छत्रपती संभाजीनगर : नातेवाईक मंडपात, पंगतही बसली; पण दामिनी पथकाची धाड अन् नवरदेवाला पळवून लावलं
Chhatrapati Sambhajinagar News : तितक्यात दामिनी पथक व पोलिसांचे पथक अचानक हॉलमध्ये दाखल झाले आणि वातावरणात प्रचंड गोंधळ माजला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
छत्रपती संभाजीनगर : नातेवाईक मंडपात, पंगतही बसली
पण दामिनी पथकाची धाड अन् नवरदेव पळत सुटला
Chhatrapati Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगरमध्ये गरिबीच्या छायेखाली जगणाऱ्या कुटुंबाने अल्पवयीन मुलीच्या लग्नाचा निर्णय घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली. आर्थिक संकट, मुलांच्या शिक्षणाचा भार आणि घरातील तगमग या साऱ्याच्या पार्श्वभूमीवर कुटुंबाने केवळ 16 वर्षीय मुलीचे लग्न ठरवल्याची माहिती मिळताच दामिनी पथक आणि पोलिसांनी ऐनवेळी कारवाई करून हा बालविवाह हाणून पाडला. शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास रोशनगेट परिसरातील एका मंगल कार्यालयात ही कारवाई करण्यात आली.
सुहाना (नाव बदललेले) ही दहावीची विद्यार्थिनी. तिचे वडील इलेक्ट्रिशियनचे काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. घरची परिस्थिती खडतर असल्याने काही महिन्यांपासून लग्नाच्या विचारांना उधाण आले होते. दरम्यान, नात्यातील एका व्यक्तीने जिन्सी परिसरात राहणाऱ्या एका तरुणाचे स्थळ आणले. तो युवक वयाने 19 ते 20 च्या दरम्यानचा असल्याचे समजते. कुटुंबीयांनी मुलीचे वय, तिचे शिक्षण आणि इतर सर्व गोष्टी दुर्लक्षित करून लग्नाचा निर्णय घेतला.
5 डिसेंबर रोजी रोशनगेट भागातील मोठ्या हॉलमध्ये विवाह सोहळ्याची तयारी करण्यात आली होती. संध्याकाळपासून पाहुण्यांची वर्दळ वाढू लागली. वऱ्हाडी मंडळी येऊन पोहोचली होती. पंगतीसुद्धा बसल्या होत्या. लग्नाची मंडप सजावट आणि स्वागतासाठीचे सर्व कार्यक्रम सुरू झाले होते. तितक्यात दामिनी पथक व पोलिसांचे पथक अचानक हॉलमध्ये दाखल झाले आणि वातावरणात प्रचंड गोंधळ माजला.
जवळपास 300 पाहुण्यांपैकी अनेकांनी परिस्थिती पाहताच पळ काढला. जेवण सुरु असलेलेही काही जण ताट सोडून बाहेर निघून गेले. या धांदलीत तरुण पक्षाच्या नातेवाईकांनी वराला मागच्या दाराने बाहेर काढून पळवून लावल्याची माहिती मिळाली.










