जळगाव : लग्नकार्यासाठी गेलेल्या 60 वर्षीय व्यक्तीचा उष्माघाताने मृत्यू, एसटी वर्कशॉप जवळ सापडली बॉडी
Jalgaon heatstroke first death : जळगाव जिल्ह्यात उन्हाचा तडाखा वाढल्याने उष्माघाताचा पहिला बळी गेला असून 60 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
जळगाव : लग्नकार्यासाठी गेलेल्या 60 वर्षीय व्यक्तीचा उष्माघाताने मृत्यू
एसटी वर्कशॉप जवळ सापडली बॉडी
Jalgaon heatstroke first death, मनीष जोग : जळगाव शहरासह जिल्ह्यात सध्या उन्हाचा पारा चांगलाच वाढला असून, या वाढत्या तापमानाने आता जिल्ह्यात पहिला बळी घेतला आहे. जळगाव शहरातील एसटी वर्कशॉप परिसरात एका 60 वर्षीय वृद्धाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. लोधू नामदेव पाटील असे या मृत व्यक्तीचे नाव असल्याचे निष्पन्न झाले असून, त्यांचा मृत्यू वाढत्या तापमानामुळे आणि उष्माघाताने झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. ऐन लग्नकार्याच्या धामधुमीत एका ज्येष्ठ व्यक्तीचा अशा प्रकारे दुर्दैवी अंत झाल्याने पाटील कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
लग्नकार्याहून परतताना काळाचा घाला
मिळालेल्या माहितीनुसार, लोधू पाटील हे रविवारी एका विवाह सोहळ्यासाठी बोदवड तालुक्यातील हिंगणे गावात गेले होते. लग्न आटोपून ते जळगाव शहरात सुखरूप परतले होते. जळगावात पोहोचल्यानंतर त्यांनी आपल्या घरी फोन करून आपण शहरात आल्याची माहिती देखील नातेवाईकांना दिली होती. मात्र, फोन करून बराच वेळ उलटल्यानंतरही ते आपल्या निवासस्थानी पोहोचले नाहीत. त्यामुळे काळजीत पडलेल्या नातेवाईकांनी त्यांचा जळगाव शहरात सर्वत्र शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र, रात्री उशिरापर्यंत त्यांचा कोणताही पत्ता लागू शकला नव्हता. अखेर आज सकाळी एसटी वर्कशॉप जवळ त्यांचा मृतदेह आढळून आला.
उष्माघाताचा संशय आणि नातेवाईकांची माहिती
लोधू पाटील यांचा मृत्यू उष्माघातानेच झाला असल्याचा दाट संशय त्यांच्या नातेवाईकांनी व्यक्त केला आहे. लग्नासाठी ते बाहेरगावी गेले असताना दिवसभर कडक उन्हात वावरल्याने आणि प्रवास केल्याने त्यांच्या शरीरावर उन्हाचा विपरीत परिणाम झाला असावा, असे नातेवाईकांचे म्हणणे आहे. जळगावात सध्या उन्हाची तीव्रता प्रचंड वाढली असून, दुपारच्या वेळी नागरिक घराबाहेर पडणे टाळत आहेत. अशा परिस्थितीत वयोवृद्ध व्यक्तीचा उन्हाच्या तडाख्याने मृत्यू झाल्याने प्रशासकीय यंत्रणाही सतर्क झाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू केली असून पुढील तपास सुरू आहे.
परभणीतही उष्माघाताने तरुणाचा मृत्यू









