Balasaheb Thackeray Portrait : शिंदे-ठाकरे एकत्र येण्याचा योग टळणार!

Uddhav Thackeray to not attend portrait unveiling-ceremony of Balasaheb Thackeray : विधानभवनात बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्र कार्यक्रमाला ठाकरे उपस्थित राहणार नाही...
Uddhav Thackeray will not attend Shiv Sena supremo Balasaheb Thackeray portrait unveiling-ceremony
Uddhav Thackeray will not attend Shiv Sena supremo Balasaheb Thackeray portrait unveiling-ceremony

uddhav thackeray latest news : शिवसेनेतील फुटीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे एकत्र येण्याची शक्यता होती, मात्र ती धुसर झाली आहे. विधानभवनात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचं अनावरण केलं जाणार असून, उद्धव ठाकरे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नसल्याचं जवळपास निश्चित झालं आहे.

बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त विधानभवनात त्यांचं तैलचित्र लावण्यात येणार आहे. या तैलचित्राचं अनावरण आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर दिसतील, असं म्हटलं जात होतं, मात्र उद्धव ठाकरे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नसल्याचं सांगण्यात येत आहे.

ठाकरे गटाचे विधिमंडळातील मोजकेच पदाधिकारी कार्यक्रमाला हजर राहतील, असं सांगण्यात आलं आहे. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचं नाव कार्यक्रम पत्रिकेत आहेत. त्यामुळे ते या कार्यक्रमला उपस्थित राहू शकतात.

'लोकसत्ता'ने सुत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्र अनावरणाचा समारंभ होणार असल्याने त्यांच्याबरोबर एकाच व्यासपीठावर येण्याचे उद्धव ठाकरे टाळणार आहे.

बाळासाहेब ठाकरे जयंती : असे आहेत उद्धव ठाकरे यांचे आजचे कार्यक्रम...

बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्र कार्यक्रमाला उद्धव ठाकरे हजर राहणार नसले, तरी ते इतर कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. शिवसेनेचा षण्मुखानंद सभागृहात मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे. सायंकाळी 6.30 वाजता हा कार्यक्रम होणार आहे.

त्याचबरोबर उद्धव ठाकरे हे रिगल सिनेमागृहासमोर असलेल्या बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याला अभिवादन करणार आहेत. सायंकाळी साडेपाच वाजता उद्धव ठाकरे तिकडे जाणार असल्याची माहिती आहे. तैलचित्र अनावर कार्यक्रमाच्या वेळेतच शिवसेनेचे हे कार्यक्रम असल्यानं उद्धव ठाकरे विधानभवनातील कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची शक्यता मावळली आहे.

राहुल नार्वेकरांनी उद्धव ठाकरेंना केला होता फोन

बाळासाहेब ठाकरे यांच्या विधानभवनातील तैलचित्र कार्यक्रमाचं विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी उद्धव ठाकरेंना निमंत्रण दिलेलं आहे. माध्यमांशी बोलताना विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनीच ही माहिती दिली होती. आपण उद्धव ठाकरेंना फोनही केलेला आहे. त्यामुळे ते कार्यक्रमाला उपस्थित राहतील अशी अपेक्षा आहे, असंही नार्वेकर म्हणाले होते.

Related Stories

No stories found.
logo
Mumbai Tak
www.mumbaitak.in