"उद्धव ठाकरेंना भाजप पाठवणार पुस्तकं"; आशिष शेलारांनी सांगितला इतिहास

Ashish Shelar Vs Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी आरएसएस वर टीका केली. त्याला आशिष शेलारांकडून उत्तर देण्यात आलंय.
Uddhav Thackeray And Ashish Shelar
Uddhav Thackeray And Ashish Shelar

राहुल गांधींनी वीर सावरकरांवर टीका केल्यानंतर उद्धव ठाकरेंनीही थेट आरएसएसवर निशाणा साधला होता. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील आरएसएसचं योगदान सांगावं, असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला होता. त्याला आता मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलारांनी उत्तर दिलंय.

भाजपच्या मुंबईतल्या प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना आशिष शेलारांनी ठाकरेंना उत्तर दिलं. "उद्धव ठाकरेंना विनंती आहे की, त्यांनी इतिहासाचा अभ्यास करावा. नपेक्षा आमच्याकडून जुन्या मैत्रीचा दाखला म्हणून आम्ही जी काही पुस्तकं देऊ, ती नक्की वाचावीत", असा सल्ला शेलारांनी दिलाय.

"डॉ. केशव बळीराम हेडगेवार हे स्वातंत्र्य प्राप्तीच्या काळात सक्रीय होते की नाही याचं उत्तर त्यांना मिळेल. केशव हेडगेवार हे स्वातंत्र्य अभियानात सक्रीय होते. अजून माहिती असेल, तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तत्कालीन काळातल्या वर्गांमध्ये महात्मा गांधींनीही भेट दिली होती", असं आशिष शेलार यांनी सांगितलं.

Uddhav Thackeray And Ashish Shelar
Uddhav Thackeray: वीर सावरकरांबाबत आमच्या मनात नितांत आदर, आम्हाला कुणी शिकवू नये

"महात्मा गांधींच्या विदर्भ भेटीवेळी संघ स्वयंसेवकांनीही सेवा कार्य केलं होतं. हेही त्यांना माहिती नसेल. आणि पुढचं उद्धव ठाकरेंना माहिती असण्याचा सवालच नाही. देशाच्या तत्कालीन पंतप्रधानांनी दिल्लीतल्या आपल्या परेडमध्ये सुद्धा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांना परेडसाठी बोलावलं होतं. या सगळ्याना गोष्टींना उद्धवजी अनभिज्ञ आहेत. जे स्वतःच्या वडिलांचे विचार विसरलेत, ते इतिहास विसरले तर नवलं काय?", असा टोला शेलारांनी लगावला आहे.

Uddhav Thackeray And Ashish Shelar
राहुल गांधी यांचं फडणवीस-शेवाळे यांना प्रत्युत्तर : वीर सावरकर यांचं 'ते' पत्र आणलं समोर

'डीएनए'वरून उद्धव ठाकरे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल काय म्हणालेत?

स्वातंत्र्यवीरांबद्दल प्रश्न कुणी विचारावा, ज्यांचा स्वातंत्र्य लढ्याशी सुतराम संबंध नाही, अशा मातृसंस्थेच्या मुलांनी किंवा पिल्लांनी स्वातंत्र्यवीरांबद्दल प्रेम व्यक्त करणं हास्यास्प आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तेव्हा होता, पण स्वातंत्र्य लढ्यापासून चार हात लांब होते. त्यांना स्वातंत्र्यवीरांबद्दल बोलण्याचा अधिकार नाहीये. आरएसएसचं स्वातंत्र्य लढ्यातील योगदान काय हे आधी त्यांनी सांगावं," असं उद्धव ठाकरे म्हणाले होते.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in