'...तरीही पंतप्रधानांचे स्वागत', शिवसेनेचा मोदींवर 'वार', काय म्हटलंय?

Shiv Sena UBT Attacks on BJP-Shinde Faction Over modi mumbai visit : मोदींच्या मुंबई दौऱ्यावरून शिवसेनेनं (उद्धव बाळासाहेब ठाकरे) काय म्हटलंय?
PM modi mumbai visit : Shiv Sena UBT Attacks on BJP-Shinde Faction Over mumbai Development projects
PM modi mumbai visit : Shiv Sena UBT Attacks on BJP-Shinde Faction Over mumbai Development projects

saamana editorial on pm modi mumbai tour News : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या मुंबई दौऱ्यावरून (Mumbai Visit) शिवसेनेनं (उद्धव बाळासाहेब ठाकरे) भाजप (Bjp) आणि बाळासाहेबांची शिवसेना (Balasahebanchi Shiv Sena) पक्षावर टीकेची तोफ डागलीये. शिवसेनेनं (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सामना अग्रलेखातून (Saamana Editorial) मोदींच्यी मुंबई दौऱ्याबद्दल भाष्य केलं असून, महाराष्ट्रातून गेलेले प्रकल्प आणि मुंबई महापालिका निवडणुकीच्या मुद्द्यावरून मोदींनाही लक्ष्य केलं आहे.

शिवसेनेनं (उद्धव बाळासाहेब ठाकरे) काय म्हटलंय? सामना अग्रलेखातील महत्त्वाचे मुद्दे...

"पंतप्रधान नरेंद्र मोदी काही तासांच्या मुंबई भेटीवर येत आहेत व या काही तासांत ते मुंबईच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी करतील असे सांगण्यात आले. सरकारतर्फे तशा प्रकारच्या जाहिराती प्रसिद्ध केल्या आहेत. पंतप्रधानांचे ठीक आहे, पण मुंबईच्या भविष्याची व भाग्योदयाची चिंता भाजपास केव्हापासून वाटू लागली हा प्रश्नच आहे", असा मुद्दा शिवसेनेनं (UBT) उपस्थित केलाय.

"मुंबईचा भाग्योदय मराठी माणसाने त्याच्या श्रमातून घडवला व त्याच मुंबईच्या लुटीवर दिल्लीश्वरांचे इमले उभे राहिले. मुंबईचे भविष्य व भाग्योदय 105 हुतात्म्यांनी घडवले, तो ओरबाडण्याचा प्रयत्न केला नाही तरी मुंबईवर उपकार होतील. त्यामुळे पंतप्रधान मुंबईच्या उज्ज्वल भविष्यासाठी अवतरत आहेत हा प्रचार खोटा आहे. ते त्यांच्या पक्षाच्या प्रचारासाठी व मुंबईवरील शिवसेनेचा भगवा उतरवता येईल काय? या भविष्यातील विचाराने येत आहेत. नव्हे, पंतप्रधानांना त्याच हेतूने मुंबईस बोलावले आहे", असं शिवसेनेनं (UBT) मोदींच्या मुंबई दौऱ्याबद्दल म्हटलं आहे.

शिंदे गट बेडूक, शिवसेनेकडून (UBT) खिल्ली

"पंतप्रधानांच्या स्वागतासाठी भाजपने मुंबई नगरी त्यांच्या झेंड्याने सजवली आहे. त्यात कोठे तरी मिंधे गटाने त्यांचे अस्तित्व दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला, पण मगरीने बेडूक गिळावा तसा हा गट गिळला गेला आहे व मगरीच्या जबड्यात जाताना बेडूक अखेरचे डराव डराव करीत आहे असेच चित्र दिसत आहे", असं म्हणत शिवसेनेनं (UBT) शिंदे गटाची खिल्ली उडवली आहे.

"या दौऱ्याच्या निमित्ताने मुंबईत लावलेल्या कटआऊट्समध्ये बाळासाहेबांपेक्षा भाजप नेत्यांचे कटआऊट्स मोठे दिसत आहेत. स्वतःला बाळासाहेबांची शिवसेना म्हणवून घेणारे मिंधे यावरही मूग गिळून का बसले आहेत? मुख्यमंत्री शिंदे हे जागतिक गुंतवणूकदारांच्या मेळाव्यासाठी परदेशात होते. मुख्यमंत्र्यांनी येताना खिशात एक लाख कोटींचे उद्योग करार आणले. ते करार जमिनीवर उतरल्यावरच स्वागत व्हावे. अर्थात तोपर्यंत हे सरकार टिकेल काय? हा प्रश्नच आहे", असं भाष्य शिवसेनेनं (UBT) केलंय.

शिवसेनेनं (UBT) केलेली कामं, काय म्हटलंय?

"पंतप्रधान मुंबईत ज्या विकासकामांचे भूमिपूजन, लोकार्पण वगैरे करणार आहेत, त्यातील बहुसंख्य प्रकल्प पालिकेत शिवसेनेची सत्ता असतानाच पुढे सरकले. त्यामुळे शिवसेनेने केलेल्या नागरी कामांचेच उद्घाटन करण्यासाठी पंतप्रधान मुंबईत येत आहेत. भारतीय जनता पक्षाने या कामाचे श्रेय भलेही घेण्याचा प्रयत्न केला तरी जनतेला सर्व काही माहीत आहे", अशी टीका शिवसेनेनं (UBT) केली आहे.

"मुंबई-महाराष्ट्राचा भाग्योदय असे म्हणायचे आहे काय?"

"पंतप्रधानांना मुंबईत महापालिकेच्या कामांचे लोकार्पण करण्यासाठी आणले ते महापालिका निवडणुकांचा प्रचार करण्यासाठी. काम शिवसेनेचे, मेहनत मुंबई महापालिकेची व प्रचाराच्या चिपळय़ा भाजप वाजवणार. पंतप्रधान येतील व मुंबईचा कायापालट करतील असे जाहीर केले. मुंबईचे आर्थिक, औद्योगिक महत्त्व कमी करून हा कायापालट केंद्राने सुरूच केला आहे. त्यामुळे आता नवे काय करणार? महाराष्ट्रातून सवादोन लाख कोटींचे प्रकल्प पळवून नेले. हा मुंबईवर आर्थिक आघात आहे. महाराष्ट्राच्या बेरोजगार तरुणांच्या तोंडचा घास पळवून नेला. यालाच मुंबई-महाराष्ट्राचा भाग्योदय असे म्हणायचे आहे काय?" असा सवाल करत शिवसेनेनं (UBT) भाजपला लक्ष्य केलंय.

Related Stories

No stories found.
logo
Mumbai Tak
www.mumbaitak.in