सात वर्षीय चिमुकला विहिरीत पडला,वाचवण्यासाठी मामीची जीवाची बाजी, दुर्दैवाने जालन्यात भयंकर घडलं
Jalna News : सात वर्षीय चिमुकल्याला वाचवण्यासाठी मामीची विहिरीत उडी, पण दुर्दैवाने भयंकर घडलं, संपूर्ण गाव हळहळलं
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
सात वर्षीय चिमुकला विहिरीत पडला, वाचवण्याची मामीची जीवाची बाजी
दुर्दैवाने या घटनेत दोघांचाही बुडून मृत्यू झालाय.
Jalna News : जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यात मालेवाडी शिवारात घडलेल्या दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसर शोककळा पसरली आहे. विहिरीत पडलेल्या सात वर्षीय मुलाला वाचवण्यासाठी मामीने जीवाची पर्वा न करता उडी घेतली; मात्र दोघांनाही पोहता येत नसल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. रुद्र वैजनाथ थोरात (वय 7 वर्षे) आणि आरती विलास भालेराव (वय 22 वर्षे) असं विहिरीत बुडून मृत्यू झालेल्या मामी आणि भाच्याचं नाव आहे. गुरुवारी दुपारी ही दुर्घटना घडली.
अधिकची माहिती अशी की, मालेवाडी शिवारातील गट क्रमांक 100 मधील शेतात रुद्र आपल्या मामा विलास भालेराव यांच्या घराशेजारी चक्का खेळत होता. खेळताना त्याचा चक्का विहिरीच्या दिशेने गेला आणि तो त्याच्या मागे धावत असताना अचानक विहिरीत कोसळला. रुद्र विहिरीत पडल्याचं लक्षात येताच जवळच शेतात काम करत असलेल्या त्याची मामी आरती भालेराव यांनी क्षणाचा विलंब न करता विहिरीत उडी मारली. परंतु दोघांनाही पोहता येत नसल्याने ते पाण्यात बुडाले. काही वेळाने परिसरातील नागरिकांना या घटनेची माहिती मिळताच मदतकार्य सुरू झाले.
हेही वाचा : लग्न कर म्हणून मामाच्या मागे लागली अन् मामाने धावत्या ट्रेनमधून भाचीला दिलं ढकलून... वसईतील धक्कादायक घटना
प्रथम आरती भालेराव यांचा मृतदेह स्थानिक ग्रामस्थांनी बाहेर काढला. मात्र रुद्रचा मृतदेह विहिरीच्या आत असल्याने तो बाहेर काढणे कठीण जात होते. त्यानंतर अग्निशमन दलाच्या पथकाला घटनास्थळी बोलावण्यात आले. त्यांच्या मदतीने काही वेळानंतर रुद्रचा मृतदेहही बाहेर काढण्यात आला. गावात या घटनेची माहिती पसरताच एकच खळबळ उडाली. मामीने भाच्यासाठी केलेले प्रयत्न सर्वांना भावूक करणारे ठरले. परंतु दोघांचाही मृत्यू झाल्याची बातमी समजताच परिसरात दुःखाचे सावट पसरले. कुटुंबीयांवर तर शोककळा ओढवली असून शेजारी-पाजारी व ग्रामस्थांनी या घटनेबद्दल तीव्र हळहळ व्यक्त केली आहे.










