बारामतीच्या महिलेचा कर्नाटकात मर्डर, जोडीने निघाले होते गाणगापूरला, वाटेत नवऱ्यासोबत बिनसले अन्..
बारामतीहून कर्नाटकात देवदर्शनासाठी गेलेल्या एका महिलेचा तिच्या पतीने खून केला आहे. चारित्र्याच्या संशयावरुन पतीने हा कट रचला असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
बारामतीच्या महिलेचा कर्नाटकात मर्डर
जोडीने निघाले होते गाणगापूरला
वाटेत नवऱ्यासोबत बिनसले अन्..
Baramati Woman Murder, वसंत मोरे : बारामतीतून कर्नाटकला देवदर्शनासाठी निघालेल्या महिलेचा तिच्या पतीने खून केल्याची घटना समोर आली आहे. हे दोघे नवरा बायको देवदर्शनासाठी कर्नाटकातील कलबुर्गी जिल्ह्यात गेले होते. यावेळी जाताना दोघांमध्ये किरकोळ कारणावरुन वाद झाला. या वादातून आरोपीने आपल्या बायकोचा गळा चिरत आणि तिला फोर व्हीलर खाली चिरडत तिची हत्या केली. या घटनेचा व्हिडिओदेखील सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. अक्षय जाधव असे आरोपी पतीचे नाव असून, या हल्ल्यात शैला जाधव (28) या विवाहितेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात आणि सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे.
अंगावर गाडी घालून चिरडले
मिळालेल्या माहितीनुसार, जाधव दाम्पत्य कर्नाटकातील गाणगापूर येथे दर्शनासाठी जात होते. कलबुर्गी परिसरातून जात असताना त्यांच्यात कोणत्यातरी कारणावरून जोरदार भांडण झाले. हा वाद इतका विकोपाला गेला की, अक्षयने रागाच्या भरात शैला यांना कारमधून बाहेर ओढले आणि त्यांना बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याने धारदार शस्त्राने स्वतःच्या पत्नीचा गळा चिरला आणि क्रूरतेचा कळस गाठत रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पत्नीच्या अंगावर गाडी घालून त्यांना चिरडले.
हे ही वाचा : नागपूर : रेल्वे रुग्णालयात लोको पायलटने गळफास घेत संपवलं जीवन, कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण
व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
या हृदयद्रावक घटनेचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. धक्कादायक बाब म्हणजे, जेव्हा आरोपी आपली पत्नीवर जीवघेणा हल्ला करत होता आणि ती मदतीसाठी टाहो फोडत होती, तेव्हा तिथे उपस्थित असलेले नागरिक वाचवायला येण्याऐवजी या घटनेचे व्हिडिओ शूट करण्यात व्यस्त होते. बघ्यांच्या या असंवेदनशीलतेमुळे पीडितेला वेळीच मदत मिळू शकली नाही आणि तिचा जागीच मृत्यू झाला.









