जालना: आधी झाडाखाली, नंतर ढाब्यावर... 5 जणांकडून भोळसर महिलेवर सामूहिक अत्याचार! न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल
जालन्यात भोळसर महिलेवर सामूहिक अत्याचार प्रकरणी पाच आरोपींना 20 वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. जालना येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने हा महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
जालन्यात 5 जणांकडून भोळसर महिलेवर सामूहिक अत्याचार!
संबंधित प्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल
जालना: जालन्यात भोळसर महिलेवर सामूहिक अत्याचार प्रकरणी पाच आरोपींना 20 वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. जालना येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने हा महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. वृत्तानुसार, 28 जुलै 2022 रोजी आरोपीने पीडितेला मोटारसायकलवर बसवून 'सिल्लोडला घेऊन जातो' असं सांगून दाभाडी येथे एका लिंबाच्या झाडाखाली नेलं आणि तिच्याशी बळजबरीने शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर तिला दाभाडी येथील मुस्कान नईम मिर्झा यांच्या मालकीच्या ढाब्यावर नेण्यात आलं. तेथे शटरच्या आतील खोलीत 5 जणांनी पीडिता नकार देत असतानाही तिच्यावर आळीपाळीने अत्याचार केले. यानंतर पीडितेला पुन्हा टेंभुर्णी बसस्थानकावर सोडण्यात आलं. घरी आल्यानंतर तिने संपूर्ण घटना पतीला सांगितली.
संदीप कारभारी कोल्हे (वय 22 वर्षे), सुंदरराव किसनराव कोल्हे (वय 40 वर्षे), दत्तू कुशाभाऊ खमाटे (वय 60 वर्षे), बाबासाहेब संतोष कोल्हे (वय 34 वर्षे) आणि लक्ष्मण बाबुराव सोरमार (वय 34 वर्षे) अशी शिक्षा सुनावण्यात आलेल्या पाचही आरोपींची नावे आहेत. सर्व आरोपींना 20 वर्षे सक्तमजुरी, 60 हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास 6 महिने सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
हे ही वाचा: कल्याण: "आई-बाबा त्रास करून घेऊ नका..." बारावीच्या परीक्षेच्या भितीने 17 वर्षीय विद्यार्थीनीने संपवलं आयुष्य!
पतीने पोलीस ठाण्यात दाखल केली तक्रार
पीडितेने तिच्यासोबत घडलेल्या भयानक घटनेबद्दल सांगितलं असता तिच्या पतीने बदनापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून गुन्हा र. नं. 445/2022 कलम 376, 376(ड) भादवी प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला. तपास पूर्ण झाल्यानंतर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आलं. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे एकूण 9 साक्षीदार तपासण्यात आले. तसेच, तपासादरम्यान पीडितेची मानसोपचार तज्ज्ञांकडून तपासणी करण्यात आली. त्या अहवालानुसार पीडिता मनोविकृतीच्या आजाराने पीडित असली, तरी ती ऐकणे व बोलणे या बाबतीत सक्षम असून तिचा बुद्ध्यांक 95 असल्याचं निष्पन्न झालं. त्यामुळे ती न्यायालयासमोर शपथेवर साक्ष देण्यास सक्षम असल्याचे स्पष्ट झालं. तिने व फिर्यादीने न्यायालयात सर्व आरोपींची ओळख पटवली.
हे ही वाचा: नागपूर : भाचा बेडरुममध्ये शिरला अन् मामीसोबत केले नको तेच, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
सरकार पक्षाचा साक्षीपुरावा व दोन्ही बाजूंचा युक्तिवाद लक्षात घेऊन जालना येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश कृपेश विजय मोरे यांनी बदनापूर पोलीस ठाणे गु.र. नं. 445/2022 कलम 376(ड) भादवी अंतर्गत सर्व आरोपींना प्रत्येकी 20 वर्षे सक्तमजुरी व 60 हजार रुपये दंड, तसेच दंड न भरल्यास 6 महिने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. तसेच कलम 376 भादवी अंतर्गत आरोपी क्रमांक 1 संदीप कारभारी कोल्हे यास स्वतंत्रपणे 20 वर्षे सक्तमजुरी व 60 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास 6 महिने सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.










