कल्याण-डोंबिवली महापालिकेचं नेमकं राजकारण कसं, कोणाचा होणार महापौर? दिग्गज नेत्याने सगळंच सांगितलं!
कल्याण-डोंबिवली महापालिकेत कोणाचा महापौर होणार याकडे सध्या सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. मात्र, त्याचविषयी सविस्तरपणे जाणून घेऊया.
ADVERTISEMENT

कल्याण: मागील काही दिवसांपासून कल्याण-डोंबिवलीतील राजकीय उलथापालथ हा अवघ्या राज्यात चर्चेचा विषय ठरला आहे. 1995 पासून कल्याण-डोंबिवली महापालिकेवर बहुतांश वेळा शिवसेनेचाच भगवा फडकला आहे. मात्र, यंदा या भागात भाजपने आक्रमक रणनिती अवलंबली आहे. अशावेळी शिवसेना (शिंदे गट) आपली रणनिती कशा पद्धतीने आखणार आणि महापौर बनविण्यासाठी कोणते डावपेच खेळणार याकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलं आहे.
मात्र, याचबाबत कल्याणमधील शिवसेनेचे (शिंदे गट) वरिष्ठ नेते आणि माजी नगरसेवक मोहन उगले यांनी या सगळ्या राजकीय डावपेचांबाबत मुंबई Tak सोबत सविस्तर चर्चा केली. पाहा ते नेमकं काय म्हणाले.
वाचा संपूर्ण मुलाखत
- प्रश्न: महापालिका निवडणुका अद्याप जाहीर झालेल्या नाही. पण एवढ्या लवकरच प्रचार सुरू करण्याचं नेमकं तंत्र काय?
मोहन उगले: कडोंमपामध्ये पहिल्यांदाच पॅनल पद्धतीने निवडणूक होत आहे. 1995 पासून ते आतापर्यंत सिंगल पद्धतीने मतदान झालं आहे इथे. त्यामुळे नागरिकांना याबद्दल काही माहिती नाही. आमचा मुख्य उद्देश आहे जनजागृती करणे. सर्वसामान्य जे कार्यकर्ते आहेत त्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना हे समजून सांगणं आणि कार्येकर्ते हे मतदारांना यंदाच्या मतदानाबाबत जागरूक करतील. याच दृष्टीने यंदा शिवसेनेतर्फे आपण अगोदरपासून जनजागृती सुरू करत आहोत. त्यामुळे हा काही प्रचार नाही. ती जनजागृती आहे.
- प्रश्न: पॅनल पद्धतीचा मतदानावर परिणाम होण्याची शक्यता आहे. लोकांमध्ये संभ्रम तर आहेच मात्र यासोबतच नगरसेवक निवडीवर देखील त्याचा परिणाम होऊ शकतो?
मोहन उगले: कल्याण-डोंबिवली महापालिकेत पॅनल पद्धतीने निवडणूक होणार असं अनेकदा बोललं गेलं होतं. पण आतापर्यंत कधीही तशी निवडणूक झाली नाही. पण आता पहिल्यांदाच या पद्धतीने निवडणूक होणार आहे. ठाणे, नवी मुंबई वैगरे भागात पॅनल पद्धतीने निवडणूक झालेली आहे. परंतु कल्याण शहरात हे प्रथमच घडतं आहे. यामुळे नागरिकांमध्ये जनजागृती केल्यानंतर सुज्ञ नागरिकांना हे मतदान बरोबर समजेल.










