संजय राऊतांना धक्का! जितेंद्र नवलानींविरुद्धची चौकशी मुंबई पोलिसांनी केली बंद
राज्यात सत्तांतरानंतर दखल घ्यावी, अशा घटना घडू लागल्या आहेत. उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्याविरुद्धच्या प्रकरणात सीबीआयने क्लोजर रिपोर्ट सादर केल्यानंतर आता संजय राऊत यांनी आरोप केलेल्या उद्योजक जितेंद्र नवलानी यांच्याविरुद्धची चौकशी बंद करण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणी वेळी एसआयटीने ही माहिती दिली. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती नितीन जमादार आणि न्यायमूर्ती […]
ADVERTISEMENT

राज्यात सत्तांतरानंतर दखल घ्यावी, अशा घटना घडू लागल्या आहेत. उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्याविरुद्धच्या प्रकरणात सीबीआयने क्लोजर रिपोर्ट सादर केल्यानंतर आता संजय राऊत यांनी आरोप केलेल्या उद्योजक जितेंद्र नवलानी यांच्याविरुद्धची चौकशी बंद करण्यात आली आहे.
मुंबई उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणी वेळी एसआयटीने ही माहिती दिली. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती नितीन जमादार आणि न्यायमूर्ती एन.आर. बोरकर यांच्या दोन सदस्यीय खंठपीठासमोर जितेंद्र नवलानी यांच्या याचिकेवर सुनावणी झाली. यावेळी सरकारी वकील अरुणा पै यांनी चौकशी बंद करण्यात आल्याची माहिती न्यायालयाला दिली.
संजय राऊत यांनी फ्रंटमॅन म्हणून नाव घेतलेले जितेंद्र नवलानी आहेत कोण?
सरकारी वकील अरुणा पै यांनी दिलेल्या माहितीनंतर मुंबई उच्च न्यायालयाने जितेंद्र नवलानी यांनी दाखल केलेली याचिका रद्द केली. यापूर्वी झालेल्या सुनावणी वेळी न्यायालयाने एसआयटी चौकशीचा अहवाल सादर करण्यास सांगितलं होतं.
शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत यांनी व्यावसायिक जितेंद्र नवलानी यांच्यावर खंडणीचा गंभीर आरोप केला होता. नवलानी हे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या जवळचे असल्याची चर्चा होती.
शिवसेना नेते संजय राऊत यांनी २८ फेब्रुवारीच्या दरम्यान जितेंद्र नवलानी यांच्यावर खंडणीचा आरोप केला होता. जितेंद्र नवलानीने त्यांच्या सात कंपन्यांच्या माध्यमातून विविध बांधकाम व्यावसायिक आणि कॉर्पोरेटर्सकडून ५९ कोटी रुपयांची खंडणी उकळल्याचा आरोप राऊतांनी केला होता. ईडीकडून चौकशी सुरू असलेल्या बांधकाम व्यावसायिकांकडून पैसे उकळले जात असल्याचं राऊतांचं म्हणणं होतं. यात मुंबई ईडी कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या भूमिकांवरही राऊतांनी शंका उपस्थित केली होती.
संजय राऊत यांनी आरोप केल्यानंतर शिवसेना नेते अरविंद भोसले यांनी प्रकरणी तक्रार केली होती. जितेंद्र नवलानी ईडीचा रिकव्हरी एजंट (पैसे गोळा करणारा व्यक्ती) असल्याचा आरोप त्यांनी केला होता. तक्रारीची दखल घेत मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर मुंबई पोलीस आयुक्तांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटीची स्थापना केली होती.
संजय राऊतांनी आरोप केलेल्या जितेंद्र नवलानीविरुद्ध आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशीला सुरुवात
मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर आणि गुन्हा एसआयटीकडे हस्तांतरित केल्यानंतर जितेंद्र नवलानींनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. या याचिकेवर सुनावणी सुरू होती. त्यानंतर आता या प्रकरणात एसआयटीने महत्त्वाचं निरीक्षण नोंदवत चौकशी बंद केल्याची माहिती दिली.
जितेंद्र नवलानी यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांसंदर्भात कोणतीही माहिती वा ठोस पुरावे चौकशी दरम्यान आढळून आले नाहीत. सर्व उत्तर नोंदवण्यात आली आहेत. त्यामुळे मुंबई पोलीस आयुक्तांच्या संमतीने ही चौकशी बंद करण्यात आली आहे, असं सरकारी वकिलांनी न्यायालयात सांगितलं.