Manoj Jarange : ‘त्यांना आवरा, नसता…’, जरांगेंनी भुजबळांविरुद्ध थोपटले दंड; शिंदे, फडणवीस, पवारांना काय दिला इशारा?
मनोज जरांगे पाटील यांची कोल्हापूरमध्ये सभा झाली. या सभेत बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळांना लक्ष्य केले, तर एकनाथ शिंदे, फडणवीस, अजित पवारांना इशारा दिला.
ADVERTISEMENT

Manoj Jarange kolhapur Rally, Chhagan Bhujbal : अंबडमध्ये झालेल्या ओबीसी आरक्षण बचाव एल्गार सभेतून छगन भुजबळांनी मनोज जरांगे पाटलांना लक्ष्य केलं. तू तर सासऱ्याच्या घरी भाकरीचे तुकडे मोडतो, असं भुजबळ म्हणाले. त्याला मनोज जरांगे पाटलांनी कोल्हापूरमध्ये झालेल्या सभेतून उत्तर दिलं. महाराष्ट्र सदन घोटाळ्याचा उल्लेख जरांगेंनी केला. त्याचबरोबर भुजबळांना शांत करा नसता… असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना गर्भित इशारा दिला.
कोल्हापुरातील सभेत बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, “या आरक्षणामुळे आपल्या पोरांच्या स्वप्नांची राखरांगोळी झाली. त्यांच्या मायबापांच्या स्वप्नांची राखरांगोळी झाली. या आरक्षणामुळे आपल्या पोरांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. आता एकजूट रहा. पुरावे असतानाही ते दाबून ठेवले. आता ते मिळालेत. सगळ्यांना माहिती झालंय. मराठ्यांना शंभर टक्के आरक्षण मिळणार. मराठा ओबीसी आरक्षणात जाणार, हे शंभर टक्के सगळ्यांना माहिती झालंय. तेव्हापासून त्यांचा तिळपापड झालाय. त्या एका पठ्ठ्याला काही तर सुधरेना”, असं म्हणत मनोज जरांगे पाटलांनी छगन भुजबळांवर निशाणा साधला.
“छत्रपती शिवरायांच्या मावळा आहे. अंगात त्यांचंच रक्त खेळतंय. मी मराठ्याचा असल्याने त्यांना कुणाला भित नाही आणि भिणारही नाही. माझ्या जातीच्या न्यायाच्या आड जर कुणी आला, तर मी त्यांना सोडत नाही”, असं म्हटल्यावर उपस्थितांनी छगन भुजबळांच्या नावाने घोषणाबाजी केली.
“सासऱ्याची भाकर खातो, तुझी खातो का? तू तर…”
त्यानंतर जरांगे पाटील म्हणाले, “आता तुम्ही नाव घेतलं. आज काय झालं आमच्या कोपऱ्यात तो आला होता, असं मला कळलं. तो खूपच बरळला म्हणून कळलं. वयामानाने ते होतंच असतं. इथून पाठीमागे आमच्या नजरेत त्यांची इज्जत होती. हे मी मनापासून बोलतोय. व्यक्ती म्हणून इज्जत होती, त्यांच्या विचारांना मात्र विरोध होता. व्यक्ती म्हणून शत्रुत्व नव्हतं, पण त्यांनी आज पातळी सोडली. एवढ्या मोठ्या व्यक्तीने, ज्याचे विचार चांगले आहेत, त्याने एका समाजाचं नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीने काय बोलावं हे तरी कळलं पाहिजे. माझी सासुरवाडी संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूरची. तो म्हणतो सासऱ्याची भाकर काय खातो? तुझी खातो का, तू तर आमची खातोय”, असा थेट वार जरांगे पाटलांनी भुजबळांवर केला.