धाराशिव जिल्हा परिषद निवडणूकीचा निकाल जाहीर; भाजपची आघाडी, सत्तास्थापनेची गणिते सुरू
धाराशिव जिल्हा परिषद निवडणूकीचा निकाल जाहीर झाला असून यामध्ये भाजपने आघाडी मिळवली आहे. आता, भाजपकडून अध्यक्ष पदासाठी अर्चना राणा पाटील, शिवसेनेकडून उषा रविद्र गायकवाड यांचे नाव एनवेळी चर्चेत येण्याची शक्यता असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
धाराशिव जिल्हा परिषद निवडणूकीचा निकाल जाहीर
भाजपची आघाडी, सत्तास्थापनेची गणिते सुरू
धाराशिव - गणेश जाधव : राज्यात 12 जिल्हा परिषद आणि 125 नगरपंचायत समिती निवडणुकीसाठी मतमोजणी पूर्ण झाली असून ठिकठिकाणी विजयी उमेदवारांची नाव जाहीर झाली आहेत. कुठे जल्लोष सुरू आहे तर कुठे शुकशुकाट पसरल्याचं पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे, धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून होतं. निकालाअंती भाजप धाराशिवमध्ये सगळ्यात मोठा पक्ष ठरला आहे. भाजपने सर्वााधिक 19 जागा जिंकल्या आहेत तर शिवसेना शिंदे गटाने 15 जागा जिंकून दुसऱ्या नंबरचा पक्ष ठरला आहे. धाराशिवमध्ये परांडा, भूम, वाशी, कळंब, धाराशीव, तुळजापूर, लोहारा आणि उमरगामध्ये निवडणूक पार पडली.
भाजप ठरला मोठा पक्ष
धाराशिव जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद हे सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव झालं असून, आरक्षण जाहीर होताच अध्यक्षपदाच्या शर्यतीला वेग आला आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत भारतीय जनता पार्टी सर्वाधिक जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरल्याने अध्यक्षपदावर भाजपाचाच दावा भक्कम मानला जात आहे. भाजपकडून धाराशिवचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांचे नाव अध्यक्षपदासाठी सुरुवातीपासूनच पुढे करण्यात आले आहे. भाजपाने जिल्हा परिषदेत 19 जागांवर विजय मिळवत आपली ताकद स्पष्ट केली आहे.
शिंदे गटाच्या शिवसेने दुसरा क्रमांक
दरम्यान, महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना (शिंदे गट)ने 15 जागा जिंकत दुसरा क्रमांक पटकावला आहे. विशेष बाब म्हणजे, भाजपाने आपले काही उमेदवार शिवसेना शिंदे गटाच्या चिन्हावर निवडून आणल्याने भाजपाच्या अध्यक्षपदाचा मार्ग अधिक सुकर झाल्याचं चित्र आहे. या पार्श्वभूमीवर भाजपाकडून मल्हार राणा पाटील हे रणनीती आखत निवडून आलेल्या सदस्यांची मोट बांधताना सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे.
यामुळे आगामी काळात धाराशिव जिल्हा परिषदेत अध्यक्षपद कोणाकडे जाणार, तसेच सत्तास्थापनेनंतर कोणत्या घटक पक्षाला उपाध्यक्ष व सभापती पदे मिळणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. राजकीय हालचालींना सध्या कमालीचा वेग आला असून, पुढील काही दिवसांत जिल्हा परिषदेत नवे राजकीय समीकरण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.










