'विधवा आणि घटस्फोटीत महिला असाल तर...', राज्य सरकारचा लाडकी बहीण योजनेबाबत मोठा निर्णय
Ladki Bahin Yojana : 'विधवा आणि घटस्फोटीत महिला असाल तर...', राज्य सरकारचा लाडकी बहीण योजनेबाबत मोठा निर्णय
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
'विधवा आणि घटस्फोटीत महिला असाल तर...'
राज्य सरकारचा लाडकी बहीण योजनेबाबत मोठा निर्णय
Ladki Bahin Yojana : सांगली जिल्ह्यातील लाखो महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे. लाडकी बहीण योजनेसाठीची केवायसी करण्याची अंतिम तारीख शासनाने 31 डिसेंबरपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर, विधवा आणि घटस्फोटित महिलांच्या केवायसीसंबंधी अडचणींचा प्रश्नही शासनाने सोडवला असून, आवश्यक कागदपत्रे सादर करणाऱ्या महिलांना योजनेचा लाभ पूर्ववत मिळत राहणार आहे. विधवा आणि घटस्फोटित महिलांना केवळ स्वत:ची केवायसी करावी लागणार आहे, याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आलाय.
विधवा व घटस्फोटित महिलांसाठी आवश्यक कागदपत्रे
या दोन्ही श्रेणीतील महिलांनी सर्वप्रथम स्वत:ची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. त्यानंतर, पती किंवा वडिलांच्या मृत्यूचा दाखला सादर करावा लागेल. घटस्फोटित महिलांनी घटस्फोटाचा दाखला किंवा न्यायालयाचा अधिकृत आदेशाची प्रत महिला व बाल विकास विभागाच्या कार्यालयात जमा करायची आहे. या कागदपत्रांची पडताळणी संबंधित कार्यालयाकडून केली जाईल.
तांत्रिक अडचणींमुळे केवायसी प्रक्रियेत अडथळे
लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलवर सतत तांत्रिक त्रुटी निर्माण होत असल्याने अनेक महिलांना केवायसी पूर्ण करण्यात मोठ्या समस्या येत होत्या. विशेषत: ओटीपी वेळेवर न आल्याने प्रक्रिया अपूर्ण राहात होती. अनेक महिलांना मध्यरात्रीपर्यंत जागून केवायसी करण्याचा प्रयत्न करावा लागत होता. 18 नोव्हेंबर ही अंतिम मुदत संपूनही हजारो महिलांची केवायसी अपूर्ण राहिली होती. राज्यभर ही समस्या उद्भवल्याने शासनाने अंतिम तारीख वाढवण्याचा निर्णय घेतला.
विधवा आणि घटस्फोटित महिलांना भेडसावणारा मुख्य प्रश्न
केवायसी प्रक्रियेसाठी लाभार्थी महिलेच्या आधारशी लिंक असलेल्या मोबाइल क्रमांकावर ओटीपी येतो. त्यानंतर पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक टाकला की त्यावर लिंक असलेल्या मोबाइलवर दुसरा ओटीपी मिळतो. मात्र, विधवा आणि घटस्फोटित महिलांसाठी ही प्रक्रिया अवघड बनली होती. पती किंवा वडिलांचा नंबर उपलब्ध नसल्याने ओटीपी मिळत नव्हता आणि ई-केवायसी पूर्ण होत नव्हती.










