मुंबईची खबर: आता ‘या’ मार्गावरील प्रवास अधिक सोयीस्कर… नव्या फ्लायओव्हरमुळे वाहतूक कोंडीपासून प्रवाशांना दिलासा
कुर्ला कल्पना टॉकीज ते घाटकोपर (पश्चिम) येथील पंख शाह दर्ग्यापर्यंत एलबीएस रोडवरील वाहतूक कोंडीतून नागरिकांना दिलासा मिळणार असल्याचं सांगितलं जात आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
आता मुंबईतील ‘या’ मार्गावरील प्रवास अधिक सोयीस्कर…
नव्या फ्लायओव्हरमुळे वाहतूक कोंडीपासून प्रवाशांना दिलासा
Mumbai News : मुंबईतील प्रवाशांसाठी बीएमसीच्या एका नव्या प्रोजेक्टची बातमी समोर आली आहे. कुर्ला कल्पना टॉकीज ते घाटकोपर (पश्चिम) येथील पंख शाह दर्ग्यापर्यंत एलबीएस रोडवरील वाहतूक कोंडीतून नागरिकांना दिलासा मिळणार असल्याचं सांगितलं जात आहे. यासाठी बीएमसी एक उड्डाणपूल (ब्रिज) बांधणार आहे. साडेचार किलोमीटर लांबीच्या या उड्डाणपुलाच्या बांधकामासाठी बीएमसी 1,635 कोटी रुपये खर्च करणार असल्याची माहिती आहे
शनिवारी (15 नोव्हेंबर) बीएमसीने उड्डाणपुलाच्या बांधकामासाठी निविदा काढल्या. गेल्या दोन वर्षांत बीएमसीला प्रोजेक्टच्या बांधकामात बरेच अडथळे आले आणि आता उड्डाणपुलाच्या बांधकामाचा खर्चही वाढला आहे. बीएमसी पूल विभागाच्या एका अधिकाऱ्याने या प्रोजेक्टबाबत माहिती देताना सांगितलं की, या उड्डाणपुलामुळे कुर्ला ते घाटकोपर या एलबीएस रोडवरील वाहतूक कोंडीतून वाहनचालकांना सुटका मिळेल.
प्रोजेक्टमध्ये अडथळे
कुर्ल्यातील कल्पना टॉकीज ते घाटकोपर-अंधेरी मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी पाहायला मिळते. या समस्येवर उपाय म्हणून, बीएमसीने दोन वर्षांपूर्वी कुर्ल्यातील कल्पना टॉकीज ते घाटकोपर (पश्चिम) येथील पंख शाह दर्ग्यापर्यंत साडेचार किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय घेतला. खरं तर, या जमिनीजवळ पूल बांधण्यास नौदलाने आक्षेप घेतला, कारण या पुलाला लागून असलेली एक किलोमीटर जमीन नौदलाकडे आहे.
उड्डाणपुलाचं काम करण्यासाठी नौदलाकडून ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) आवश्यक होतं. बीएमसीच्या एका अधिकाऱ्याने याबाबत सांगितलं की, गेल्या दोन वर्षांत एनओसीबाबत बऱ्याचदा पत्रव्यवहार करण्यात आला होता, परंतु बीएमसीला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. यामुळे, बीएमसीने पुलाच्या पुढील कामासाठी लागणाऱ्या खर्चाचा अंदाज आणि निविदा प्रक्रिया थांबवल्या. नुकतंच, बीएमसीला नौदलाकडून एनओसी मिळाला आणि म्हणून त्यांनी व्हीजेटीआयमार्फत पुलाच्या बांधकामासाठी सर्वेक्षण सुरू केलं.










