Uday samant : “एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंचं जुळू नये म्हणून तिथं काही माणसं काम करत होती”

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

-राकेश गुडेकर, रत्नागिरी

शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिंदे गटातील आमदारांकडून बाजू मांडण्याचा प्रयत्न सुरूच असून, आता माजी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी शिवसैनिकांना उद्देशून पत्र लिहिलं आहे. उदय सामंत यांनी रत्नागिरीत झालेल्या शिवसेनेच्या मेळाव्यानंतर पत्र लिहिलं असून, या पत्रात एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांचं जुळू नये, म्हणून काही लोक काम करत होती, असा गौप्यस्फोट केला आहे.

उदय सामंत (Uday Samant) यांनी मतदार आणि शिवसैनिकांना लिहिलेलं पत्र

प्रिय, शिवसेना मतदार बंधू -भगिनी आणि शिवसैनिक बंधू भगिनी,

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

सस्नेह जय महाराष्ट्र …

पत्र प्रपंच एवढ्यासाठीच, काल आपल्या रत्नागिरीमध्ये शिवसेनेचा मेळावा झाला. या मेळाव्यात रत्नागिरीचे कमी आणि लांजा, राजापूर व संगमेश्वरचे जास्त शिवसैनिक होते. असो. मेळाव्याची सुरुवात विभागप्रमुखांच्या भाषणांनी झाली. त्यांनी शिवसेनेप्रति निष्ठा व्यक्त केली. त्यानंतर नेते मंडळींची भाषणे सुरु झाली, मला अनेकांनी टोमणे मारले. सर्व भाषणं त्याच व्यासपीठावरून मी Live ऐकली. काहींनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याप्रति निष्ठा व्यक्त केली, पण ती काही मंडळी कोण होती? ज्यांनी खासदार विनायक राऊत यांच्या पहिल्या आणि दुसऱ्या निवडणुकीला नारायण राणे यांच्या आदेशाचे पालन केले नाही. काहींनी तर प्रचाराची पत्रके देखील गटारात फेकून दिली होती. त्यातील एकाने तर विनायक राऊत माझ्या अन्नावर जगतात (डब्यावर) नाहीतर त्यांना जेवण पण मिळू शकत नाही, असं जाहीर वर्तमान पत्रातून दिलं होतं.

ADVERTISEMENT

जाऊ दे मी त्याकडेही दुर्लक्ष करतो. कारण याबाबतीत खासदार राऊत साहेब निर्णय घ्यायला सक्षम आहेत. माझा कोणावरच राग नाही, पण दुःख एकच आहे की खासदार विनायक राऊत यांच्यासारखी एक अनुभवी व्यक्ती, ज्या व्यक्तीला मी आपलं मानलं आणि आजही मानतो कारण राजकारणाच्या पलीकडे जाऊन कौटुंबिक स्नेह जपण्याचे संस्कार माझ्यावर माझ्या आई वडिलांनी केले आहेत. अशा व्यक्तीने मला गद्दार, उपरा… अजून बरंच काही म्हणणं मला रुचलं नाही.

असो… मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बरोबर सामील झालो, पण एक शिवसैनिक म्हणूनच. ज्या व्यक्तीने वंदनीय बाळासाहेबांना जेलमध्ये पाठवण्याचा विचार केला. ज्या व्यक्तीने बाळासाहेबांची टी बाळू म्हणून टिंगल केली. त्या व्यक्तीच्या विरोधातील हा उठाव होता. हा उठाव होता, ज्यांनी शिवसेनेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असताना महाराष्ट्रात आपल्या शिवसेनेला चौथ्या क्रमांकावर नेलं त्यांच्या विरोधात. हा उठाव होता ज्यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना मोक्का लावून जेलमध्ये टाकलं, त्यांच्या विरोधात. हा उठाव होता ज्यांनी वि.दा. सावरकर नावाला कायम विरोध केला त्यांच्या विरोधात. हा उठाव होता जी लोक उद्धव ठाकरे यांच्या स्वभावाचा फायदा घेऊन शिवसेना संपवू पाहणाऱ्या प्रवृत्तींच्या विरोधात…

ADVERTISEMENT

आता अशा उठावात मी माझ्या राजकीय कारकिर्दीचा विचार न करता सामील झालो याला ‘गद्दारी’ म्हणायची की धाडस हे आपणच ठरवा. माझे वडील अण्णा हे १९७० साली रत्नागिरी तालुक्यातील पाली या गावी स्थायिक झाले. म्हणजे सुमारे ५२ वर्षांपासून आम्ही पाली येथे राहतो. त्यांच्या अपार मेहनतीतून आम्ही इथपर्यंत पोहोचलो. अनेकांना राजकारणात स्थिर होण्यासाठी त्यांनी आणि माझे मोठे बंधू किरण ऊर्फ भैय्या यांनी सढळ हस्ते मदत केली, ती पण परत न घेण्याच्या बोलीवरच.

अनेक नेते, राजकारणी, शिवसेनेचे लोकप्रतिनिधी हे माझ्या घरी येतात, माझ्या आईच्या हातचं जेवण जेवतात. तिच्या जेवणाचे कौतुक करतात. वयाच्या ७५ व्या वर्षी देखील तिला सर्वांना जेवू घालण्याचा आनंद मिळतो. असे असूनसुद्धा मला काल उपरा ही उपाधी लावण्यात आली. ठीक आहे, त्याकडेदेखील मी दुर्लक्ष करतो. पण मी माझ्या उभ्या आयुष्यात दुसऱ्याच्या वाईट परिस्थितीचा फायदा कधीही घेतला नाही. आजवरच्या आयुष्यात मी विकासकामांबाबत राजकारण केले नाही. म्हणूनच सर्व पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी माझे जिव्हाळ्याचे संबंध जोडले गेले, हेही माझ्या कुटुंबानेच दिलेले संस्कार आहेत.

याच संस्कारातून मी प्रयत्न केला, तो कार्यकर्ते उभे करण्याचा. शासकीय योजनांसह वैयक्तिक पातळीवर मदत करून कार्यकर्ता कायमस्वरूपी उभा राहावा, यासाठी मी प्रयत्न केले. हेच माझ्या एवढ्या वर्षातील राजकारणाचे संचित आहे. मी गुवाहाटीला जाईपर्यंत सर्वांना जोडण्याचा प्रयत्न करत होतो, याचे साक्षीदार स्वतः खासदार राऊतसाहेब, खासदार अनिल देसाई हे आहेत आणि ज्यांच्या मध्यस्थीने मी करत होतो त्यांचं नाव मी योग्य वेळी जाहीर करेन. एकनाथ शिंदे यांच्याबरोबर उद्धव ठाकरे यांचं जुळू नये, यासाठी काम करणारी काही माणसं तिथं होती. हे खासदार विनायक राऊत यांना देखील माहित आहे. तसं त्यांनी मला बोलून देखील दाखवलं.

मी त्यांना दोष देत नाही, ते त्यांच्या ठिकाणी योग्यच आहेत. मन एकाच विचाराने सुन्न होत की कालपर्यंत माझ्या वडिलांना देव माणूस म्हणणारे, माझ्या आईला लक्ष्मीचा अवतार म्हणणारे, माझ्या मोठ्या भावाला सज्जन म्हणणारे आमच्या सुख दुःखात समरस होणारे खासदार विनायक राऊत ‘उपरा’, ‘गद्दार’ आणि वैयक्तिक बरंच काही बोलले याचं मला दुःख आहे. पण ते बोलले म्हणून मी बोलणार नाही. त्यांनी मला राजकीय मदत नक्की केली आहे, ती मदत मी राजकीय कितीही मोठा झालो किंवा राजकारणात नसलो तरी विसरणार नाही.

कालच्या मेळाव्यानंतर कुणाच्या मनात संभ्रम राहु नये म्हणून पत्रातून संवाद साधत आहे. घटक पक्षासोबतच्या अनैसर्गिक आघाडीसोबत राहण्यापेक्षा वंदनीय बाळासाहेब आणि अटलबिहारी वाजपेयी यांच्या विचाराने निर्माण झालेल्या युतीसोबत राहण्याचा मी निर्णय घेतला तर आत्ता सांगा माझं काय चुकलं?

लवकरच भेटू

आपला … उदय

टीप-आत्तापर्यंत घडलेल्या घडामोडींवर मी माझं मत व्यक्त केलं. यापुढे कुणीही काहीही टीका केली, तरी माझी प्रतिक्रिया हीच असणार. यापुढे विकासातूनच उत्तर देणार!!

जय महाराष्ट्र !

    follow whatsapp

    ADVERTISEMENT