'संजय शिरसाटांच्या मतदारसंघात गुंडांचा नंगानाच, हातात तलवार...' रोहित पवारांनी 'x' वर व्हिडिओ शेअर करत फटकारलं
Rohit Pawar : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. त्या पोस्टच्या माध्यमातून संजय शिरसाट यांना चांगलंच सुनावलं आहे. रोहित पवारांनी नेमकी काय पोस्ट शेअर केली ते जाणून घ्या.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
'संजय शिरसाट यांच्या मतदारसंघातील गुंडांचा नंगानाच', रोहित पवार बरसले
'X' वर ट्विट व्हिडिओ शेअर करत सुनावलं
Rohit Pawar : छत्रपती संभाजीनगर पश्चिम मतदारसंघातील वाळुज एमआयडीसी परिसरातील बजाजनगर येथे एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या ठिकाणी दुचाकीवरून जाणाऱ्या हल्लेखोरांनी तलवार नाचवत दहशत केली. तसेच स्थानिकांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. तसेच काही गाड्यांची तोडफोड देखील केली आहे. ही घटना 8 जानेवारी रोजी घडली असल्याचं सांगण्यात येत आहे. या प्रकरणी रोहित पवार यांनी 'x' वर पोस्ट शेअर करत संजय शिरसाट यांना सुनावलं आहे. रोहित पवारांनी लिहिलं की, 'राज्याला दररोज ‘ज्ञानामृत’ पाजणारे राज्याचे समाजकल्याणमंत्री संजय शिरसाट साहेब यांच्या मतदारसंघातील गुंडांचा हा नंगानाच बघा...'. अशा आशयाची रोहित पवारांनी पोस्ट करत संजय शिरसाट यांना चांगलं सुनावलं आहे.
रोहित पवार यांची पोस्ट जशीच्या तशी
'राज्याला दररोज ‘ज्ञानामृत’ पाजणारे राज्याचे समाजकल्याणमंत्री संजय शिरसाट साहेब यांच्या मतदारसंघातील गुंडांचा हा नंगानाच बघा… भरदिवसा तलवारीच्या माध्यमातून अशी दहशत पसरवली जातेय. सरकारने सगळी पोलीस यंत्रणा केवळ विरोधी उमेदवारांना धमकावून अर्ज माघारी घेण्याच्या कामाला जुंपल्याने गुंडांची अशी मस्ती वाढलीय. याला जनता मतपेटीतून उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही', अशी पोस्ट करत त्यांनी खाली संजय शिरसाट यांना मेन्शन देखील केलेलं आहे.
नेमकं व्हिडिओत काय दिसतंय?
व्हिडिओ हा 33 सेकंदाचा असून, व्हिडिओच्या सुरुवातीलाच एका दुचाकीवरून तिघे येताना दिसत आहेत. त्याच दुचाकीवर असलेल्या एकाच्या हातात तलवार दिसत आहे. तिच व्यक्ती एका स्कूटीवरून येणाऱ्या तरुणावर हल्ला करण्याचा प्रयत्न करतो. त्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पळ काढतात. तेव्हा त्या ठिकाणी एकच खळबळ माजते. काही लोक सैरावैरा धावताना दिसत आहेत. त्यानंतर पळून गेलेले हल्लेखोर पुन्हा येतात आणि त्यातील एक हल्लेखोर पार्किंग केलेल्या गाड्यांवर तलवारीने हल्ला करताना दिसत आहे, त्यानंतर ते तिथून निघून जातात, हा सर्व धक्कादायक प्रकार एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.










