मला सर्वसामान्य मुंबईकरांप्रमाणे जगायचंय, अमृता फडणवीसांची पोलिसांना विनंती

Amruta Fadnavis, Traffic clearance vehicle : अमृता फडणवीसांनी ट्विट करत मुंबई पोलिसांना केली विनंती, अमृता फडणवीसांचा ट्रॅफिक क्लिअरन्स वाहनास नकार
Amruta fadnavis
Amruta fadnavis

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आणि बँकर अमृता फडणवीस यांना वाय प्लस एस्कॉर्ट सुरक्षा देण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी घेण्यात आला. वाय प्लस सुरक्षेबरोबर ट्रॅफिक क्लिअरन्स वाहनही दिलं जाणार आहे. मात्र, मुंबई पोलिसांकडून देण्यात येणारी सुविधा घेण्यास अमृता फडणवीसांनी नकार दिलाय.

काही दिवसांपूर्वी राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत अनेक राजकीय नेत्यांची सुरक्षा काढून घेण्याचा निर्णय घेण्यात आला. तर काही जणांना सुरक्षा देण्यात आली. यात अमृता फडणवीस यांनाही सुरक्षा देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्यांना वाय प्लस एस्कॉर्ट सुरक्षा देण्यात आलीये.

अमृता फडणवीस यांना वाय प्लस सुरक्षा देण्याबरोबरच ट्रॅफिक क्लिअरन्स वाहनही देण्यात आलंय. त्याबद्दल अमृता फडणवीसांनी ट्विट करत भूमिका मांडलीये. अमृता फडणवीसांनी Traffic clearance vehicle घेण्यास नकार दिलाय. यासंदर्भात त्यांनी मुंबई पोलिसांना विनंती केलीये.

अमृता फडणवीसांनी मुंबई पोलिसांना विनंती करताना काय म्हटलंय?

अमृता फडणवीसांनी मुंबई पोलिसांना विनंती करणारं ट्विट केलंय. हे ट्विट त्यांनी मुंबई पोलीस, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनाही टॅग केलंय. अमृता फडणवीस म्हणाल्या, 'मला सर्वसामान्य मुंबईकराप्रमाणे जगायचं आहे. त्यामुळे माझी मुंबई पोलिसांना विनंती आहे की, मला ट्रॅफिक क्लिअरन्स पायलट वाहन देऊ नका. वेगवेगळ्या विकासाकामांमुळे मुंबईतील ट्रॅफिकची स्थिती वैताग आणणारी आहे. यातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच सुटका करतील, याची मला खात्री आहे', असं अमृता फडणवीस म्हणाल्या.

अमृता फडणवीसांचं पुन्हा मुंबईतल्या ट्रॅफिकवर बोट...

अमृता फडणवीसांनी ट्विटमध्ये पुन्हा एकदा मुंबईतल्या ट्रॅफिक कोंडीवर बोट ठेवलंय. मुंबईतील वाहतूक कोंडीची स्थिती चिडचिड वाढवणारी आहे, असंही त्या म्हणाल्यात. यापूर्वीही अमृता फडणवीसांचं एक विधान खूप चर्चेत आलं होतं.

यापूर्वी मुंबईतल्या वाहतूक कोंडीवर अमृता फडणवीस म्हणाल्या होत्या की, महाराष्ट्रात वैयक्तिक कमेंट कुणावरही व्हायला नको. राजकारणातल्या महिलांवरती अनेक कमेंट केल्या जातात. मात्र, ते त्यांचे वैयक्तिक आयुष्य आहे. त्यावर कोणीही अजिबात कमेंट केल्या जाऊ नयेत.'

'महाराष्ट्रातल्या राज्य सरकारला कोणतीही कामे जमत नसल्याचं आपण पाहतो. मेट्रोचं काम सुद्धा तसेच पडून आहे. आज मुंबईतल्या ट्रॅफिकमुळे 3 टक्के घटस्फोट होतात, त्यामुळे राज्य सरकारने त्यांच्या चुकांकडे अधिक लक्ष घालावे असे मी म्हणेन', असं अमृता फडणवीस म्हणाल्या होत्या.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in