अनिल देशमुखांच्या मुलाने अचानक शरद पवारांची का सोडली साथ? 'ती' भेट अन्...
अनिल देशमुख यांचे पुत्र सलील देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचा अचानक राजीनामा दिला. यानंतर आता सध्या राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
अनिल देशमुखांचे पुत्र सलील देशमुखांचा राजीनामा
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या सदस्यत्वाचा दिला राजीनामा
सलील देशमुख स्थानिक पातळीवरील राजकीय निर्णयांमुळे नाराज असल्याची चर्चा
नागपूर: राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे पुत्र सलील देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचा गुरुवारी (20 नोव्हेंबर) अचानक राजीनामा दिल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. सलील देशमुख हे जिल्हा परिषदचे माजी सदस्य देखील होते. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी दिलेला राजीनामा हा पवारांसाठी धक्का मानला जात आहे. सलील यांनी प्रकृती अस्वास्थ्याचे कारण देत राजीनामा दिला आहे. मात्र, वडील अनिल देशमुख यांनी काटोल नगराध्यक्ष पदासाठी शेतकरी कामगार पक्षाला पाठिंबा दिल्यामुळे सलील देशमुख यांनी पक्ष सोडल्याची आता जोरदार चर्चा सुरू आहे.
अनिल देशमुखांच्या मुलाने शरद पवारांची साथ सोडण्यामागचं नेमकं कारण काय?
अनिल देशमुख हे शरद पवारांवर अबाधित विश्वास असल्याचे सांगत असताना, त्यांच्या मुलाने राजीनामा देत शरद पवारांना मोठा धक्का दिला आहे. सलील यांनी राजीनामा पत्रात प्रकृती अस्वास्थ्याचे कारण दिले. परंतु, प्रत्यक्षात नगराध्यक्षपदासाठी शेकापला पाठिंबा दिल्यामुळे वडिलांवरील नाराजीमुळे त्यांनी टोकाचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे.
हे ही वाचा>> 'बाबा मला मारलं म्हणून कोणीतरी दिल्लीला गेलं होतं... ', उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
2024 विधानसभा निवडणुकीत सलील देशमुख यांना महाविकास आघाडीने काटोल विधानसभा मतदारसंघातून निवडणूक मैदानात उतरवलं होतं. त्यात त्यांचा पराभव झाला होता. याच पराभवानंतर ते पक्षात अस्वस्थ होते. सूत्रांच्या माहितीनुसार सलील देशमुख हे सध्या तरी कुठल्याही पक्षात प्रवेश करणार नाहीत. मात्र, जिल्हा परिषद निवडणूक पूर्वी ते राष्ट्रवादी अजित पवार गटात सहभागी होऊ शकतात. अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. असं झाल्यास हा अनिल देशमुखांसाठी देखील मोठा धक्का असू शकतो. कारण अजित पवार हे भाजपसोबत गेल्यानंतरही अनिल देशमुख हे मात्र, शरद पवारांसोबत कायम राहिले. असं असताना जर सलील देशमुख यांनी अजित पवारांच्या गटात सामील होण्याचा निर्णय घेतला तर ही अनिल देशमुखांसाठी नामुष्कीची बाब ठरू शकते.
शेकापच्या राहुल देशमुख यांच्या पत्नीला नगराध्यक्षपदासाठी उमेदवार म्हणून अनिल देशमुख यांनी समर्थन दिल्यानेच सलील यांच्या गटातील काहीजण नाराज झाले होते. त्यामुळेच सलील यांनी अखेर टोकाचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे.










