आहेत. नोटीस दिल्यानंतर आपण किंवा कार्यकर्त्यांनी कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होईल असे कृत्य केल्यास कायदेशीर कारवाई करण्यास येईल असा इशारा पोलिसांनी दिला आहे.
पाहा पोलिसांनी दिलेल्या नोटीसमध्ये नेमकं काय म्हटलंय:
खडकपाडा पोलीस स्टेशन कल्याण आम्हास प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करुन फौजदारी दंड प्रक्रिया संहिता कलम 149 प्रमाणे नोटीस देण्यात येते की, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अजानच्या वेळी मशिदीसमोर लाऊडस्पीकर लावून हनुमान चालीसा पठण करण्याचे आवाहन केले आहे. तसेच दिनांक 3.05.2022 रोजी नंतर पासून मशिदीवरील भोंगे काढून टाकण्याबाबत चेतावणी दिली आहे.
तरी आपणास याद्वारे सूचित करण्यात येते की, आपण अथवा आपले कार्यकर्ते, समर्थक प्रत्यक्ष अगर अप्रत्यक्ष विनापरवाना एकत्र जमवून व गर्दी होईल असे कार्यक्रमाचे आयोजन करु नये तसेच कोणत्याही धर्माच्या, जातीच्या अथवा व्यक्तीच्या भावना दुखावतील असे कोणतेही कृत्य करु नये ज्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन शांतता भंग होईल.
नोटीस देऊनही आपण अगर आपले समर्थक यांनी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असे कोणतेही कृत्य केल्यास त्याबाबत आपणांस जबाबदार धरुन आपणांविरुद्ध सदर नोटीसचा भंग केल्याबाबत आपल्या विरुद्ध प्रचलीत कायद्यान्वये कायदेशीर कारवाई करण्यात येईल यांची नोंद घ्यावी.
राज ठाकरेंनी नेमका काय दिला होता अल्टिमेटम
'3 तारखेपर्यंत ऐकलं नाही तर देशामध्ये जिथे-जिथे मशिदी असतील जिथे बांग सुरु असेल तिकडे हनुमान चालीसा हे लागलंच पाहिजे अख्ख्या देशभर लागलं पाहिजे. यानंतर माझ्यासह आम्ही सगळे अंगावर केसेस घेण्यासाठी तयार आहोत'
'3 तारखेला ईद आहे. माझी राज्य सरकारला, गृह खात्याला विनंती आहे की, कुठेची तेढ, दंगल आम्हाला निर्माण करायच्या नाहीत. मला तशी इच्छा देखील नाही. महाराष्ट्राचं स्वास्थ आम्हाला बिघडवायचं नाही.'
'आज 12 तारीख आहे. 12 ते 3 मे महाराष्ट्रातील सगळ्या मशिदींमधील मौलवींना तुम्ही बोलवून घ्या त्यांना सांगा सर्व मशिदींवरील लाऊड स्पीकर हे उतरले गेलेच पाहिजे खाली आले पाहिजेत. मग 3 तारखेनंतर आमच्याकडून कोणताही त्रास आमच्याकडून होणार नाही.' असा एक इशाराच राज ठाकरे यांनी दिला होता.
'हा देशभर त्रास आहे. जे आज माझं भाषण ऐकत असतील त्या सर्व तमाम हिंदूंना माझं सांगणं आहे की, 3 तारखेपर्यंत ऐकलं नाही तर देशामध्ये जिथे-जिथे मशिदी असतील जिथे बांग सुरु असेल तिकडे हनुमान चालीसा हे लागलंच पाहिजे अख्ख्या देशभर लागलं पाहिजे. आम्हाला काय त्रास होतो तो त्यांना पण कळला पाहिजे. एकमेकांना त्रास देणारा धर्म असू शकत नाही.' असं राज ठाकरे म्हणाले होते.