कल्याण: सासुने 60 वर्षीय मित्रासोबत मिळून केली सुनेची हत्या! संपत्ती आणि नोकरीच्या वादातून भयानक घटना
कल्याणमध्ये एका सासुनेच आपल्या सुनेची हत्या केल्याची बातमी समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजेच, सासुने आपल्या मित्रासोबत मिळून तिच्या सुनेची डोक्यात रॉडने वार करून हत्या केली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
सासुने 60 वर्षीय मित्रासोबत मिळून केली सुनेची हत्या!
संपत्ती आणि नोकरीच्या वादातून भयानक घटना
कल्याणमधील धक्कादायक घटना
Kalyan Crime: कल्याण येथून कौटुंबिक वादाचं एक भयंकर आणि आश्चर्यचकित करणारं प्रकरण उघडकीस आलं आहे. येथे एका सासुनेच आपल्या सुनेची हत्या केल्याची बातमी समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजेच, सासुने आपल्या मित्रासोबत मिळून तिच्या सुनेची डोक्यात रॉडने वार करून हत्या केली. इतकेच नव्हे तर, हत्येनंतर आरोपींनी पीडितेचा मृतदेह वालधुनी पुलाच्या खाली फेकून दिल्याची माहिती आहे. पोलिसांच्या तपासादरम्यान, संपत्ती आणि नोकरीच्या कारणावरून ही भयानक घटना घडली असून पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केल्याचं वृत्त आहे.
हत्येनंतर, पुलाखाली फेकला मृतदेह
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेचं नाव लाताबाई नाथा गांगुर्डे (60) असून घटनेतील मृत महिलेचं नाव रूपाली विलास गांगुर्डे (35) आहे. तपासादरम्यान, पोलिसांना वालधुनी पुलाखाली रक्तबंबाळ अवस्थेत पीडितेचा मृतदेह आढळून आला. संबंधित घटना 1 जानेवारी रोजी घडली असून हत्येनंतर, आरोपी सासुने आपली सून बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली. तक्रारदार महिलेने पोलिसांना दिलेली माहिती आणि सुनेच्या फोटोच्या आधारे त्यांनी मृतदेहाची ओळख पटवली आणि हत्या झालेली महिला रूपाली असल्याचं स्पष्ट झालं.
हे ही वाचा: अहिल्यानगर: रात्री बाप-लेकात वाद अन् पहाटे एकाच दोरीने गळफास घेऊन संपवलं जीवन! भयानक घटनेनं जामखेड हादरलं...
नोकरी आणि संपत्तीच्या वादातून भयंकर घटना
खरं तर, रूपालीचे पती विलास यांचा सप्टेंबर 2025 मध्ये मृत्यू झाला. विलास रेल्वेमध्ये कार्यरत होते आणि त्यामुळे त्यांच्या निधनानंतर त्यांची पत्नी रूपाली हिला 9 ते 10 लाख रुपयांची ग्रॅच्युएटी मिळाली. त्यानंतर, पीडितेची सासू नेहमी या पैशांची मागणी करत होत्या, रूपालीने ते पैसे देण्यास नकार दिला. इतकेच नव्हे तर, विलास यांच्या निधनानंतर अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळवण्यासाठी आरोपी लाताबाई यांना अर्ज करायचा होता, परंतु सुनेने स्वत: त्या नोकरीसाठी अर्ज केल्याने दोघांमध्ये वाद झाला.
हे ही वाचा: राज ठाकरे तब्बल 20 वर्षांनी आले शिवसेना भवनात, युतीचा वचननामा आणि बरंच काही...
या वादातून आरोपी सासुने तिचा मित्र जगदीश म्हात्रे (60) याच्यासोबत मिळून रूपालीची निर्घृण हत्या केली. हत्येनंतर, आरोपींनी मृतदेह वालधुनी पुलाखाली फेकून दिला आणि आपल्यावर संशय येऊ नये म्हणून पोलीस स्टेशनमध्ये जाऊन सून बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली. अखेर, पोलिसांचा तपास आणि कठोर चौकशीतून आरोपींच्या गुन्ह्याचा उलगडा झाला. त्यानंतर, पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन पुढील तपास करत असल्याची माहिती आहे.










