सॉरी मम्मी, माझी बॉडी दान करा, शौर्य पाटीलची मेट्रो स्टेशनवरुन उडी मारुन आत्महत्या, धक्कादायक कारण समोर
Student Shaurya Patil commits suicide case : सॉरी मम्मी, माझी बॉडी दान करा, शौर्य पाटीलची मेट्रो स्टेशनवरुन उडी मारुन आत्महत्या, धक्कादायक कारण समोर
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
सॉरी मम्मी, माझी बॉडी दान करा
शौर्य पाटीलची मेट्रो स्टेशनवरुन उडी मारुन आत्महत्या
धक्कादायक कारण समोर
नवी दिल्ली : दिल्लीतील सेंट कोलंबस शाळेत घडलेल्या धक्कादायक घटनेने शैक्षणिक विश्वात मोठी खळबळ उडाली आहे. शाळेच्या प्राचार्या आणि काही शिक्षिकांकडून होत असलेल्या मानसिक छळाला कंटाळून दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या शौर्य पाटील या मराठी विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. मंगळवारी ही घटना घडली. शौर्यने लिहून ठेवलेल्या दीड पानांच्या सुसाइड नोटमध्ये त्याने स्पष्टपणे लिहिले आहे की, शाळेतील शिक्षिकांकडून होणाऱ्या अपमानास्पद वागणुकीमुळे हा टोकाचा निर्णय घ्यावा लागला.
या घटनेनंतर राजा गार्डन मेट्रो पोलिसांनी शाळेच्या प्राचार्या अपराजिता पाल यांच्यासह शिक्षिका मनू कालरा, युक्ती महाजन आणि ज्युली व्हर्गिस यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेऊन तपास सुरू केला आहे. मंगळवारी सकाळी शौर्य पाटीलने राजेंद्रनगर मेट्रो स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वरून खाली उडी मारून आपले आयुष्य संपवले. त्यानंतर ही माहिती कुटुंबीयांपर्यंत पोहोचताच परिसरात शोककळा पसरली. शौर्यचे वडील प्रदीप पाटील यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “शौर्य गेल्या काही महिन्यांपासून शिक्षिकांच्या तुच्छतादर्शक वागणुकीमुळे खूप त्रस्त होता. त्याच्यावर सतत दोषारोप, अपमान आणि मानसिक दडपण टाकले जात होते. त्यामुळे तो खूप निराश झाला होता.”
शौर्यने लिहिलेल्या सुसाइड नोटमधून त्याने कोणत्या कारणामुळे हा निर्णय घेतला हे स्पष्टपणे लिहिलं होतं. त्यात त्याने आपल्या कुटुंबाबद्दलच्या भावना आणि शिक्षिकांकडून झालेल्या मानसिक छळाचा उल्लेख केला आहे. त्याच्या नोटमधील काही शब्द मन हेलावून टाकणारे आहेत.










