Monsoon Update: महाराष्ट्रात ऑरेंज अलर्ट.. वादळी वारे अन् मुसळधार पाऊस!
मान्सूनने अखेर दक्षिण महाराष्ट्र व्यापला असून देवगड, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली आणि सातारा भागात हजेरी लावली आहे. जाणून घ्या कुठे-कुठे देण्यात आला आहे ऑरेंज अलर्ट.
ADVERTISEMENT

मुंबई: देशभरात अनेक ठिकाणी नागरिकांना सध्या वाढते तापमान आणि दमट वातावरणाचा सामना करावा लागत आहे. मान्सूनचे आगमन झाल्यानंतरही अपेक्षित प्रमाणात पाऊस न झाल्याने उष्णता कायम असून वातावरणात प्रचंड आर्द्रता जाणवत आहे. भारतीय हवामान विभागाच्या (IMD) ताज्या अंदाजानुसार मान्सूनची प्रगती सध्या मंदावली असून त्यामागे काही महत्त्वाची हवामानशास्त्रीय कारणे असल्याचे स्पष्ट झाले आहे.
मान्सून कुठपर्यंत पोहोचला?
सध्या ईशान्य भारतातील सेवन सिस्टर्सचा बहुतांश भाग मान्सूनने व्यापला आहे. दक्षिण भारतातील काही राज्यांमध्येही मान्सून दाखल झाला असला तरी पावसाचे स्वरूप सर्वत्र एकसमान नाही. अनेक ठिकाणी केवळ तुरळक आणि विखुरलेल्या स्वरूपात पाऊस पडत आहे. त्यामुळे राज्यभर किंवा संपूर्ण प्रदेशात एकाच वेळी पावसाची स्थिती निर्माण झालेली नाही.
हे ही वाचा>> पुणे: पेटता सिलेंडर बाहेर फेकला पण... आई-वडिलांसह मुलाचा जागीच गेला जीव, काळीज पिळवटून टाकणारी घटना!
महाराष्ट्रातही मान्सून दक्षिण महाराष्ट्रापर्यंत पोहोचला आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सोलापूर परिसरात काही ठिकाणी वादळी वाऱ्यांसह हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र, राज्यभर मुसळधार पावसाचे चित्र अद्याप दिसत नाही.
मान्सूनचा वेग का मंदावला?
हवामान तज्ज्ञांच्या मते, बंगालच्या उपसागरात सध्या कोणतेही प्रभावी कमी दाबाचे क्षेत्र किंवा हवामान प्रणाली सक्रिय नाही. अशा प्रणालींमुळे मान्सूनला पुढे सरकण्यासाठी आवश्यक ऊर्जा मिळते. मात्र सध्या अशी परिस्थिती नसल्याने मान्सूनची आगेकूच संथ झाली आहे.









