कोल्हापूर : व्याजाच्या पैशाच्या बदल्यात शारीरिक संबंध, नग्न व्हिडीओ शूट करुन महिलेवर 3 वर्ष अनन्वित अत्याचार

मुंबई तक

Kolhapur Crime News : कोल्हापुरात व्याजाच्या पैशांच्या बदल्यात एका महिलेवर अत्याचार करून तिचे अश्लील व्हिडिओ बनवणाऱ्या नराधमाविरुद्ध गांधीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने पीडितेच्या नातेवाईकांना मारहाण करून धमकावल्याचे समोर आले असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

ADVERTISEMENT

Kolhapur Crime News
Kolhapur Crime News
google news

बातम्या हायलाइट

point

कोल्हापूर : व्याजाच्या पैशाच्या बदल्यात शारीरिक संबंध

point

नग्न व्हिडीओ शूट करुन महिलेवर 3 वर्ष अनन्वित अत्याचार

Kolhapur Crime News : कोल्हापूर जिल्ह्यातील गांधीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून माणुसकीला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. व्याजावर घेतलेले पैसे परत न करू शकल्याचा गैरफायदा घेऊन एका 35 वर्षीय नराधमाने महिलेवर वारंवार अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अमित कृष्णांत सावंत (रा. रोहिदास चौक, गडमुरशिंगी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. पीडित महिलेने आरोपीकडून 10 टक्के व्याजाने दोन लाख रुपये घेतले होते, मात्र ही रक्कम आणि त्यावरील अवाढव्य व्याज परत करणे तिला शक्य झाले नाही. याच हतबलतेचा फायदा घेत आरोपीने पीडितेकडे शरीरसुखाची मागणी केली आणि नकार दिला तर व्याजाचे पैसे दे अन्यथा गंभीर परिणामांना सामोरे जाण्याची धमकी दिली.

वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन अत्याचार आणि अश्लील क्लिपद्वारे ब्लॅकमेलिंग

मिळालेल्या माहितीनुसार, सन 2023 पासून 19 एप्रिल 2026 पर्यंत हा अत्याचाराचा धक्कादायक प्रकार सुरू होता. आरोपीने पीडितेच्या इच्छेविरुद्ध तिला वेगवेगळ्या लॉजवर नेऊन तिच्याशी शरीरसंबंध ठेवले. इतकेच नव्हे तर, आरोपीने आपल्या मित्राच्या अल्टो कारमध्येही पीडितेवर अत्याचार केले. या नराधमाने क्रूरतेची सीमा ओलांडत पीडितेचे नग्न फोटो आणि व्हिडिओ क्लिप आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केल्या. हे फोटो आणि व्हिडिओ तिच्या घरच्यांना दाखवण्याची तसेच सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन तो तिला सतत ब्लॅकमेल करत होता. या दहशतीमुळे पीडित महिला दीर्घकाळ हा अन्याय सहन करत राहिली, मात्र आरोपीचा छळ दिवसेंदिवस वाढतच गेला.

पीडितेच्या जावयाला मारहाण आणि गांधीनगर पोलिसांत गुन्हा दाखल

या प्रकरणातील धक्कादायक बाब म्हणजे आरोपी अमित सावंत याने केवळ पीडितेवरच अन्याय केला नाही, तर तिच्या नातेवाईकांनाही लक्ष्य केले. त्याने पीडितेच्या नातेवाईकांना गाठून पीडितेचे अश्लील फोटो दाखवले आणि त्याच्याकडूनही व्याजाचे पैसे आणून देण्याची मागणी केली. जावयाने प्रतिकार केला असता आरोपीने त्याला बेदम मारहाण केली आणि सासूकडून पैसे वसूल करून देण्यास सांगितले. या छळाला कंटाळून अखेर पीडित महिलेने गांधीनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. पोलिसांनी या तक्रारीची गंभीर दखल घेत आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम 64(1), 64(2)(M), 77, 351(2), 115(2) आणि सावकारी कायदा कलम 39 व 45 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

या घटनेमुळे कोल्हापूर परिसरात खाजगी सावकारीचा प्रश्न आणि महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. 10 टक्के व्याजाच्या नावाखाली एका कुटुंबाला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करणाऱ्या अमित सावंतवर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे. सध्या सहाय्यक फौजदार कुडची आणि  पोलीस उपनिरीक्षक विजय कोळी या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. आरोपीने अशाच प्रकारे इतर कोणाला सावकारी पाशात ओढून त्यांचे शोषण केले आहे का, याचाही शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. 

हे वाचलं का?