संगमनेरमधून काँग्रेसचा 'पंजा' गायब, राज्यभरातून टीकेची झोड, अखेर बाळासाहेब थोरात यांचं स्पष्टीकरण
Balasaheb Thorat on Sangamner Nagarpalika Election : संगमनेरमधून काँग्रेसचा 'पंजा' गायब, राज्यभरातून टीकेची झोड, आता बाळासाहेब थोरात यांचं स्पष्टीकरण
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
संगमनेरमधून काँग्रेसचा 'पंजा' गायब, राज्यभरातून टीकेची झोड
बाळासाहेब थोरात स्पष्टीकरण देताना म्हणाले...
Balasaheb Thorat on Sangamner Nagarpalika Election : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचा गड मानल्या जाणाऱ्या संगमनेरमध्ये नगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसचे चिन्ह गायब झाल्याचं चित्र आहे. काँग्रेसच्या पंजा या चिन्हावर कोणीही निवडणूक लढताना दिसत नाहीये. संगमनेर नगरपालिका निवडणुकीची सर्व जबाबदारी बाळासाहेब थोरातांनी त्यांच्या भाच्यावर म्हणजेच नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांच्यावर सोपवली आहे. त्यामुळे या निवडणुकीत संगमनेरमध्ये वेगळंच राजकीय चित्र उभं राहिलं आहे. दरम्यान, संगमनेरमध्ये काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढत नसलेल्या बाळासाहेब थोरात यांना राज्यभरातून टीकेला सामोरे जावे लागत आहे. शिवाय त्यांच्यावर घराणेशाहीचा देखील आरोप केला जातोय. दरम्यान, बाळासाहेब थोरात यांनी 'मुंबई Tak' शी बोलताना याबाबत सविस्तर भाष्य केलंय.
बाळासाहेब थोरात स्पष्टीकरण देताना काय म्हणाले?
बाळासाहेब थोरात म्हणाले, घराणेशाहीचा आरोप कोणी कोणावर करावा, अशी परिस्थिती राहिलेली नाही. सगळ्या पक्षांमध्ये सर्वांची घराणेशाही जोरदार सुरु आहे. त्यामुळे घराणेशाहीचा आरोप कोणी कोणावर करु नये. विधानसभा निवडणूक होऊन वर्ष झालंय. गेल्या वर्षभरात संगमनेरमध्ये गुंडगिरी वाढली आहे. अंमली पदार्थांचा काळा बाजार वाढलाय. संगमनेर शांत होतं, येथे बंधूभावाचं वातावरण होतं. ते पूर्णपणे बिघडून गेल्याचं दिसत आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत सर्वांना बरोबर घ्यायची, आमची जबाबदारी आहे. ज्याला वाटतं संगमनेरची अर्थव्यवस्था टिकली पाहिजे. संगमनेर सुंदर शहर म्हणून पुढे आलेलं आहे. त्यांचं सौंदर्य कायम टिकलं पाहिजे. त्या सर्वांना सोबत घेण्याची वेळ आमच्यावर आली आहे. माझ्या अंतकरणामध्ये काँग्रेस आहे. ते कोणीच काढू शकत नाही. आमच्या विचारामध्ये शहर भक्कमपणे उभा आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये 1991 पर्यंत कोणी पक्षाचं चिन्ह वापरत नव्हतं. आमच्या शहरावर जे अतिक्रमण रोखण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. काँग्रेस म्हणून आम्ही एक पाऊल मागे गेलो असेल. मात्र, आम्ही यातून लोकांचं हित जपण्याच काम करत आहोत.
हेही वाचा : शिवसेना उमेदवाराच्या कारने चौघांना चिरडलं, अंबरनाथमध्ये भीषण अपघात, हादरवणारा video बघाच
संगमनेरच्या नगराध्यक्षपदासाठी सत्यजित तांबे यांच्या पत्नी मैदानात
सत्यजित तांबे यांच्या पत्नी, डॉ. मैथिली तांबे या नगराध्यक्षपदासाठी रिंगणात उतरल्या आहेत. या निवडणुकीत त्यांनी काँग्रेसऐवजी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी स्थापन केलेल्या ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाचं सिंह चिन्ह स्वीकारलं आहे. थोरात आणि तांबे यांच्या या भूमिकेमुळे संगमनेरची निवडणूक पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे.










